देशात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर टीका टिप्पणी आणि आरोप प्रत्यारोप करण्यात येत आहेत. अशातच आता आरजेडीचे प्रमुख नेते लालू प्रसाद यादव हेदेखील सक्रीय झाले असून त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर खोचक शब्दात टीका केली आहे. पाकिस्तान, कब्रिस्तान, हिंदू मुस्लीम, मंदिर मशीद हे मोदींचे आवडते शब्द असल्याचे ते म्हणाले. एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
मागील काही दिवसांपासून प्रचारसभेत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेस आणि इंडिया आघाडीवर जोरदार शाब्दीक हल्ला चढवला आहे. यावेळी बोलताना त्यांनी अनेकदा हिंदू मुस्लीम, पाकिस्तान, कब्रिस्तान मंगळसूत्र या शब्दांचा उल्लेख केला आहे. यावरूनच लालू प्रसाद यादव यांनी त्यांना टोला लगवला आहे.
नेमकं काय म्हणाले लालू प्रसाद यादव?
आज हिंदी भाषेत सुमारे १.५ लाख शब्द बोलले जातात आणि अभ्यासाच्या सर्व शाखांमध्ये तांत्रिक शब्दांसह सुमारे ६.५ लाख शब्द आहेत, परंतु देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सर्वात आवडते शब्द कोणते असतील तर ते पाकिस्तान, स्मशानभूमी, कब्रिस्तान, हिंदू मुस्लीम, मंदिर मशीद, मासे-मुघल, गाई-म्हशी, हे आहेत, असा टोला लालू प्रसाद यादव यांनी लगावला आहे.
वरील शब्दांची यादी केवळ पहिल्या दोन टप्प्यांच्या निवडणुकांपर्यंतची आहे. शेवटच्या म्हणजे सातव्या टप्प्यापर्यंत या यादीत काही नावं आणखी जोडली जाऊ शकतात. नोकरी-रोजगार, गरीबी-शेतकरी, महागाई-बेरोजगारी, विकास- गुंतवणूक, विद्यार्थी, विज्ञान, युवक इत्यादी मुद्दे मोदी विसरले आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.