India Lok Sabha Election 2024 Phase 2 Voting Updates, 26 April : जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा उत्सव म्हणजेच भारताची लोकसभा निवडणूक सुरू झाली आहे. आज (शुक्रवार, २६ एप्रिल) देशभरातील १३ राज्यातील ८८ लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. एकूण १२०६ उमेदवारांचं भवितव्य आज ईव्हीएममध्ये कैद होणार. आज ८९ मतदारसंघांमध्ये मतदान होणार होतं. मात्र मध्य प्रदेशच्या बेतूल मतदारसंघातील बसपाच्या उमेदवाराचं निधन झाल्यामुळे याठिकाणची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. महाराष्ट्रातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड आणि परभणी या मतदारसंघांमध्ये मतदानाला सुरुवात झाली आहे.

Live Updates

Lok Sabha Polls 2024 Phase Two Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात

20:17 (IST) 26 Apr 2024
बुलढाणा : नवरदेव बँड बाजासह मतदान केंद्रापर्यंत!

बुलढाणा: लाखो मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरविली असताना स्वतःच्या लग्नाच्या धामधुमीत अनेक नवरदेवांनी लगीनगाठ बांधण्यापूर्वी मतदानाचा हक्क बजावला. आज लग्नाची तिथी दाट होती. बहुतेक लग्न संध्याकाळची, यामुळे अनेक वरांनी लग्नासाठी मुलीच्या घरी सासुरवाडीला रवाना होण्यापूर्वी मतदान केले. त्यानंतरच वऱ्हाड लग्नाला निघाल्याचे सुखद चित्र पहावयास मिळाले. देऊळगाव राजा तालुक्यातील पिंपळगाव बुद्रुक येथील विकास गजानन गीते आणि बोरखेडी बावरीच्या संतोष शेरे यांचाही यामध्ये समावेश आहे.

18:21 (IST) 26 Apr 2024
सांगली : प्रतिस्पर्धी उमेदवारांकडून एकमेकांना शुभेच्छा

सांगली : निवडणूक म्हटलं की आरोप-प्रत्यारोप आलेच. सांगलीमध्येही निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेल्या उमेदवाराकडून प्रतिस्पर्धी उमेदवारांवर पहिलवान कोण यावरून वादंग होत असताना शुक्रवारी सकाळी उबाठा शिवसेनेचे उमेदवार डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील व अपक्ष उमेदवार विशाल पाटील हे प्रचारादरम्यान आमनेसामने आले. यावेळी दोघांनीही हस्तांदोलन करत निवडणुकीच्या एकमेकांना शुभेच्छा दिल्या.

सविस्तर वाचा...

18:08 (IST) 26 Apr 2024
महाराष्ट्रात दुष्काळात चारा पाठविला म्हणून ‘अमूल’वर मोदींनी भरला होता खटला, शरद पवार यांचा आरोप

सोलापूर : दहा वर्षांपूर्वी महाराष्ट्रात दुष्काळ पडला असताना आमच्या विनंतीनुसार गुजरातच्या अमूल कंपनीने जनावरांना जगविण्यासाठी चारा पाठवला होता. त्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी होते. परंतु अमूलने महाराष्ट्रात चारा पाठविल्याने चिडून मोदी यांच्या गुजरात सरकारने अमूलच्या प्रमुखांवर खटला भरला होता. महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांच्या जनावरांसाठी चारा पाठविणे हा अमूल कंपनीचा गुन्हा होता का, असा सवाल करीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते शरद पवार यांनी, आज तेच मोदी पंतप्रधान आहेत. त्यांची धोरणे शेतकरीविरोधीच आहेत, असा आरोप केला.

सविस्तर वाचा...

18:03 (IST) 26 Apr 2024
देशभरात ५ वाजेपर्यंत ६२ टक्के मतदानाची नोंद

17:34 (IST) 26 Apr 2024
नांदेड : व्हीव्हीपॅट, इव्हीएम मशिन कुर्‍हाडीने फोडली

नांदेड : नांदेड जिल्ह्यात सर्वत्र मतदान शांततेत सुरू असताना बिलोली तालुक्यातील रामतीर्थ येथे मात्र व्हीव्हीपॅट व इव्हीएम मशिन कुर्‍हाडीने फोडल्याची घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.

