कर्नाटक विधानसभा निवडणुकीची मजमोजणी सुरू आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेस पक्ष बहुमताने विजयी होईल, हे जवळपास निश्चित झालं आहे. सध्या काँग्रेस १३६ जागांवर आघाडीवर आहे. तर भाजपा ६४ जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे कर्नाटकचा मुख्यमंत्री कोण होणार? याबाबत सगळ्यांना उत्सुकता लागली आहे. कर्नाटकमध्ये मुख्यमंत्रीपदावरून काँग्रेसच्या नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचंही बोललं जात आहे.
दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एम वीरप्पा मोइली यांनी मुख्यमंत्री पदाबाबत मोठं विधान केलं आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेसच्या बहुसंख्य आमदारांना दलित मुख्यमंत्री हवा असेल, तर हायकमांड त्यांच्याविरोधात जाणार नाहीत, असं विधान मोइली यांनी केलं. ते ‘सीएनएन-न्यूज१८’शी बोलत होते.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत निकाल काँग्रेसच्या बाजूने लागणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. असं असताना मोइली यांच्या विधानामुळे कर्नाटकचा मुख्यमंत्री कोण असणार? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. तसेच कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांचं नावही मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत आहे.
हेही वाचा- “भाजपाने ऑपरेशन ‘लोटस’साठी भरपूर पैसा खर्च केला”, काँग्रेस नेते सिद्धरामय्यांचा आरोप
मोइली यांनी पुढे सांगितलं की, काँग्रेस पक्षाचे हायकमांड कर्नाटकमध्ये मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण असेल, हे लादू शकत नाहीत. शिवकुमार यांनी गेली तीन वर्षे दिवस-रात्र पक्षासाठी काम केलं आहे, असंही ते म्हणाले.
हेही वाचा- “हुकूमशाहीचा पराभव होण्याची…”, कर्नाटक निकालावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
खरं तर, दलित नेत्याला कर्नाटकचा मुख्यमंत्री बनवणं, हा काँग्रेसमध्ये बराच चर्चिला गेलेला मुद्दा आहे. जी. परमेश्वर यांच्यासारखे ज्येष्ठ नेते याच समाजातून आले आहेत. त्यांनी दलित उमेदवाराला मुख्यमंत्रीपदाची संधी दिली नसल्याची खंत व्यक्त केली होती. शनिवारी कोरटागेरे येथून विजय मिळविल्यानंतर परमेश्वर हे सहाव्यांदा आमदार म्हणून निवडून येतील. परमेश्वर यांनी यापूर्वीच सांगितलं होतं की, निवडणूक जिंकल्यानंतर पुढील मुख्यमंत्री कोण असेल? याचा निर्णय पक्षाचे हायकमांड घेतील. संधी दिल्यास मीही मुख्यमंत्री व्हायला तयार आहे, असंही ते म्हणाले होते.