द्वेषपूर्ण भाषण आणि चुकीचा संदेश दिल्याचा आरोप झाल्यानंतर निवडणूक आयोगाने याची दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्या भाषणाबद्दल नोटीस बजावली आहे. २९ एप्रिल सकाळी ११ वाजेपर्यंत भाजपा आणि काँग्रेसला या नोटिशीला उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे. भाजपा आणि काँग्रेसने एकमेकांवर आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप केला होता. दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी धर्म, जात, समाज आणि भाषेच्या मुद्द्यावर वादग्रस्त विधान केल्याचा आरोप केला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

निवडणूक आयोगाने लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम ७७ अनुसार दोन्ही पक्षाच्या अध्यक्षांना उत्तर देण्यास सांगितले आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान मोदी तर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी राहुल गांधींच्या भाषणावर आक्षेप घेत आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप केला होता.

निवडणूक आयोगाने दिलेल्या निवेदनात म्हटले की, राजकीय पक्षांनी आणि त्यांच्या स्टार प्रचारकांनी आपल्या उमेदवारांचा प्रचार करत असताना त्याची पूर्ण जबाबदारी घेतली पाहीजे. उच्च पदस्थ नेत्यांच्या भाषणांचे गंभीर परिणाम होऊ शकतात.

कर्नाटकमध्ये सर्व मुस्लिमांचा ओबीसीत समावेश, पंतप्रधानांच्या आरोपांनंतर मागासवर्ग आयोगाचा खुलासा; केला ‘हा’ सवाल!

सोमवारी (दि. २२ एप्रिल) भाजपाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भाषणावर आक्षेप घेतला. देशात गरिबी वाढल्याचा दावा राहुल गांधी आपल्या भाषणातून करत आहेत, या दाव्यावर आक्षेप घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी भाजपाने निवडणूक आयोगाकडे केली आहे. तसेच राहुल गांधी आपल्या भाषणातून उत्तर आणि दक्षिण भारतात भाषा आणि भौगोलिक रचनेवरून फूट पाडत आहेत, असाही आरोप भाजपाने केला आहे.

निवडणूक आयोगाच्या नोटीशीनंतर काँग्रेस नेते आणि खासदार जयराम रमेश म्हणाले की, भाजपाकडून ज्याप्रकारे धर्माचा गैरवापर होत आहे. तो गंभीर असून चिंताजनक आहे. याबद्दल आम्ही निवडणूक आयोगात तक्रार दाखल केली होती. आम्हालाही नोटीस प्राप्त झालेली आहे. त्याचे आम्ही उत्तर देऊ.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lok sabha elections election commission seeks response from pm modi and rahul gandhi over mcc violations kvg
Show comments