सविस्तर वाचा...

17:08 (IST) 26 Apr 2024
भिवंडीत महाविकास आघाडीत बंडखोरीची चिन्हे, मतदारसंघात पहिल्याच दिवशी ५४ अर्जांचे वितरण

ठाणे : भिवंडी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा), महायुतीचे उमदेवार कपिल पाटील आणि अपक्ष उमेदवार नीलेश सांबरे अशी तिरंगी लढत होणार असल्याचे चित्र असतानाच, पहिल्याच दिवशी तब्बल २५ उमेदवारांनी ५४ नामनिर्देशन अर्ज घेतले आहेत. यात काँग्रेस उमेदवारांचा समावेश असल्याने महाविकास आघडीत बंडखोरी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सविस्तर वाचा...

16:58 (IST) 26 Apr 2024
मेळघाटातील चार गावांचा मतदानावर बहिष्‍कार, कारण काय? जाणून घ्या…

अमरावती : मेळघाटातील रंगूबेली धोकडा, कुंड आणि खामदा या गावांमध्ये मतदान केंद्रांवर गावातील एकही नागरिक फिरकला नाही. ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकल्यामुळे या गावातील मतदान केंद्र ओस पडले आहे.

सविस्तर वाचा...

16:47 (IST) 26 Apr 2024
उरण परिसरात गावदेवांच्या जत्रा सुरू

चैत्र महिन्यात ग्रामीण भागातील सध्या ग्रामदैवत, देवीदेवतांच्या यात्रा-जत्रा यांची उरण तालुक्यात सुरुवात झाली आहे.

सविस्तर वाचा...

16:41 (IST) 26 Apr 2024
सातारा : यशवंतराव चव्हाणांना भारतरत्न पुरस्कार द्यावा, उदयनराजे करणार मोदींकडे शिफारस

वाई: महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे देशाच्या विकासातील योगदान लक्षात घेऊन त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अशी शिफारस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करणार असल्याची माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली आहे.

सविस्तर वाचा...

15:51 (IST) 26 Apr 2024
बुलढाणा: मतदानासाठी लगबग… तब्बल साडेचार कोटींची रक्कम… यंत्रणांची धावपळ, मात्र…

बुलढाणा: बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान होत असल्याने आपापल्या कामात व्यस्त यंत्रणांची एका अफवेने चांगलीच धावपळ आणि दमछाक झाली. ‘सोशल मीडिया’वरील तब्बल साडेचार कोटी रुपयांची रक्कम मेहकरमध्ये जप्त केल्याचे व तीन शिवसैनिकांना ताब्यात घेतल्याच्या मजकूर त्यामध्ये होता.

वाचा सविस्तर...

15:50 (IST) 26 Apr 2024
६० मुलांसह बापाने केले मतदान; पद्मश्री शंकरबाबा पापळकर यांच्‍या आश्रमाची ऐतिहासिक नोंद

अमरावती : रस्‍त्‍याच्‍या कडेला सोडून दिलेल्‍या बेवारस, दिव्‍यांग मुलांना पितृछत्र देऊन त्‍यांच्‍या पुनर्वसनासाठी आयुष्‍यभर धडपड करणारे ज्‍येष्‍ठ सामाजिक कार्यकर्ते शंकरबाबा पापळकर यांच्‍या अचलपूर तालुक्यातील वझ्झर येथील स्व. अंबादासपंत वैद्य दिव्यांग, बेवारस बालगृहाच्या इतिहासात मतदानाची महत्‍वपूर्ण नोंद झाली आहे.

वाचा सविस्तर...

