मध्य प्रदेश विधानसभा मतमोजणीत भारतीय जनता पार्टीने निर्णायक आघाडी घेतली आहे. भाजपाने १६३ जागांवर आघाडी घेत जोरदार मुसंडी मारली. तर काँग्रेस केवळ ६६ जागांवर पुढे आहे. भाजपाने विजयी आघाडी घेतली असली तरी अद्याप अंतिम निकाल समोर आला नाही. अजूनही मतमोजणी सुरूच आहे. दरम्यान, मध्य प्रदेशातील शाजापूरमध्ये काँग्रेस आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला आहे.
शाजापूर मतदारसंघातील उमेदवारांच्या मतमोजणीतील अंतर फारच कमी असल्याने मतमोजणी केंद्रावर गोंधळ उडाला. यानंतर भाजपा आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारीची घटना घडली. यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी गर्दीला पांगवण्यासाठी लाठीमार केला. याबाबतचा एक व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या घटनेची अधिक माहिती देताना मध्य प्रदेशचे मुख्य निवडणूक अधिकारी अनुपम रंजन यांनी सांगितलं की, शाजापूरमध्ये उमेदवारांच्या मतमोजणीतील अंतर खूपच कमी होतं. त्यामुळे फेटाळलेल्या पोस्टल बॅलेटची फेरतपासणी केली जात आहे.