Lok Sabha Election Result 2024 Hot Seats : लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये कोणाचा विजय अन् कोणाचा पराभव हे काही वेळातच स्पष्ट होईल. सोशल मीडियावर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यात विविध पक्षांचे समर्थक सोशल मीडियावर दावे-प्रतिदावे करतायत. अनेकांनी आपापल्या उमेदवारांच्या समर्थनार्थ आणि विरोधकांविरोधात चर्चा सुरू केल्या आहेत.
एक्झिट पोलमध्ये भाजपाला बहुमताचा दावा
लोकसभेच्या निकालाबाबतची आकडेवारी आता येऊ लागली आहे. त्यात एक्झिट पोल्सनी भाजपाच्या पूर्ण बहुमताचा दावा केला आहे. भाजपाचे कार्यकर्ते ४०० हून अधिक जागांवर विजयाचा दावा करीत आहेत; तर काँग्रेस विजयाचे गुणगान गात आहे. आता कोण कोणावर मात करतो हे जाणून घेण्यासाठी काही तास वाट पाहावी लागणार आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या निकालात पाच जागांबद्दल सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. या जागांच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे. काही ठिकाणी कन्हैया कुमार व मनोज तिवारी चर्चेचा विषय आहेत; तर काही ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा १० लाखांहून अधिक मते मिळाल्याचा दावा केला जात आहे. कोणत्या जागांविषयी सोशल मीडियावर चर्चा आहे ते जाणून घेऊ…
वाराणसी मतदारसंघ, उमेदवार- पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध अजय राय
चर्चेचे कारण- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा १० लाखांहून अधिक मतांनी विजय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. असे झाले तर हा देशातील सर्वांत मोठा निवडणूक विजय असेल. या जागेवर त्यांची स्पर्धा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजय राय यांच्याशी आहे. राय सध्या यूपी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. आणि ते पाच वेळा आमदार राहिले आहेत.
हैदराबाद मतदारसंघ, उमेदवार – ओवैसी विरुद्ध माधवी लता
मागील ४० वर्षांपासून हैदराबादची जागा ओवैसी कुटुंबाकडे आहे. त्यांना यावेळी भाजपच्या माधवी लता तडगी यांनी आव्हान दिले आहे. आतापर्यंतच्या आकडेवारीत ओवैसी मोठ्या आघाडीवर आहेत. या जागेवर काँग्रेसचे मोहम्मद वलीउल्लाह समीर आणि बीआरएसचे श्रीनिवास यादव हेही निवडणूक लढवत आहेत.
देशातील ‘या’ मतदारसंघात ‘नोटा’ची आघाडी; तब्बल दोन लाख लोकांचे ‘नोटा’ला मत? कारण काय? वाचा
कन्नौज मतदारसंघ, उमेदवार – अखिलेश यादव विरुद्ध सुब्रत पाठक
कन्नौज ही जागा सपाचा बालेकिल्ला मानली जाते. तिथे मुलायम कुटुंबाचे वर्चस्व आहे; मात्र यावेळी बिहारची समीकरणे बिघडत असल्याचे पाहून बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांचे जावई प्रताप सिंह यादव यांचे तिकीट रद्द करून, अखिलेश यादव निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. अखिलेश यादव यांच्या विरोधात भाजपचे उमेदवार आणि विद्यमान खासदार सुब्रत पाठक आहेत. दरम्यान मतमोजणीच्या १६ व्या फेरीत अखिलेश यादव ९१ हजार मतांनी आघाडीवर आहेत
ईशान्य-पूर्व दिल्ली मतदारसंघ, उमेदवार – मनोज तिवारी विरुद्ध कन्हैया कुमार
ईशान्य पूर्व दिल्ली लोकसभा जागेची सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे. येथे जेएनयूचे लाल कन्हैया कुमार आणि भाजपचे विद्यमान खासदार मनोज तिवारी यांच्यात लढत आहे.
रायबरेली मतदारसंघ, उमेदवार – राहुल गांधी विरुद्ध
रायबरेली ही सोनिया गांधींची पारंपरिक जागा आहे; जी राहुल गांधी उमेदवार झाल्यानंतर सर्वांत लोकप्रिय जागा झाली आहे. वायनाडमधील समीकरणे लक्षात घेऊन, पक्षाने राहुल गांधींना रायबरेलीमधून उमेदवार करून सुरक्षित खेळ करण्याचा प्रयत्न केला आहे. रायबरेलीची अवस्था २०१९ च्या अमेठी लोकसभेसारखी होईल की राहुल गांधी येथून विजयी झाल्यानंतर वायनाडची जागा सोडतील की नाही यावर सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चा सुरू आहे. आता सोशल मीडियावर सुरू असलेल्या या चर्चा कितपत खऱ्या ठरतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. राहुल गांधींविरोधात भाजपच्या योगी सरकारमधील राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) दिनेश प्रताप सिंह हे निवडणूक लढवत होते. राहुल गांधींना आतापर्यंत ६,७९,१७३ मते मिळाली आहेत, तर दिनेश प्रताप सिंह यांना २,९३,६७२ मते मिळाली आहेत.