नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी आज, मंगळवारी ४ जून सकाळी आठ वाजता सुरू होत आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत निकालाचे बहुतांश चित्र स्पष्ट होईल अशी अपेक्षा आहे. जवळपास सर्व मतदानोत्तर चाचण्यांमध्ये भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला ३५० ते ४०० पर्यंत जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर विरोधकांच्या ‘इंडिया’ने या चाचण्यांचे अंदाज खोटे ठरून आपल्याला किमान २९५ जागांवर विजय मिळेल असा दावा केला आहे. आंध्र प्रदेश, ओडिशा, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम या राज्यांच्या विधासभा निवडणुकाही लोकसभेबरोबरच पार पडल्या असून त्यापैकी अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीमची मतमोजणी २ जून रोजी झाली. तर आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या विधानसभांची मतमोजणी लोकसभेच्या मतमोजणीबरोबरच मंगळवारी होईल.
हेही वाचा >>> देशाचा कौल कोणाला? लोकसभा निवडणुकीच्या निकालाला अवघे काही तास शिल्लक
मतदानोत्तर चाचण्यांचा अंदाज खरा ठरून रालोआला तिसऱ्यांदा यश मिळाले तर, नरेंद्र मोदी यांना सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याचा मान मिळून ते पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या विक्रमाशी बरोबरी करतील. नागरिकत्व सुधारणा कायद्यासारखी अनेक धोरणे त्यांना अधिक जोमदारपणे राबवता येतील. तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय राजकारणात त्यांचे स्थान अधिक उंचावेल.
दुसरीकडे, चाचण्यांचे अंदाज खरे ठरले तर विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडी आणि त्यांच्या घटक पक्षांसमोरील आव्हाने अधिक वाढतील. त्यामध्ये ऐक्य कायम राखण्याचे आव्हान सर्वात मोठे असेल. मात्र, मतदानोत्तर चाचण्या खऱ्या नसल्याचे सांगत ‘इंडिया’च्या नेत्यांनी त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आपल्याला २९५ जागा मिळतील असा दावा आघाडीकडून रविवारी करण्यात आला आहे.
एकूण सात टप्प्यांमध्ये मतदान
●महाराष्ट्रात पहिल्या पाच टप्प्यांमध्ये मतदान
●१९ एप्रिल, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे, २० मे, २५ मे आणि १ जून रोजी मतदान
●पहिल्या टप्प्यात सर्वाधिक १०२ तर पाचव्या टप्प्यात सर्वात कमी ४९ मतदारसंघांमध्ये मतदान
●संपूर्ण मतदान प्रक्रियेचा कालावधी ८० दिवस