सदाभाऊ खोत यांनी रणजीतसिंह निंबाळकरांच्या प्रचारात शरद पवारांचा उल्लेख म्हातारा असा केला आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या वयाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. अजित पवारांनी शरद पवारांच्या वयाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावेळी शरद पवार यांनी माझं वय कुठे झालं आहे? असा प्रतिसवाल केला होता. तसंच मोरारजी देसाईंचंही उदाहरण दिलं होतं. आता सदाभाऊ खोत यांनी तुफान टोलेबाजी केली आहे.
काय म्हणाले सदाभाऊ खोत?
“लोकसभेची लढाई ही वाडा विरुद्ध गावगाडा म्हणजेच प्रस्थापित विरुद्ध विस्थापित अशी आहे. मतदारसंघात शरद पवारांबाबत अनेक गोष्टी ऐकू येतील. शरद पवारांचं वय ८४ आहे म्हणून ते ८४ सभा घेणार अशाही चर्चा सुरु आहे. पण मला सांगा शरद पवारांना काय काम आहे? त्यांना म्हशी वळायच्या आहेत की जनावरांना पाणी पाजायचं आहे. या वयातही आमच्यासारख्यांना ते संधी देत नाहीत.” असं सदाभाऊ खोत म्हणाले. तसंच अजित पवारांबाबत आणि शरद पवारांबाबत त्यांनी एक मिश्किल भाष्य केलं.
सदाभाऊ म्हणाले, “म्हातारं लय खडूस”
“मुलगा कर्तबगार झाला की बाप त्याच्या हाती प्रपंच देतो आणि गप्प बसतो. पण हे म्हातारं लय खडूस. तिजोरीची किल्ली कंबरेला लावून हिंडतंय. अजित पवार किल्ली बघून बघून म्हातारे झाले. मग अजित पवारांच्या लक्षात आलं की म्हातारं काही कंबरेची किल्ली काढत नाही, म्हणून दादा किल्लीला लोंबकळत म्हणतोय किल्ली तोडल्याशिवाय राहणार नाही. आम्हाला प्रपंच करु द्या, आम्ही प्रपंच म्हातारं झाल्यावर करायचा का?” हे म्हणत विकासासाठी अजित पवार महायुतीत आले असंही सदाभाऊ खोत म्हणाले.
हे पण वाचा- धनंजय मुंडेंचा थेट शरद पवारांना टोमणा; म्हणाले, “एखाद्याच्या पोटचं असतं म्हणून झाली असेल चूक, पण…”
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जेव्हा उभी फूट पडली त्यानंतर कर्जतमध्ये अजित पवार यांनी मेळावा घेतला होता. या मेळाव्यातही त्यांनी शरद पवारांच्या वयावरुन त्यांच्यावर शरसंधान साधलं होतं. पक्षातल्या वरिष्ठांनी आता आराम करुन आम्हाला मार्गदर्शन करावं, काही चुकलं तर कान ओढावेत पण आता आराम करावा असं म्हटलं होतं. त्यावर शरद पवार यांनी उत्तर दिलं होतं माझं वय ८२, ८३ काय ९२ झालं तरीही काही फरक पडत नाही. आता सदाभाऊ खोतांनी पुन्हा एकदा शरद पवारांचा उल्लेख म्हातारा असा केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पवार गटाकडून सदाभाऊ खोतांना काही उत्तर दिलं जाणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.