लोकसभा निवडणुकीच्या तिसरा टप्प्यासाठीचा प्रचार रविवारी संध्याकाळी ५ वाजता संपला. महाराष्ट्रातल्या ११ जागांसाठी मंगळवारी म्हणजेच ७ मे च्या दिवशी मतदान होणार आहे. उद्धव ठाकरेंच्या सभांचा धडाका रविवापर्यंत दिसून आला. अशातच नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. रविवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास ठाकरेंचा विश्वासू नेता शिवसेनेत आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत या नेत्याने पक्ष प्रवेश केला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंचं नाशिकचं टेन्शन वाढल्याची चर्चा आहे.
कुठल्या नेत्याने सोडली उद्धव ठाकरेंची साथ?
नाशिकमधले ठाकरे गटाचे निष्ठावान कार्यकर्ते विजय करंजकर यांनी उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र केला आहे आणि पहाटे अडीच तीनच्या सुमारास मुंबईतल्या बाळासाहेब भवन या ठिकाणी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. यावेळी दादा भुसेही उपस्थित होते. विजय करंजकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे.
हे पण वाचा- मुख्यमंत्री शिंदे यांचे बालेकिल्ल्यात शक्तिप्रदर्शन; नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी ठाण्यात ‘रोड शो
काय म्हणाले विजय करंजकर?
“मी माझ्या पदांचा राजीनामा देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थिती शिवसेनेत प्रवेश केला आहे. नाशिकमधून लोकसभा निवडणूक लढवण्यास मी इच्छुक होतो. मला आश्वासन देऊनही ते टाळलं गेलं. ज्या माणसाचं नावही चर्चेत नाही अशा माणसाला उमेदवारी देण्यात आली. आता गद्दार कोण आहे ते मी दाखवून देईन. ठाकरे गटाच्या शिवसेनेत तत्व आणि सत्व दिसत नाही. ज्यांनी माझा घात केला आहे. त्यांना येणाऱ्या काळात कळेल. हे लोक एकनाथ शिंदेंना गद्दार बोलत आहेत. परंतु खाऱ्या अर्थाने गद्दार पडद्याआड लपले आहेत. त्यांचा चेहरा पडदा फाडून मी समोर आणणार आहे.” असं विजय करंजकर यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काय म्हटलं आहे?
“आज विजय करंजकर आणि त्यांचे सहकारी बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसेनेत आले आहेत. मी त्यांचं मनापासून स्वागत करतो आहे. त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यामुळे आमच्यावर जे आरोप करत आहेत त्यांनी जरा स्वतःचं काय चाललं आहे ते बघितलं पाहिजे आणि आत्मपरीक्षण केलं पाहिजे. त्यानंतर दुसऱ्यावर आरोप करायला हवे.” असा टोला एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना लगावला.
शेकडो लोक चुकीचे आणि एक माणूस बरोबर असं होऊ शकतं का?
“विजय करंजकर यांना आलेला अनुभव अनेकांना तिकडे आला आहे. तुम्ही त्यांच्याबरोबर होतात तोपर्यंत निष्ठावान होतात आता इकडे आल्यावर ते तुम्हाला कचरा म्हणतील. कारण त्यांची वृत्ती अशीच आहे. १३ खासदार ४० आमदार , शेकडो कार्यकर्ते, नगरसेवक, पंचायत समिती सदस्य हे सगळे लोक येत आहेत हे सगळे लोक चुकीचे आणि एक माणूस बरोबर असं होऊ शकतं का? मी काही त्यांना सल्ले देत नाही. त्यांच्यासारखं माझं नाही ते तर सुप्रीम कोर्टालाही सल्ले देतात. आज काही लोक शिवसेनेत आले आहेत. पुढच्या दोन दिवसांत अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते आमच्याबरोबर येतील याचा आम्हाला विश्वास आहे. ज्या वेदना आज करंजकर यांनी व्यक्त केल्या आहेत त्याचं समोरच्यांना काही वाटत नाही. मी आणि माझं कुटुंब एवढीच मर्यादा असलेल्या व्यक्तीकडून काय अपेक्षा ठेवणार? असंही एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे.