India Lok Sabha Election 2024 Phase 3 Voting Updates, 07 May : देशात यंदा लोकसभा निवडणूक एकूण सात टप्प्यांत होत आहे. यापैकी १९ एप्रिलला पहिला टप्पा आणि २६ एप्रिलला दुसरा टप्पा पार पडला आहे. आज (मंगळवार, ७ मे) लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. यामध्ये इंडिया आघाडी आणि भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीत चुरस निर्माण झाली आहे. तिसऱ्या टप्प्यात देशातील १० राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशामधील एकूण ९३ जागांसाठी मतदान होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ११ लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. या टप्प्यात मतदान होणाऱ्या महाराष्ट्रातील काही मतदारसंघाकडे अवध्या देशाचे लक्ष लागलं आहे. यात बारामती, कोल्हापूर, सांगलीसह इतर काही मतदारसंघांचा समावेश आहे.

Live Updates

Lok Sabha Polls 2024 Phase Three Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील एकूण ११ मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे

08:24 (IST) 7 May 2024
अजित पवारांच्या मातोश्रींनी बजावला मतदानाचा हक्क

अजित पवार यांच्या मातोश्री आशा अनंतराव पवार आणि बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुनेत्रा अजित पवार यांनी काटेवाडी येथील शाळेमध्ये सकाळी सव्वासात वाजता मतदान केले.

07:32 (IST) 7 May 2024
सुशीलकुमार शिंदे – प्रणिती शिंदेंचं सोलापुरात मतदान

माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, त्यांच्या पत्नी, आमदार तथा सोलापूर लोकसभेच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी पहाटेच मतदानाचा अधिकार बजावला.

07:30 (IST) 7 May 2024
अजित पवार-सुनेत्रा पवारांचं काटेवाडीत मतदान

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी तथा बारामती लोकसभेच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी काटेवाडी या त्यांच्या मूळ गावी जाऊन मतदानाचा हक्क बजावला.

06:52 (IST) 7 May 2024
तिसऱ्या टप्प्यात ९३ मतदारसंघांमध्ये मतदान

देशात लेकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात एकूण ९३ जागांवर मतदान होत आहे. यात १.८८ कोटी पेक्षा जास्त मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये उत्तर प्रदेशातील १०, बिहार ५, मध्य प्रदेशातील ९, पश्चिम बंगाल ४, महाराष्ट्र ११, कर्नाटक १४, छत्तीसगड ७, गोवा २, आणि दादरा नगर हवेली आणि दमण-दीव- २, गुजरात २५, आसाम ४ अशा एकूण ९३ जागांसाठी मतदान होणार आहे.

06:51 (IST) 7 May 2024
रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये राणे विरुद्ध राऊत

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात भाजपाचे नारायण राणे यांच्याविरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे विनायक राऊत तर साताऱ्यात भाजपाचे उदयनराजे भोसले यांच्याविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे, सोलापूरमध्ये भाजपाचे राम सातपुते यांच्याविरुद्ध काँग्रेसच्या प्रणिती शिंदे, माढा मतदारसंघात भाजपाचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील, लातूरमध्ये भाजपाचे सुधाकर श्रृंगारे यांच्याविरुद्ध काँग्रेसचे शिवाजीराव कलगे, धाराशिवमध्ये अजित पवार गटाच्या अर्चना पाटील यांच्याविरुद्ध ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर, रायगडमध्ये अजित पवार गटाचे सुनील तटकरे यांच्याविरुद्ध ठाकरे गटाचे अनंत गीते यांच्यात लढत होणार आहे.

06:46 (IST) 7 May 2024
कोल्हापूर-बारामतीत कांटे की टक्कर

कोल्हापुरात शाहू महाराज आणि विद्यमान खासदार तथा महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्यात कांटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. तर, हातकणंगलेमध्ये ठाकरे गटाचे सत्यजित पाटील, महायुतीचे धैर्यशील माने आणि शेतेकरी राजू शेट्टी यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. सांगलीत महायुतीचे संजय काका पाटील यांच्याविरुद्ध ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील आणि अपक्ष विशाल पाटील (काँग्रेसचे माजी नेते) यांच्यात लढत होत आहे. बारामतीमध्ये महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरुद्ध महायुतीच्या सुनेत्रा पवार (उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी) यांच्यात सामना होणार आहे.

राज्यातील ‘या’ ११ मतदारसंघात मतदान

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यांत महाराष्ट्रातील कोल्हापूर, लातूर, बारामती, माढा, हातकणंगले, रायगड, धाराशिव (उस्मानाबाद), रत्नागिरी-सिंधुदुर्ग, सोलापूर, सांगली आणि सातारा या ११ मतदारसंघात ७ मे रोजी मतदान होत आहे. बारामती, कोल्हापूर, सांगलीकडे राज्याचे लक्ष असणार आहे. कारण मागील काही दिवसांपासून हे मतदारसंघ जास्त चर्चेत राहिले आहेत. या ११ लोकसभा मतदारसंघांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीमधील दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.