15:29 (IST) 26 Apr 2024
"थोडं गरम व्हायला लागलं की राहुल गांधी...", देवेंद्र फडणवीसांचा टोला

जेव्हा ते जिंकतात, तेव्हा ईव्हीएम बरोबर असतं. जेव्हा ते हरतात, तेव्हा ईव्हीएमवर आक्षेप घेतात. आता तर ते सर्वोच्च न्यायालयावरही आक्षेप घ्यायला लागले आहेत. सर्वोच्च न्यायालयालाही त्यांनी याआधी सल्ले दिले आहेत. न्यायव्यवस्थेकडे चुकीची मागणी करून ती मान्य झाली पाहिजे असा अट्टाहास करणं चुकीचं आहे. मोदीजी २४ तास काम करतात. ऊन-वारा-पाऊस बघत नाहीत. राहुल गांधी थोडं गरम व्हायला लागलं की विदेशात जातात. मग लोक कुणाला मतदान करणार?

15:28 (IST) 26 Apr 2024
मुंबई – गोरखपूर, दानापूर १२ विशेष रेल्वेगाड्या

मध्य रेल्वे उन्हाळ्याची सुट्टी आणि निवडणुकीच्या मतदानासाठी मतदारांना जाता यावे यासाठी विशेष रेल्वेगाड्यांची सुविधा उपलब्ध केली आहे.

सविस्तर वाचा...

14:36 (IST) 26 Apr 2024
अमरावती : अचलपूर येथील सिटी हायस्कूल मधील एका मतदान केंद्रावर यंत्रात बिघाड झाल्याने मतदारांना पाऊण तास ताटकळत उभे राहावे लागले. अमरावती शहरातील रुक्मिणीनगर भागातील महापालिकेच्‍या शाळा क्रमांक १९ मध्‍ये देखील मतदान यंत्रातील बिघाडामुळे अर्ध्‍या तासाचा वेळ वाया गेला.

अमरावती : अचलपूर येथील सिटी हायस्कूल मधील एका मतदान केंद्रावर यंत्रात बिघाड झाल्याने मतदारांना पाऊण तास ताटकळत उभे राहावे लागले. अमरावती शहरातील रुक्मिणीनगर भागातील महापालिकेच्‍या शाळा क्रमांक १९ मध्‍ये देखील मतदान यंत्रातील बिघाडामुळे अर्ध्‍या तासाचा वेळ वाया गेला.

वाचा सविस्तर...

14:34 (IST) 26 Apr 2024
मोबाईलच्या प्रकाशात करावी लागली मतदानाची तयारी; मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांचे बेहाल…

बुलढाणा : महावितरणची ‘लाईन गुल’ झाल्याने मतदान कर्मचाऱ्यांना चक्क मोबाईल टॉर्चच्या अपुऱ्या प्रकाशात मतदानाची पूर्व तयारी करावी लागली. यामुळे त्यांच्या आराम व झोपेचे ही खोबरे झाले!

वाचा सविस्तर...

14:32 (IST) 26 Apr 2024
मन जिंकलस भावा! मतदानासाठी सिंगापूरवरून गाठले अकोला; विदेशातील तरुण विद्यार्थ्याला राष्ट्रीय कर्तव्याचे भान

अकोला : शिक्षण व नोकरीच्या निमित्ताने विदेश गाठणारे मतदानाकडे पाठ फिरवल्याचे चित्र नेहमीच दिसून येते. मात्र, विदेशात शिक्षण घेणाऱ्या एका तरुण विद्यार्थ्याने राष्ट्रीय कर्तव्याचे भान जोपासात मतदानासाठी सिंगापूरवरून थेट अकोला गाठले. तरुणाने आपला मतदानाचा हक्क बजावला.

वाचा सविस्तर...

14:31 (IST) 26 Apr 2024
पनवेलमधील शोरुममध्ये पावणेदोन लाखांची चोरी

पनवेल : पनवेल शहरातील शीव पनवेल महामार्गालगत पनवेल इंडस्ट्रीयल कॉ.ऑप. इस्टेटमधील हॉलमार्क मोटार कंपनीच्या शोरुममध्ये बुधवारी पहाटे पावणेदोन लाख रुपयांची चोरी झाली आहे. चोरट्याने शोरुममध्ये शिरुन लॅपटॉप, मोबाईल फोन आणि रोख रक्कम चोरी केली आहे. याबाबत पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला असून चोरट्यांचा शोध पोलीस घेत आहेत.

