Lok Sabha Election 2024 : देशात लोकसभा निवडणुकीची मतमोजणी वेगाने सुरू आहे. एनडीए आघाडीची बहुमताच्या दिशेने वाटचाल सुरू आहे; तर इंडिया आघाडीची कामगिरीही अपेक्षेप्रमाणे सुरू आहे. सध्या एनडीए २५० पेक्षा अधिक जागांवर आघाडीवर आहे; तर इंडिया २२५ जागांवर दुसऱ्या स्थानावर राहून मुसंडी मारण्याचा प्रयत्न करीत आहे. पण, कोणत्याही क्षणी निकाल बदलू शकतो. एकेक करून देशभरातल्या अनेक मतदारसंघांतील निकाल जाहीर होत आहेत. अशातच लोकसभेच्या निकालात इंदूरने नवा विक्रम केला आहे.
स्वच्छतेत पहिल्या क्रमांकाच्या शहराने लोकसभा निवडणुकीच्या निकालात ‘नोटा’ला दोन लाखांहून अधिक मते दिली आहेत. निवडणूक आयोगाच्या (EC) आकडेवारीनुसार, २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी इंदूरमध्येही मतांची मोजणी सुरू आहे. परंतु, येथील मतदारांनी सर्व उमेदवारांबद्दल नाराजी व्यक्त करण्यासाठी नोटाचा पर्याय निवडला आहे. त्यामुळे इंदूरमध्ये कोणत्याही उमेदवाराला नाही, तर नोटाला सुमारे दोन लाख मते मिळाली आहेत.
निवडणूक आयोगाने सांगितले की, नोटाला १.६२ टक्का मते मिळाली आहेत. त्याच वेळी भाजपाला जवळपास ६० टक्के मते मिळाली. NOTA ची ही पहिली दखलपात्र घटना नाही. कारण- २०१९ मध्येही इंदूरमध्ये ६९.३१ टक्के मतदान झाले; ज्यामध्ये ५,०४५ मतदारांनी नोटाचा पर्याय निवडला होता.
मध्य प्रदेशातील इंदूरमधील आकडेवारी पाहिली, तर सध्या भाजपा आघाडीवर आहे. या ठिकाणी नोटाला आश्चर्यकारक मते मिळाली आहेत. दुपारी १२ वाजेपर्यंत नोटाला १,२७,२७७ मते मिळाली होती. त्यामुळे इंदूरमध्ये नोटाने यावेळी सर्व विक्रम मोडीत काढले.
इंदूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार शंकर लालवानी यांनी स्वतःचाच विजयाचा विक्रम मोडला आहे. लालवानी यांनी मागील निवडणुकीत पाच लाख ४७ हजार मतांच्या फरकाने विजय मिळवला होता; जो इंदूर लोकसभा निवडणुकीतील सर्वांत मोठा विजय होता. यावेळी लालवानी यांनी सातव्या फेरीत त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी संजय सोळंकी यांच्यावर ११ लाख मतांची आघाडी घेतली आहे. यावेळी पहिल्या फेरीतच नोटाला १० हजारांहून अधिक मते मिळाली होती.
इंदूरमध्ये अक्षय कांती बम यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली; मात्र ऐन निवडणुकीत त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेत, भाजपामध्ये प्रवेश केला. त्यामुळे काँग्रेस इंदूर निवडणुकीतून बाहेर पडली. त्यानंतर काँग्रेसने मतदारांना नोटाला मतदान करण्याचे आवाहन केले.