Latur City Assembly Constituency: देशमुख गढीचं यावेळीही लातूरवर वर्चस्व? महायुतीचा उमेदवार कोण?

Latur City Assembly Constituency Maharashtra Assembly Election 2024: लातूर शहर विधानसभेत भाजपाने आजवर एकदाही खाते उघडलेले नाही. याठिकाणी देशमुख आणि चाकूरकर यांचेच वर्चस्व राहिले. हे वर्चस्व मोडून काढण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे.

Latur City Assembly Constituency Amit Deshmukh
लातूर शहर विधानसभेत अमित देशमुखांच्या विरोधात उमेदवार कोण असणार? (Photo – Loksatta Graphics)

Latur City Assembly Constituency Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचा गड मानल्या जाणाऱ्या लातूर शहर विधानसभा मतदारसंघात भाजपाचे कमळ फुलविण्याचा प्रयत्न गेल्या अनेक निवडणुकांपासून होत आहे. २०१४ पासून केंद्र आणि राज्यात भाजपाचे वर्चस्व असले तरी लातूर शहरात मात्र त्याचा काहीही परिणाम जाणवला नाही. २००९ पासून अमित देशमुख हे लातूर शहरातून निवडून येत आहेत. यंदा चौथ्यांदा त्यांनाच इथून उमेदवारी मिळेल, हे निश्चित मानले जाते. त्याआधी पाच वेळा विलासराव देशमुख यांनी लातूर विधानसभेचे प्रतिनिधित्व केले होते.

लातूर शहर विधानसभेचा इतिहास

१९६७ साली संयुक्त सोशालिस्ट पार्टी आणि १९९५ साली जनता दलाचा अपवाद वगळता १९५७ पासून लातूर विधानसभेत फक्त काँग्रेसचा बोलबाला दिसून आला आहे. १९७३ आणि १९७८ साली माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्यानंतर १९९५ चा अपवाद वगळता १९८० पासून विलासराव देशमुख २००४ पर्यंत पाचवेळा येथून निवडून आले होते. त्यांच्यानंतर मुलगा अमित देशमुख विजयाचा वारसा सांभाळत आहे. २०१४ पासून भाजपाने इथे पाय रोवण्याचे प्रयत्न केले. पण त्यांना यात अपयश आले.

भाजपाची रणनीती काय?

अमित देशमुख आणि काँग्रेसच्या वर्चस्वाला धक्का देण्यासाठी भाजपाने लोकसभा निवडणुकीआधी शिवराज पाटील यांच्या स्नुषा अर्चना पाटील यांना भाजपामध्ये प्रवेश देण्यात आला. लोकसभेला यानिमित्ताने लिंगायत मते मिळावीत आणि विधानसभेला देशमुख यांच्यासमोर आव्हान निर्माण करण्यात यावे, यासाठी ही खेळी खेळल्याचे बोलले गेले. मात्र अर्चना पाटील यांच्या प्रवेशानंतर भाजपाच्या संघटनात्मक अडचणीतच वाढ झाली. अर्चना पाटील चाकूरकरांऐवजी कोणालाही तिकीट द्या, आम्ही सगळे एकत्र काम करू अशी भूमिका लातूर शहर भाजपा संघनटनेने घेतली आहे. यापूर्वी सलग दोन वेळा काँग्रेस मधून आलेले शैलेश लाहोटी यांना भाजपने उमेदवारी दिली व आता नव्याने डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर यांचे नाव चर्चेत आहे. शहरातील शहर जिल्हाध्यक्ष देविदास काळे, प्रदेश प्रवक्त्या प्रेरणा होनराव, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांच्यासह १५ जणांनी लातूर विधानसभा मतदार संघातून उमेदवारीसाठी पक्षाकडे मागणी केली आहे.

देवघराचा आशीर्वाद कुणाला?

शिवराज पाटील यांच्या निवासस्थानाचे नाव ‘देवघर’ असे आहे. देशमुख गढी आणि देवघर या दोन वास्तूंभोवती लातूरचे राजकारण अनेक वर्ष घुटमळत आहे. अर्चना पाटील यांचा भाजपामध्ये प्रवेश झाल्यानंतर काँग्रेसचे नेते, आमदार अमित देशमुख माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हणाले, “सत्ताधाऱ्यांनी अनेक घरे फोडली त्यात लातूर अपवाद राहील असे वाटले होते. पण लातूरातील ‘देवघर’ही फोडले. मात्र ‘देव’ आपल्या सोबत आहे.” हा देव म्हणजे प्रत्यक्ष शिवराज पाटील चाकूरकर हे आहेत, असे देशमुख यांना सुचवायचे होते. भाजपाने उमेदवार म्हणून अर्चना पाटील यांचे नाव पुढे केले तर चर्चा ‘देव’ आणि ‘देवघर’ अशी व्हावी, याची तजवीज त्यांनी केल्याचे मानले जाते.

लातूर जिल्ह्यात मराठा समाजासह लिंगायत मतांची मोठी संख्या आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने लिंगायत मतांना स्वतःकडे वळविण्यात यश मिळवल्यामुळे महाविकास आघाडीच्या शिवाजी काळगे यांचा विजय सुकर झाला. आता विधानसभा निवडणुकीतही लिंगायत समाज आपले मत काँग्रेसच्या पारड्यात टाकणार का? हे निवडणुकीनंतर कळू शकेल.

अमित देशमुख यांनी शिवराज पाटील यांना देवाची उमपा दिली असली तरी विलासराव देशमुख असल्यापासून चाकूरकर आणि देशमुख कुटुंबात फारसे सख्य नव्हते. त्यामुळे हा देव यंदा देशमुखांना पावणार का? हाही कळीचा मुद्दा आहे.

लातूर शहर विधानसभा मतदारसंघाचा २०१९ चा निकाल –

१. अमित विलासराव देशमुख (काँग्रेस) – १,११,१५६

२. शैलेश लाहोटी (भाजपा) – ७०,७४१

३. राजासाब मणियार (वंचित बहुजन आगाडी) – २४,६०४

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Latur city assembly constituency election 2024 amit vilasrao deshmukh result congress bjp candidate kvg

First published on: 09-10-2024 at 11:45 IST
Show comments