वाचा सविस्तर...

14:30 (IST) 26 Apr 2024
हिंगोलीत अनेक मतदान केंद्रावर बिघाड

हिंगोली लोकसभा मतदारसंघात सुरू असलेल्या मतदान प्रक्रियेदरम्यान काही केंद्रांवर मतदान, व्हीव्हीपॅट यंत्रणांमध्ये बिघाड असल्याचे आढळून आले. प्राथमिक माहितीनुसार मतदार संघातील ३९ केंद्रांवर बिघाडाच्या संदर्भाने तक्रारी पुढे आल्या. हिंगोलीचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, किनवट व हदगाव तालुक्यातील अनुक्रमे टाकळी व कोहळा येथीलसह वडगावमधील केंद्रावर बिघाडाच्या तक्रारी आल्या आणि तातडीने त्या बदलून १५ मिनिटात चाचणी घेऊन मतदानाची दुसरे यंत्र तेथे ठेवण्यात आली. १६ मतदान यंत्र (सीव्ही) व २५ व्हीव्हीपॅट बदलण्यात आली. अन्य कुठेही तक्रारी नसून मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू आहे.

13:44 (IST) 26 Apr 2024
देशभरात १ वाजेपर्यंत ४० टक्के मतदानाची नोंद

आसाम - ४६.३१ %

बिहार - 33.80 %

छत्तीसगड - ५३.०९ %

जम्मू आणि काश्मीर - ४२.८८%

कर्नाटक - ३८.२३ %

केरळ - ३९.२६ %

मध्य प्रदेश - ३८.९६ %

महाराष्ट्र - ३१.७७ %

मणिपूर - ५४.२६ %

राजस्थान - ४०.३९ %

त्रिपुरा - ५४.४७ %

उत्तर प्रदेश - ३५.७३%

पश्चिम बंगाल - ४७.२९ %

13:29 (IST) 26 Apr 2024
यवतमाळ-वाशिममध्ये सकाळी नऊपर्यंत केवळ ७.२३ मतदान, समर्थकांमध्ये धाकधूक

यवतमाळ : यवतमाळ- वाशिम लोकसभा मतदारसंघात आज शुक्रवारी सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली. मात्र, पहिल्या टप्प्यात मतदानाने दोन आकडी टक्केवारीही गाठली नाही. सकाळी नऊ वाजेपर्यंत ७.२३% इतके मतदान झाले होते.

वाचा सविस्तर...

13:28 (IST) 26 Apr 2024
अनिल देशमुख, सुनील केदार, अभिजित वंजारी वर्धा जिल्ह्यातून तडकाफडकी हद्दपार, जाणून घ्या कारण…

वर्धा : लोकसभा निवडणुकीत उमेदवाराच्या मदतीस किंवा प्रचारासाठी आप्त किंवा मित्र मंडळी येत असतात. तसेच पक्षाचे बडे नेते तळ ठोकून बसतात. आघाडीचे अमर काळे यांच्यासाठी पण बाहेरील जिल्ह्यातून बडे नेते, आप्त तळ ठोकून बसली हाती.

वाचा सविस्तर...

13:27 (IST) 26 Apr 2024
अमरावती : आधी मतदान; मग वऱ्हाड घेऊन नवरदेव रवाना…

अमरावती : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात अमरावती लोकसभा मतदारसंघात आज सकाळी मतदानाला सुरुवात झाली. मतदानासोबतच आज मोठ्या संख्येने लग्नाचे मुहूर्त देखील आहेत. अमरावतीच्या वडरपुरा परिसरातील नवरदेव लग्नासाठी वऱ्हाड घेऊन वर्धा येथे जाण्यापूर्वी मतदान केंद्रावर पोहोचून त्याने मतदानाचा हक्क बजावला.

वाचा सविस्तर...

