मुंबई : औरंगाबाद मतदारसंघातून शिवसेनेच्या शिंदे गटाने रोजगार हमी योजना आणि फलोत्पादनमंत्री संदीपान भुमरे यांची उमेदवारी अखेर शनिवारी जाहीर केली. हा मतदारसंघ शिवसेनेकडे कायम राहिल्याने गेली दीड वर्षे निवडणूक लढण्याची तयारी केलेले केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या मेहनतीवर पाणी फेरले गेले. औरंगाबादचा प्रश्न सुटला असला तरी ठाणे, नाशिक, पालघर आणि दक्षिण मुंबई या मतदारसंघांचा तिढा अद्यापही सुटू शकलेला नाही.
औरंगाबाद (शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर झाले असले तरी लोकसभा मतदारसंघाचे नाव औरंगाबादच आहे) लोकसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू होती. गेली दीड वर्षे या मतदारसंघातून निवडणूक लढविण्याच्या दृष्टीने केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी तयारी सुरू केली होती. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी औरंगाबाद सोडण्यास नकार दिल्याने शेवटी भाजपला हट्ट सोडून द्यावा लागला. शिवसेनेच्या ठाकरे गटाने ओबीसी समाजातील चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी दिल्याच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाने भुमरे यांना उमेदवारी देऊन ‘मराठा कार्ड’ खेळले आहे.
हेही वाचा >>> काँग्रेसकडून मराठवाडयाची कोंडी; नरेंद्र मोदी यांचे टीकास्त्र; रझाकारी मानसिकतेला थारा न देण्याचे आवाहन
भुमरे पैठण मतदारसंघातून चार वेळा विधानसभेवर निवडून आले आहेत. पण त्यांचा पैठण विधानसभा मतदारसंघ जालना लोकसभा मतदारसंघाला जोडलेला आहे. यामुळे शिंदे गटाचा उमेदवार मतदारसंघातील नाही हा प्रचार करण्यास खैरे यांना वाव मिळाला आहे. लोकसभा निवडणूक लढण्याची भुमरे यांची फार काही इच्छा नव्हती. पण शिंदे यांनी फारच आग्रह धरल्याने भुमरे तयार झाल्याचे सूत्राकडून सांगण्यात आले.
औरंगाबादमधून लढण्याची भाजपचे डॉ. कराड यांनी सारी तयारी केली होती. गेली दीड वर्षे वित्त खात्याच्या माध्यमातून शहरात बँकिंग मेळावे, कर्जवाटप असे विविध कार्यक्रम केले होते. हा मतदारसंघ भाजपला मिळाला पाहिजे या नेतेमंडळींनी आग्रह धरला होता. धार्मिक ध्रुवीकरणाची पार्श्वभूमी असलेल्या या मतदारसंघात शिवसेनेचाच उमेदवार टिकाव धरू शकतो हे शिंदे यांनी भाजप नेत्यांच्या निदर्शनास आणून दिले होते. यानुसार भाजपला औरंगाबादवरील हक्क सोडावा लागला.
भाजपचा मुंबईतील तिढा कायम
भाजपमध्ये उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातील उमेदवारीचा तिढा सुटलेला नाही. विद्यमान खासदार पूनम महाजन यांच्या उमेदवारीबाबत स्पष्टता नाही. मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांना लढण्याच्या आग्रह धरण्यात येत असला तरी त्यांची तयारी नसल्याचे समजते. भाजपने उत्तर मुंबईतून पियूष गोयल तर ईशान्य मुंबईतून मिहिर कोटेचा या दोन बिगर मराठी भाषकांना उमेदवारी जाहीर केली आहे. मुंबईत एक तरी मराठी नेत्याला उमेदवारी द्यावी लागणार आहे. यासाठीच भाजपचे नेते सध्या दक्षिण मुंबई मतदारसंघ वाटयाला येतो का, याची वाट बघत आहेत.
ठाणे, नाशिकचा तिढा कायम
* भुजबळ यांनी माघार घेतली असली तरी अद्याप नाशिकमधून शिंदे गटाला उमेदवार जाहीर करता आला नाही. गोडसे की नवा उमेदवार याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.
* रत्नागिरी-सिंधुदुर्ग भाजपला सोडल्याने ठाणे आता शिंदे गटाकडे कायम राहील, असे शिवसेनेच्या वतीने सांगण्यात येत आहे. मात्र ठाण्याचा दावा भाजपने सोडल्याचे अद्याप स्पष्ट झालेले नाही.