Lok Sabha Election 2024 Result : लोकसभा निवडणुकीत अनेक धक्कादायक निकाल पाहायला मिळत आहेत. राज्यात महाविकास आघाडीचा मोठा विजय झाल्याचे दिसत आहे. महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यामुळे या दोन पक्षाच्या गटांत मोठी चुरस पाहायला मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाने महाराष्ट्रात चार ठिकाणी तर लक्षद्विपमध्ये एका ठिकाणी आपले उमेदवार उभे केले होते. त्यापैकी बारामती, शिरूर आणि लक्षद्विपमध्ये दोन्ही राष्ट्रवादीत थेट लढत होती. बारामती आणि शिरूरमध्ये शरद पवार गटाच्या उमेदवारांचा विजय झाला तर लक्षद्विपमध्ये दोन्ही गटाच्या उमेदवारांचा पराभव झाला आहे. याठिकाणी काँग्रेसच्या उमेदवाराचा विजय झाला. मात्र अजित पवार गटाच्या उमेदवाराला केवळ २०१ मतं मिळाल्यामुळे त्यांचा लाजिरवाणा पराभव झाला आहे.
अमरावतीत भाजपाला मोठा धक्का; नवनीत राणांचा पराभव
लक्षद्विप लोकसभेत मागच्या दोन वेळेस संयुक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मोहम्मद फैजल हे खासदार राहिले होते. मात्र मागच्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर मोहम्मद फैजल हे शरद पवार गटाबरोबर राहिले होते. यावेळी फैजल तिसऱ्यांदा निवडणुकीला सामोरे गेले. तसेच अजित पवार गटाकडून युसूफ टीपी यांना उमेदवारी देण्यात आली होती. या मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार मोहम्मद हमदुल्ला सईद यांना २५,७२६ मते मिळाली आहेत. तर मोहम्मद फैजल यांना २३,०७९ मतं मिळाली आहेत. तर अजित पवार गटाच्या उमेदवाराला केवळ २०१ मतं मिळाली.
अजित पवार गटाला महाराष्ट्रातही मोठा फटका बसला आहे. बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राजकीय प्रतिष्ठा पणाला लावली होती. पत्नी सुनेत्रा पवार यांना सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उभे केले होते. सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुप्रिया सुळेंनी ३,४४,०८० मतं मिळवली तर सुनेत्रा पवार यांना केवळ २,९८,०२३ मतं मिळाली आहेत. दोघांच्या मतांमध्ये ४६,१४९ मतांचे अंतर आहे.
मुंबई उत्तर मध्यमधून वर्षा गायकवाड विजयी, साडेचार हजारांच्या फरकाने निकमांचा पराभव
शिरूर लोकसभेतही शरद पवार गटाचा मोठा विजय झाला आहे. याठिकाणी डॉ. अमोल कोल्हे यांनी तब्बल १ लाख २२ हजार ८३९ मतांची आघाडी घेऊन शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव केला आहे.