13:27 (IST) 26 Apr 2024
नागपूर : उपराजधानीतून तीन वर्षांत ११९५ अल्पवयीन मुली बेपत्ता

नागपूर : गृहमंत्र्यांचे शहर असलेल्या नागपुरातून गेल्या तीन वर्षांत तब्बल ११९५ अल्पवयीन घरातून बेपत्ता झाल्या आहेत. या सर्व मुली अल्पवयीन असल्यामुळे पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. बेपत्ता होणाऱ्या मुलींमध्ये दहावी-बारावीच्या सर्वाधिक मुलींचा समावेश असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने पालकवर्गात चिंतेचे वातावरण आहे.

वाचा सविस्तर...

13:24 (IST) 26 Apr 2024
आमदार बच्‍चू कडूंचे आधी रक्‍तदान, मग मतदान

प्रहार जनशक्‍ती पक्षाचे आमदार बच्‍चू कडू यांनी आज सपत्‍निक मतदानाचा हक्‍क बजावला. बच्‍चू कडू यांनी ११५ वेळा रक्‍तदान केले आहे. काल त्‍यांनी रक्‍तदान करून आज सकाळी मतदानाचा अधिकार बजावला. सविस्तर वाचा

13:22 (IST) 26 Apr 2024
महाकाय तुळई समुद्रात स्थापन, मुंबई किनारी रस्ता प्रकल्प आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू मार्गाची जोडणी यशस्वी

किनारी रस्ता आणि वांद्रे - वरळी सागरी सेतूला सांधणाली पहिली महाकाय तुळई (बो आर्च स्ट्रिंग गर्डर) जोडण्यात मुंबई महानगरपालिकेला यश आले.

सविस्तर वाचा...

13:12 (IST) 26 Apr 2024
कल्याणमध्ये दारूची बाटली डोक्यात पडल्याने विद्यार्थी गंभीर जखमी

कल्याण पूर्वेतील काटेमानिवली भागात गुरुवारी रात्री आपली खासगी शिकवणी संपून एक विद्यार्थी घरी चिंचपाडा येथील आपल्या घरी पायी चालला होता.

सविस्तर वाचा...

12:48 (IST) 26 Apr 2024
"केंद्र सरकार भांडलवदारांचं हित जोपासत कामगारांवर अन्याय करतंय, विचार करून मतदान करा", कर्मचारी संघटनेचं मतदारांना आवाहन

राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने देशभरातील मतदारांना पत्राद्वारे आव्हान केलं आहे.

विषय : मतदान करताना सजगता बाळगा !

बंधू-भगिनिंनो,

आपणांस माहित आहेच की, सद्यस्थितीतील केंद्र सरकार हे सातत्याने कामगारांवर अन्याय करीत असून भांडवलदारांचे हित जोपासत आहे. भांडवलदारांच्या दबावापोटी कामगार संघटनांनी १३० वर्षांपासून लढून मिळवलेले ४४ कामगार कायदे रद्द करुन त्या जागी ४ श्रमसंहिता आणल्या आहेत.

कामगारविरोधी धोरणांमुळे कायमस्वरुपाच्या नोकऱ्या संपुष्टात येणार आहेत.

खासगीकरण आणि कंत्राटीकरणाद्वारे सरकारी आणि सार्वजनिक सेवांमधील कर्मचारी पदभरती थांबविण्यात आली असून अनेक कामे आऊट सोर्सिगद्वारे करुन घेण्यात येत आहेत. केंद्र सरकारी कर्मचारी आणि राज्य सरकारी कर्मचारी यांचे भविष्य अंधःकारमय करणारा अंशदायी पेन्शन योजना PFRDA अॅक्ट रद्द करण्यासाठी लाखो कर्मचाऱ्यांनी सातत्याने देशव्यापी आंदोलने करुनही सरकार या संदर्भात दुराग्रह सोडायला तयार नाही.

केंद्रीय वेतन आयोगाची स्थापना दर १० वर्षांनी होत असते. त्याचा लाभ राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनासुध्दा होतो. सांप्रत केंद्र सरकारने अद्याप आठव्या वेतन आयोगाची स्थापना केलेली नसून तसा विचारही नसल्याचे निवेदन संसदेत केले आहे. ही बाब अतिशय गंभीर आहे.

