Madhya Pradesh Assembly Election 2023 : बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष मायावती यांनी मध्य प्रदेशमध्ये होत असलेल्या निवडणुकांची जोरदार तयारी सुरू केली आहे. काँग्रेसने ओबीसी समाजाची मते मिळविण्यासाठी जातनिहाय जनगणनेचे फसवे आश्वासन दिले असल्याची टीका मायावती यांनी सोमवारी काँग्रेसवर केली. मध्य प्रदेशमधील २३० विधानसभेच्या मतदारसंघासाठी १७ नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. यापैकी १८३ मतदारसंघांमध्ये मायावती यांचा बसपा पक्ष गोंडवाना गणतंत्र पक्षासह (GGP) निवडणूक लढविणार आहे, तर उर्वरीत ४७ जागांवर जीजीपी पक्ष निवडणूक लढविणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अशोक नगर जिल्ह्यातील मुंगावली येथील जाहीर सभेत भाषण करत असताना मायावती यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. १९५३ साली मागासवर्गीय समाजासाठी पहिल्यांदाच आयोग स्थापन करण्यात आला होता. काका कालेलकर आयोगाने सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासावर्गीय असलेल्या समाजाचा अहवाल देऊन काही शिफारसी केल्या होत्या. पण, काँग्रेसने या शिफारसींची अंमलबजावणी केली नाही. तसेच मंडल आयोग या दुसऱ्या आयोगाने ओबीसी समाजाला सर्व स्तरात २७ टक्के आरक्षण देण्याची भूमिका मांडली होती. पण, मंडल आयोगाचीही पूर्णपणे अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे ओबीसी मतदारांनी काँग्रेसच्या भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन मायावती यांनी केले.

हे वाचा >> बसपाचे नवे ‘सोशल इंजिनिअरिंग’; मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये दलित-आदिवासींची मोट बांधणार

काँग्रेसला कमी मताधिक्य मिळालेल्या मतदारसंघात बसपाची सभा

२०१८ च्या विधानसभा निवडणुकीत मुंगावली मतदारसंघात बसपाच्या उमेदवाराला १४,२०२ मते मिळाली आणि त्याला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. या मतदारसंघात काँग्रेसने २,१३६ एवढ्या कमी मताधिक्याने भाजपाचा पराभव केला होता.

मायावती मुंगावलीच्या सभेत म्हणाल्या की, खासगी क्षेत्रात ओबीसी, दलित आणि आदिवासी यांना आरक्षण न देता केंद्र आणि राज्यातील बहुतांशी सरकारी कामे बड्या भांडवलदारांच्या आणि श्रीमंतांच्या हाती सोपवली जात आहेत. ओबीसींनी हेदेखील लक्षात ठेवावे की, ज्याप्रमाणे व्ही. पी. सिंह यांच्या नेतृत्वाखालील जनता दलाच्या सरकारच्या काळात ओबीसींना मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार आरक्षण मिळत होते, ते काँग्रेसच्या काळात मिळाले नाही. बसपाने संघर्ष केला, तीव्र लढा दिला, त्यामुळेच व्ही. पी. सिंह सरकारने हे आरक्षण देऊ केले होते, असेही मायावती यावेळी म्हणाल्या.

आणखी वाचा >> मोदींना पराभूत करण्यासाठी २६ पक्ष एकत्र, मायावतींची मात्र ‘एकला चलो रे’ची भूमिका, म्हणाल्या “आम्ही…”

उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती असेही म्हणाल्या की, काँग्रेस पक्षाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न पुरस्कार दिला नाही. यामुळे दलित समाजाबद्दलचा काँग्रेसचा दृष्टिकोन काय आहे, हे दिसून येतो. बसपाच्या प्रयत्नामुळे व्ही. पी. सिंह सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न पुरस्कार देऊन गौरविले होते. बसपाचे संस्थापक कांशीरामजी यांच्या निधनानंतर काँग्रेसने एक दिवसाचाही राष्ट्रीय शोक का जाहीर केला नाही, असा सवालही मायावती यांनी उपस्थित केला.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Madhya pradesh assembly election 2023 bsp mayawatis rally in the constituency where the congress won by a small margin in 2018 kvg