लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. ११ एप्रिलपासून मतदानाला सुरूवात होणार आहे. एकूण सात टप्यात देशभरात मतदान होणार आहे. हे मतदान EVMद्वारे होणार आहे. EVMमध्ये यावेळी उमेदवाराचा फोटो देखील असणार आहे. जर यादीमध्ये दिलेल्या उमेदवारांपैकी एकही उमेदवार पसंत नसेल तर? तर अशावेळी NOTA चा पर्याय निवडणूक आयोगाने दिला आहे. पण नोटा म्हणजे काय? तर नोटा म्हणजे None Of The Above (‘यापैकी कुणीही नाही’). जर EVM वर असलेला उमेदवार तुम्हाला पसंत नसेल तर नोटाला मत देऊ शकता.
कोर्टाच्या निर्णयानंतर पहिल्यांदा नोटाचा वापर २०१३ मध्ये झाला. छत्तीसगड, मिझोरम, राजस्थान आणि मध्यप्रदेश, दिल्ली या ठिकाणी झालेल्या मतदानावेळी नोटाचा वापर झाला होता. या लोकसभेला ९० कोटी मतदार आहेत. गेल्या वर्षी ६६ टक्के मतदान झालं होतं. त्यांच्यापैकी एक ते दोन टक्के मतदार नोटाचा वापर करू शकतात असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
नोटाचा वापर कसा –
NOTA म्हणजे None Of The Above. वरीलपैकी कोणताच उमेदवार पसंत नसेल तर सर्वांत खाली एक बटण असतं. ते दाबलं तर वरीलपैकी कोणताच उमेदवार पसंत नाही असं मत देता येतं.
किती टक्के लोक नोटा वापरतात?
नोटा’कडे अधिकाधिक मतदारांचा कल २०१७ च्या गुजरात विधानसभेच्या निवडणुकीपासून दिसून येऊ लागला. या निवडणुकांत साडेपाच लाख मतदारांनी (जवळपास दोन टक्के मतदारांनी) ‘नोटा’ हा पर्याय निवडला, ज्यातून आपली नाराजी तर व्यक्त केलीच, पण कोणत्याच राजकीय पक्षावर विश्वास उरला नसल्याचे दाखवून दिले. या निवडणुका अत्यंत चुरशीच्या झाल्या आणि यात तब्बल ३० विधानसभा जागांच्या निकालांवर ‘नोटा’चा थेट परिणाम झाला. त्यानंतर झालेल्या २०१८ मधील कर्नाटक निवडणुकांतही साडेतीन लाख मतदारांनी (एक टक्का मतदार) ‘नोटा’चा वापर केला आणि सात विधानसभा मतदारसंघांतील निकालावर त्यांचा थेट परिणाम झाला. त्यानंतर समाजमाध्यमातील फौजा परत एकदा कामाला लागल्या आणि ‘नोटा’ला मत देणे म्हणजे मत वाया घालवणे येथपासून ‘नोटा’ला मत देणारे देशद्रोही आहेत येथपर्यंत आगपाखड करण्यात आली. मात्र या कशालाही न जुमानता नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांत १५ लाख मतदारांनी ‘नोटा’चा वापर केला. मध्य प्रदेशात साडेपाच लाख मतदारांनी (१.४ टक्के मतदारांनी) ‘नोटा’ पर्याय वापरला, ज्याचा थेट परिणाम तब्बल २३ विधानसभा निकालांवर झाला. राजस्थानमध्ये साडेचार लाख मतदारांनी (१.३ टक्के मतदार) ‘नोटा’चा वापर केल्याने १५ मतदारसंघांतील निकालांवर थेट परिणाम झाला. छत्तीसगडमध्ये जवळपास तीन लाख मतदारांनी (दोन टक्के मतदार) ‘नोटा’चा वापर केल्याने आठ मतदारसंघांतील निकालांवर थेट परिणाम झाला.