देशात लक्षावधी सरकारी पदे रिक्त असून त्या पदांचा कार्यभार कार्यरत कर्मचाऱ्यांना सांभाळावा लागत असल्याने त्यांची मानसिक व शारिरीक अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे.

आशा सेविका, अंगणवाडी, महिला परिचर यांच्या मानधन वाढीचा प्रश्न संपूर्णतया सुटलेला नाही. त्यांना कामगार हा दर्जा देण्यासही सरकार तयार नाही.

देशातील शेतकरी संकटात असून स्वामीनाथन आयोग लागू करावा. शेतमालाला आधारभूत दर द्या या मागण्यांबाबत आश्वासन देऊनही सरकार अंमलबजावणीस टाळाटाळ करीत आहे. या कारणाने शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढत चालले आहे.

12:36 (IST) 26 Apr 2024
यवतमाळ : मतदानासाठी जिल्हाधिकारीही रांगेत; अनेक नवरदेवांची वरात पहिले मतदान केंद्रांवर...

वाशिम लोकसभा मतदारसंघात सकाळी ९ नंतर मतदानासाठी गर्दी होत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. दरम्यान यवतमाळचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी सर्वसामान्य मतदरांप्रमाणे रांगेत उभे राहून मतदान केले.

सविस्तर वाचा

12:10 (IST) 26 Apr 2024
वाशीम जिल्ह्यात सकाळी मतदान संथगतीने

यवतमाळ वाशीम लोकसभा मतदारसंघासाठी जिल्ह्यातील मतदान केंद्रात सकाळी ९ वाजेपर्यंत ७.६१ टक्के मतदान झाले.

सविस्तर वाचा...

11:31 (IST) 26 Apr 2024
अकोल्यात पहिल्या दोन तासात ७.१७ टक्के मतदान; उमेदवार प्रकाश आंबेडकर, अनुप धोत्रे, डॉ. अभय पाटील यांनी बजावला हक्क

अकोला : अकोला लोकसभा मतदार संघात सकाळी ७ वाजतापासून मतदानाला प्रारंभ झाला. नवमतदारांमध्ये उत्साह दिसून येत आहे. पहिल्या दोन तासात ७.१७ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. उमेदवार प्रकाश आंबेडकर, अनुप धोत्रे, डॉ. अभय पाटील यांनी मतदान करून आपले कर्तव्य बजावले.

सविस्तर वाचा...

Elections in eight constituencies today in the second phase in the maharashtra state

आठही मतदारसंघांत चुरशीच्या लढती; दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान

राज्यात दुसऱ्या टप्प्यात आज आठ मतदारसंघांमध्ये होणाऱ्या निवडणुकीत चुरशीच्या लढती होणार आहेत. प्रकाश आंबेडकर, नवनीत राणा, प्रतापराव जाधव, संजय जाधव, प्रतापराव चिखलीकर आदी उमेदवारांचं भवितव्य ठरणार आहे. विदर्भातील पाचपैकी वर्धा, यवतमाळ-वाशीममध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी थेट लढत होत असून अकोला, अमरावती आणि बुलढाणा या मतदारसंघात तिरंगी लढत आहे. येथे तिसऱ्या उमेदवाराकडून होणारे मतविभाजन निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.

अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजप, काँग्रेस आणि प्रहार जनशक्ती पक्षात तिरंगी लढत होत आहे. एकूण ३७ उमेदवार रिंगणात असून बहुसंख्य कुणबी-मराठा मतदारांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पािठब्यावर अपक्ष निवडून आलेल्या नवनीत राणा यावेळी भाजपच्या उमेदवार आहेत. काँग्रेसतर्फे बळवंत वानखेडे तर बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्तीचे दिनेश बुब रिंगणात आहेत. विशेष म्हणजे, बच्चू कडू महायुतीत असूनही त्यांनी राणांविरुद्ध उमेदवार दिला असून राणांचा पराभव हेच आपले ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Story img Loader