Maharashtra Lok Sabha Result in Marathi : जून २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत फूट पडून दोन गट तयार झाले. तर जून २०२३ मध्ये अजित पवारांच्या बंडखोरीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट पडले. त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपा, काँग्रेस, शिवसेनेचा ठाकरे गट, शिवसेनेचा शिंदे गट, राष्ट्रवादीचा शरद पवार गट, राष्ट्रवादीचा अजित पवार गट हे प्रमुख सहा पक्ष मैदानात होते. यासह इतर लहान पक्षांनीही वेगवेगळ्या मतदारसंघात या सहा पक्षांसमोर आव्हान उभं केलं होतं. प्रामुख्याने महाराष्ट्रात महायुती (भाजपा, शिंदे गट, अजित पवार गट) विरुद्ध महाविकास आघाडी (काँग्रेस, ठाकरे गट, शरद पवार गट) यांच्यात संघर्ष चालू आहे. दरम्यान, या पक्षफुटीचा नेमका कोणाला फायदा होणार आणि कोण तोट्यात असणार? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महायुतीत भारतीय जनता पार्टी, शिवसेनेचा शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट, महादेव जानकरांचा राष्ट्रीय समाज पक्ष, रवी राणा यांचा युवा स्वाभिमान पक्ष यासह इतरही अनेक लहान पक्ष आहेत. मागील लोकसभा निवडणुकीत भाजपाने २५ जागा लढवल्या होत्या. त्यात त्यांचे २३ खासदार निवडून आले होते. तर संयुक्त शिवसेनेने २३ जागा लढवल्या होत्या. यापैकी त्यांचे १८ खासदार निवडून आले होते. मात्र युतीतले पक्ष वाढल्यामुळे जागावाटप करणं अवघड झालं होतं. शिवसेना पक्ष फुटल्यानंतर पक्षातील १८ पैकी १३ खासदार एकनाथ शिंदेंबरोबर गेले तर पाच खासदार उद्धव ठाकरे यांच्याबरोबर थांबले. त्यामुळे शिवसेनेच्या शिंदे गटाने महायुतीत १८ हून अधिक जागा मागितल्या. तर भाजपाचे विद्यमान २३ खासदार आहेत. याशिवाय इतर पक्षांनीही जागा मागितल्यामुळे महायुतीत प्रत्येक जागेसाठी अनेक दिवस रस्सीखेच पाहायला मिळाली. महायुतीत नाशिक, दिंडोरी, भिवंडी, दक्षिण मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, सिंधुदुर्ग-रत्नागिरी, ठाणे, पालघर, छत्रपती संभाजीनगर या लोकसभा मतदारसंघांवरून अनेक दिवस रस्सीखेच चालू होती. अखेर महायुतीत भाजपाला २८, शिवसेनेच्या शिंदे गटाला १५, अजित पवार गटाला ४ आणि रासपला १ जागा मिळाली.

दुसऱ्या बाजूला असाच संघर्ष महाविकास आघाडीतही झाला. शिवसेनेने मागील निवडणुकीत १८ जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे महाविकास आघाडीत शिवसेनेने सर्वाधिक जागा मागितल्या. अनेक दिवसांच्या चर्चा आणि बैठकांनंतर महाविकास आघाडीत शिवसेनेच्या ठाकरे गटाला २१, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटाला १० आणि काँग्रेसला १७ जागा मिळाल्या. जागावाटपादरम्यान बरेच दिवस रस्सीखेच चालली, परिणामी वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, आता निवडणुकीच्या निकालात या सहा पक्षांची स्थिती काय असेल असा प्रश्न अनेकांना पडला आहे. सकाळी १० वाजेपर्यंत समोर आलेल्या मतमोजणीनुसार पक्षफुटीनंतरही शिवसेनेच्या ठाकरे गटाने जोरदार पुनरागमन केल्याचं दिसत आहे. त्याचबरोबर काँग्रेसनेही महाराष्ट्राच्या राजकारणात पुनरागमन केलं आहे. भाजपाने अनेक पक्षांचं सहकार्य घेतलेलं असून, पंतप्रधान मोदींचे राज्यात झालेले २० हून अधिक दौरे, या सर्व परिश्रमांनंतरही त्यांच्या जागा फारशा वाढलेल्या दिसत नाहीत. टाईम्स नाऊच्या एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात भाजपा, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटाला मिळून (महायुती) २६ जागांवर विजय मिळेल. तर काँग्रेस, शिवसेनेचा ठाकरे गट आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला मिळून (महाविकास आघाडी) २२ जागांवर विजय मिळेल. लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि संयुक्त शिवसेनेची (उद्धव ठाकरे) युती होती. तेव्हा या युतीने राज्यात ४१ जागा जिंकल्या होत्या.

इतर सर्वेक्षणांमधील आकडेवारी

इंडिया न्यूज डी डायनॅमिक्स
महायुती – ३४
मविआ – १३
अपक्ष – १

न्यूज २४ चाणक्य
महायुती – ३३
मविआ – १५

रिपब्लिक भारत-मॅट्रीझ
महायुती – ३० ते ३५
मविआ – १३ ते १९

रिपब्लिक PMARQ
महायुती – २९
मविआ – १९

टीव्ही ९ पोलस्ट्राट
महायुती – २२
मविआ – २६

एबीपी-सी व्होटर
महायुती – २४
मविआ – २३

हे ही वाचा >> पंतप्रधान मोदी ६ हजार मतांनी पिछाडीवर जाताच काँग्रेसचा इशारा, ‘हा फक्त ट्रेलर’

जागावाटपात महायुतीत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला सर्वात कमी (४) जागा मिळाल्या होत्या. तसेच आतापर्यंत हाती आलेल्या एक्झिट पोल्सपैकी बहुसंख्य पोल्समध्ये अजित पवारांचा एकही उमेदवार जिंकणार नाही, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्याचबरोबर सकाळी १० वाजेपर्यंत हाती आलेल्या मतमोजणीनुसार अजित पवारांचे चारही उमेदवार पिछाडीवर आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत पक्षफुटीचा सर्वात मोठा तोटा अजित पवार गटाला बसत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lok sabha election results 2024 which political party gets benefits of split in maharashtra asc