लोकसभा निवडणुकीचे निकाल काही ठिकाणी समोर आले आहेत. तर काही ठिकाणचे निकाल थोड्या वेळात समोर येतील. सध्या देशात इंडिया आघाडी २३५ जागांवर आघाडीवर आहे. तर भारतीय जनता पार्टी २९० जागांवर आघाडीवर आहे. थोड्या वेळात सर्व निकाल स्पष्ट होतील. आता रायबरेली मतदारसंघातून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा तब्बल ४ लाख मतांनी विजय झाला आहे.

उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पार्टीला मोठा धक्का बसला आहे. उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाची ३६ जागांवर आघाडी आहे. तसेच काँग्रेस ६ जागांवर आघाडीवर आहे. समाजवादी पक्ष आणि काँग्रेस मिळून इंडिया आघाडीला ४२ जागांची आघाडी मिळाली आहे. तर भारतीय जनता पार्टी ३५ जागांवर आघाडीवर आहे. उत्तर प्रदेशमध्ये एकूण लोकसभेच्या ८० जागा आहेत. भारतीय जनता पार्टीच उत्तर प्रदेशमध्ये सध्या सरकार आहे. मात्र, तरीही भाजपाला निम्याही जागा मिळवण्यात यश आलं नाही.

हेही वाचा : “सोनं कोणाकडे आहे आणि दगडं कोणाकडे आहे, हे जनतेने दाखवून दिले” जितेंद्र आव्हाडांनी महायुतीवर ओढले ताशेरे

उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाला उत्तर प्रदेशमध्ये मोठं यश मिळण्याची शक्यता आहे. तर भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सपाचे नेते अखिलेश यादव यांच्या उत्तर प्रदेशमध्ये सभांना मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यांच्या या सभांची देशात चर्चा झाली होती. राहुल गांधी हे दोन लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. त्यापैकी रायबरेली मतदारसंघातून राहुल गांधी यांचा तब्बल ४ लाख मतांनी विजय झाला आहे. तर त्यांच्या विरोधातील भारतीय जनता पक्षाचे दिनेश प्रताप सिंह यांचा पराभव झाला आहे.

याबरोबरच राहुल गांधी केरळच्या वायनाड मतदारसंघातूनही आघाडीवर आहेत. थोड्या वेळात केरळच्या वायनाड मतदारसंघाचाही निकाल समोर येणार आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीचा सर्व जागांवरील निकाल थोड्या वेळात स्पष्ट होईल. त्या पार्श्वभूमीवर दिल्लीत राजकीय हालचालींना वेग आला आहे.

Story img Loader