देशात २०२४ साली लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी भाजपा आणि विरोधकांची ‘इंडिया’ आघाडी निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. त्यापूर्वी देशात ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुका डिसेंबर महिन्यात पार पडणार आहेत. यात छत्तीसगड, राजस्थान आणि मध्य प्रदेशचा समावेश आहे. तिन्ही राज्य लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने महत्वाची आहेत.
छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये काँग्रेसची, तर मध्य प्रदेशात भाजपाची सत्ता आहे. डिसेंबर महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा, काँग्रेससह अन्य पक्षांकडून सभा, रॅलींचे आयोजन करण्यात येत आहेत. अशातच तिन्ही राज्यात कोणाचं सरकार येणार? याचा एक सर्वे समोर आला आहे.
आयएनएस कंपनीच्या ‘पोलस्ट्रॅट’नं १ सप्टेंबर ते १३ सप्टेंबर मध्ये एक सर्वे केला आहे. त्यानुसार तिन्ही राज्यात सत्तापरिवर्तन होत असल्याचं दिसत नाही. पण, आमदारांच्या संख्येत बदल दिसत आहे. राजस्थानात २००, छत्तीसगडमध्ये ९० आणि मध्य प्रदेशात विधानसभेच्या २३० जागा आहेत.
राजस्थानमध्ये भाजपाच्या जागांमध्ये वाढ
राजस्थानमध्ये अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचं सरकार आहे. २०१८ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत २०० पैकी १०० जागांवर काँग्रेसचे आमदार निवडून आले होते. बहुमतासाठी फक्त १ जागा कमी होती. पण, बहुजन समाज पक्षाबरोबर ( बीएसपी ) युती करून काँग्रेस सत्तेत आली. भाजपाला ७३ आणि बीएसपीला ६ जागा मिळाल्या होत्या. सर्वेनुसार २०२३ साली काँग्रेस पुन्हा सत्ता स्थापन करणार आहे. काँग्रेसला ९७ ते १०५ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर, भाजपाला १६ ते २६ जागांचा फायदा होणार असल्याचं सांगितलं जातंय. भाजपाला ८९ ते ९७ जागा आणि बीएसपीला ० त ४ जागा मिळू शकतात.
मध्य प्रदेशात भाजपाचं बहुमताचं सरकार?
मध्य प्रदेशात २०१८ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि काँग्रेसमध्ये जोरदार लढत झाली. १५ वर्षात कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालं नव्हतं. पण, जास्त जागा असल्याने काँग्रेस सत्तेत आली. मात्र, एक वर्षानंतर भाजपा सत्तेत आली. २३० जागा असलेल्या २०१८ साली मध्य प्रदेशात काँग्रेसचे ११४ आणि भाजपाचे १०९ आमदार निवडून आले होते. बहुजन समाजवादी पक्षाला २ जागा मिळाल्या होत्या. २०२३ च्या सर्वेनुसार भाजपाचे ११६ ते १२४ आमदार निवडून येण्याची शक्यता आहे. तर, १०० ते १०८ जागा मिळू शकतात. भाजपा ४२ आणि काँग्रेसला ४० टक्के मते मिळू शकतात.
छत्तीसगडमध्ये पुन्हा बघेल सरकार?
२०१८ साली छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत १५ वर्षानंतर सत्तांतर झालं. विरोधी पक्षात असलेल्या काँग्रेसचा ९० पैकी ६८ जागांवर दणदणीत विजय झाला होता. भाजपा ४९ जागांवरून १५ वर आली होती. बीएसपीच्या महायुतीला ५ जागांवर विजय मिळाला होता. २०२३ च्या सर्वेनुसार काँग्रेसला ६२ जागा मिळू शकतात. भाजपाच्या १२ जागा वाढून २७ आमदार निवडून येण्याची शक्यता आहे. काँग्रेसला ४४ आणि भाजपा ३८ टक्के मतदान मिळण्याची शक्यता आहे.