लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर झाला. या निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळालं आहे. तर इंडिया आघाडीला २३२ जागा मिळल्या आहेत. भारतीय जनता पार्टीने लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ४०० पारचा नारा दिला होता. मात्र, ४०० पारचं भाजपाचं स्वप्न भंगलं आहे. जम्मू काश्मीरमध्ये कलम ३७० रद्द केल्यानंतर पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत दोन माजी मुख्यमंत्र्यांचा पराभव झाला आहे. जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांचा या निवडणुकीत पराभव झाला. तसेच माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांचाही पराभव झाला.
माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी बारामुल्ला लोकसभा मतदारसंघामधून ही निवडणूक लढवली होती. त्यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार अब्दुल राशिद शेख यांनी निवडणूक लढवली आणि ओमर अब्दुल्ला यांचा तब्बल दोन लाख मतांनी पराभव केला. या निवडणुकीच्या निकालाआधी एक्झिट पोलने ओमर अब्दुल्ला हे विजयी होतील असा अंदाज वर्तवला होता. मात्र, त्यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव झाला. विशेष म्हणजे अब्दुल राशिद शेख हे तुरुंगात आहेत. त्यांच्यावर यूएपीए अंतर्गत गुन्हा दाखल आहे. त्या प्रकरणी ते शिक्षा भोगत आहेत. पण त्यांनी ही निवडणूक तुरुंगातून लढवली आणि थेट माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचा पराभव केला.
हेही वाचा : “स्वतःला ईश्वराचा अवतार समजणाऱ्या मोदींचा…”, निवडणूक निकालानंतर ठाकरे गटाची बोचरी टीका
दुसरीकडे जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग-राजौरी लोकसभा मतदारसंघामध्ये पीडीपीच्या अध्यक्षा आणि माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांचाही मोठ्या मताधिक्यांनी पराभव झाला. मेहबूबा मुफ्ती यांच्या विरोधात मिया अल्ताफ अहमद हे निवडणुकीच्या मैदानात होते. मिया अल्ताफ अहमद यांनी मेहबूबा मुफ्ती यांचा तब्बल २८१,७९४ मतांनी पराभव केला. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत जम्मू-काश्मीरमध्ये मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. दरम्यान, जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक झाली. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं.
भाजपाचा किती जागांवर विजय झाला?
भाजपाचे जुगल किशोर यांनी जम्मूमधून काँग्रेसचे उमेदवार रमण भल्ला यांचा १,३५,४९८ मतांनी पराभव करत तिसऱ्यांदा विजय मिळवला. तसेच लडाखची एकमेव जागा एनसीचे माजी नेते मोहम्मद हनेफा यांनी जिंकली. भारतीय जनता पक्षाने २०१९ च्या कामगिरीची पुनरावृत्ती केली. कारण विद्यमान खासदार जुगल किशोर शर्मा आणि जितेंद्र सिंग यांनी अनुक्रमे जम्मू आणि उधमपूर लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला. पण गेल्या निवडणुकीच्या तुलनेत मतदानात घट झाल्याचं पाहायला मिळालं. तसेच केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांना ५७१,०७६ मते मिळाली. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे उमेदवार चौधरी लाल सिंग होते. जितेंद्र सिंह यांनी काँग्रेसच्या चौधरी लाल सिंह यांचा १२४,३७३ मतांनी पराभव केला.
दरम्यान, मेहबूबा मुफ्ती यांनी पराभव झाल्यानंतर एक्स या सोशम माध्यमावर पोस्ट शेअर करत पराभव मान्य करत जनतेचे आभार मानले. त्या म्हणाल्या, “लोकांच्या निकालाचा आदर करून मी पीडीपी कार्यकर्त्यांचे आणि नेत्यांचे पाठिंबा दिल्याबद्दल आभार मानते. ज्या लोकांनी मला मतदान केले त्यांचे मी मनापासून आभार मानतो. जिंकणे आणि हरणे हा एक भाग आहे आणि तो आम्हाला आमच्या मार्गापासून परावृत्त करणार नाही, मिया अल्ताफ अहमद यांचे विजयाबद्दल अभिनंदन”, असं मेहबूबा मुफ्ती यांनी म्हटलं.