मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण भारताचे लक्षे होते. काँग्रेसचे सरकार कोसळल्यानंतर येथे पुन्हा एकदा भाजपाचे नेते शिवराजसिंह चौहान मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले होते. शिवराजसिंह हे १६ वर्षे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. सध्याच्या विधानसभा निवडणुकीतही भाजपानेच बाजी मारली आहे. त्यामुळे शिवराजसिंह पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. प्रचारात भाजपाच्या केंद्रातील अनेक नेत्यांनी मध्य प्रदेशच्या निवडणुकीत प्रचार केला. मात्र एकाही नेत्याने शिवराजसिंह यांचा मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून उल्लेख केला नव्हता. म्हणूनच आता भाजपा मुख्यमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात टाकणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
अनेक खासदारांना विधानसभा निवडणुकीत तिकीट
भाजपाने मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केलेला नव्हता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच केंद्रस्थानी ठेवून भाजपाने आपली प्रचारनीती आखली होती. विशेष म्हणजे या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आदी नेत्यांनी प्रचारसभा घेतल्या. मात्र या सभांत एकाही नेत्याने शिवराजसिंह चौहान यांचा मध्य प्रदेशचे भावी मुख्यमंत्री किंवा मध्य प्रदेश भाजपाचे नेतृत्व म्हणून थेट उल्लेख केला नाही. भाजपाने अनेक खासदारांना मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत उतरवलेले आहे. त्यामुळे सध्या खासदार असलेले अनेक नेते मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत, असे म्हटले जात आहे. त्यामुळे शिवराजसिंह चौहान यांचे काय होणार? त्यांना मुख्यमंत्रिपद मिळणार का? असे विचारले जात आहे.
महिलांमध्ये शिवराजसिंह प्रसिद्ध
भाजपाने शिवराजसिंह चौहान यांचा मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून उल्लेख केलेला नसला तरी त्यांनी पूर्ण ताकदीने प्रचार केला. शिवराजसिंह यांनी आपल्या कार्यकाळात ‘लाडली बहना योजना’ राबवली. या योजनेअंतर्गत महिलांना आर्थिक मदत करण्यात येते. या योजनेची मध्य प्रदेशमध्ये चांगलीच चर्चा झाली. प्रचारादरम्यान शिवराज यांच्याकडून याच योजनेचा वारंवार उल्लेख केला जात होता. याच योजनेमुळे शिवराज यांची महिलांमध्ये ‘आमचे मामा’ अशी प्रतिमा निर्माण झाली.
१८ मतदारसंघांत पुरुषांपेक्षा महिला मतदार अधिक
मध्य प्रदेशमध्ये एकूण ५.५२ कोटी महिला मतदार आहेत. एकूण २३० मतदारसंघांपैकी साधारण १८ मतदारसंघ असे आहेत, ज्यात पुरुषांपेक्षा महिला मतदारांचे प्रमाण जास्त आहे. याच महिला मतांच्या जोरावर मध्य प्रदेशमध्ये भाजपाचा विजय होईल, अशी खात्री शिवराजसिंह यांना होती. भाजपाने त्यांचा मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून कोठेही उल्लेख केलेला नाही.
नरेंद्र मोदी यांनी शिवराजसिंह यांचा उल्लेख टाळला
२६ सप्टेंबर २०२३ रोजी मोदी यांची भोपाळमध्ये एक सभा झाली होती. या सभेत शिवराजसिंह शांत होते. त्यांनी या सभेत अगदी छोटेखानी भाषण केले होते. तर मोदी यांनी दीर्घ भाषण करत मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला होता. या भाषणात मोदी यांनी शिवराज यांचा कोठेही उल्लेख केला नव्हता. तसेच भाजपाने आयोजित केलेल्या जनआशीर्वाद यात्रेचेही शिवराजसिंह यांनी नेतृत्व केले नव्हते. तरीदेखील शिवराज यांनी पूर्ण ताकदीने प्रचार केला.
…म्हणून शिवराजसिंह यांचे नाव घेतले नव्हते
शिवराजसिंह हे २०१८ ते २०२० हा काळ वगळता २००५ सालापासून मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदावर आहेत. त्यामुळे मध्य प्रदेशच्या जनतेमध्ये शिवराज यांच्याविषयी नाराजी आहे, अशी भीती भाजपाला होती. याच कारणामुळे भाजपाने त्यांचा मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून कोठेही उल्लेख केलेला नव्हता.
मुख्यमंत्रिपदी पुन्हा शिवराजसिंह चौहान?
हाच धागा पकडून काँग्रेसने भाजपावर टीका केली. भाजपाला स्वत:च्याच मुख्यमंत्र्यांची लाज वाटत आहे, अशी टीका काँग्रेसकडून केली जात होती. मात्र शिवराजसिंह चौहान हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघात स्वंयसेवक राहिलेले आहेत. नंतर ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतही कार्यरत होते. त्यानंतर १९९१ साली ते पहिल्यांदा विदिशा मतदारसंघातून निवडून आले होते. शिवराजसिंह चौहान यांचे अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांच्याशी फार जवळचे संबंध नसले तरी त्यांची संघाशी चांगली जवळीक आहे. त्यामुळे आता शिवराजसिंह चौहान यांच्याच गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडण्याची शक्यता आहे. असे असले तरी यात अद्याप कोणतीही स्पष्टता नाही. कारण मध्य प्रदेश भाजपाचे प्रदेशाध्यक्ष व्ही डी शर्मा यांना याबाबत विचारले असता, केंद्रातील नेतेच नव्या नेतृत्वाबाबत निर्णय घेतील, असे त्यांनी सांगितले.