Kumar Vishwas : दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर येत आहेत. या निवडणुकीत आपचा पराभव झाला आहे आणि दिल्लीत भाजपाचं कमळ २७ वर्षांनी फुलणार आहे यात आता काहीही शंका राहिलेली नाही. दरम्यान दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संस्थापक अरविंद केजरीवाल यांचा नवी दिल्ली मतदारसंघातून पराभव झाला आहे. या पराभवामुळे आम आदमी पक्षाचं सत्तास्थापनेचं स्वप्न भंगलं. या सगळ्याबाबत आता कुमार विश्वास यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
कुमार विश्वास यांचा अरविंद केजरीवाल यांना टोला
दिल्लीत भाजपाचा विजय झाला आहे, त्यामुळे मी त्यांचं अभिनंदन करतो. लोकांच्या अपेक्षा ते पूर्ण करतील अशी मला आशा आहे. तसंच आम आदमी पक्षाचे जे कार्यकर्ते अण्णा हजारेंच्या आंदोलनातून तयार झाले होते त्यांचं अतिशय निश्चल आणि निष्पाप भारतीय राजकारण बदलण्याचं स्वप्न होतं. त्या स्वप्नांची हत्या एका निर्लज्ज, आत्मकेंद्री आणि स्वार्थी माणसाचा पराभव झाला त्याबद्दल काय संवेदना बाळगायच्या? असा टोला कुमार विश्वास यांनी अरविंद केजरीवाल यांना लगावला.
आणखी काय म्हणाले कुमार विश्वास?
“आम आदमी पक्षात जे लोक राहिले होते, त्यांना पदाची लालसा होती, काहीतरी स्वार्थ होता. आता ते लोक आपल्या व्यवसायांमध्ये किंवा जे करत होते ते करण्यासाठी परत जातील, माझ्यासाठी दुःखाचा विषय नाही. मला वाईट याचं वाटतं कोट्यवधी कार्यकर्त्यांच्या स्वप्नाची हत्या एका माणसाने त्याच्या स्वार्थासाठी केली. त्या माणसाला शिक्षा मिळाली याचा मला आनंद आहे. न्याय झाला याचा मला आनंद आहे.” असं कुमार विश्वास म्हणाले.
मनिष सिसोदियांचा पराभव झाला, अहंकार..
आज जंगपुराचा निर्णय मी पाहिला आणि कळलं की मनिष सिसोदिया हरले. माझी पत्नी राजकारणाबाबत काही बोलत नाही तटस्थ असते. तिच्या डोळ्यांत पाणी होतं. माझ्या पत्नीलाच मनिष म्हणाला होता की अभी तो ताकद है. असा अहंकार इतर लोकांमध्ये येऊ नये. जे निवडून आले आहेत त्यांनी आता योग्य पद्धतीने काम केलं पाहिजे असंही विश्वास म्हणाले. दिल्लीच्या नागरिकांना मी शुभेच्छा देतो. भाजपा आता सरकार स्थापन करुन दिल्लीकरांची दहा वर्षांची दुःखं दूर करेल याची मला खात्री वाटते आहे असंही कुमार विश्वास यांनी म्हटलं आहे.
आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांना इतकंच सांगणं आहे स्वार्थी माणसाची साथ सोडा-कुमार विश्वास
आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांना मी सांगतो आहे की तुम्ही अशा एका व्यक्तीसाठी कार्यरत होतात ज्याने मित्रांच्या पाठीत खंजीर खुपसला, आपल्या गुरुंचा विश्वासघात केला, आपल्या बरोबर खांद्या खांदा लावून काम करणाऱ्या भगिनींना मारहाण केली. आपल्या सुखासाठी जनतेचे पैसे खर्च केले. आता त्या माणसाकडून आशा ठेवणं सोडून द्या असंही कुमार विश्वास म्हणाले.