मध्य प्रदेशमध्ये पुढील महिन्यात १७ नोव्हेंबर रोजी विधानसभेसाठी मतदान होणार आहे. त्यासाठी सर्वच पक्षांनी २३० जागांसाठी आपापले उमेदवार जवळपास घोषित केले आहेत. मात्र, त्यानंतर भाजपा आणि काँग्रेस या प्रमुख पक्षांना मोठ्या प्रमाणात नाराजीचा सामना करावा लागत आहे. भाजपामध्ये अनेक नाराज नेत्यांनी राजीनामा देण्याचा सपाटा लावला आहे, तसेच काँग्रेसमध्येही राजीनाम्याची लाट उसळलेली दिसते. सोमवारी दोन्ही पक्षांनाही नेत्यांच्या नाराजीचा सामना करावा लागला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाजपाविरोधात २२ मतदारसंघांत कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली असून, सहा मतदारसंघांतील इच्छुकांनी राजीनामे दिले आहेत. भाजपाने २३० पैकी २२८ मतदारसंघांसाठी उमेदवार घोषित केले आहेत; तर गुना व विदिशा या मतदारसंघांतील उमेदवार अद्याप घोषित केलेले नाहीत.

हे वाचा >> तिकीट नाकारल्यानंतर भाजपा आमदाराला कोसळलं रडू, प्रदेशाध्यक्षांवर गंभीर आरोप करत म्हणाले…

भाजपामध्ये तिकीट वाटपावरून नाराजी

माजी मंत्री रुस्तम सिंह यांनी रविवारी भाजपाचा राजीनामा दिला. त्यांना मुरेना मतदारसंघातून त्यांचा मुलगा राकेश सिंह याच्यासाठी तिकीट हवे होते; पण भाजपाने रघुराज कंसाना यांना तिकीट दिले. कंसाना यांनी काँग्रेसच्या तिकिटावर २०१८ साली मुरेनामधून विजय मिळविला होता. मात्र, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी बंडखोरी केल्यानंतर कंसाना त्यांच्यासह भाजपामध्ये दाखल झाले होते. त्यानंतर भाजपाच्या तिकिटावर त्यांनी पोटनिवडणूक लढवली; मात्र ५,७५१ एवढ्या मतांनी त्यांचा पराभव झाला. कंसाना यांना पोटनिवडणुकीसाठी तिकीट दिल्यामुळे मुरेना येथील भाजपाचे अनेक नेते नाराज होते. त्यामुळे कंसाना यांनी आपल्या पराभवासाठी भाजपामधील नाराज नेत्यांना जबाबदार धरले होते.

रुस्तम सिंह हे निवृत्त आयपीएस अधिकारी असून त्यांनी दोन वेळा भाजपा सरकारमध्ये मंत्रिपद भूषविले आहे.

रविवारी भाजपाचे माजी आमदार व माजी मंत्री उमाशंकर गुप्ता यांच्या समर्थकांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष व्ही. डी. शर्मा यांच्याविरोधात भोपाळ येथे घोषणाबाजी केली. भोपाळ दक्षिण-पश्चिम मतदारसंघासाठी भाजपाने भगवानदास सबनानी यांना तिकीट देण्यात आले असून, त्यांची उमेदवारी रद्द करून, ती गुप्ता यांना द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. भोपाळ दक्षिण-पश्चिमच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्षांना पत्र लिहून गुप्ता यांना तिकीट देण्याची मागणी केली आहे.

टिकमगड धील भाजपाचे माजी आमदार के. के. श्रीवास्तव यांनी भाजपाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. भाजपा प्रदेशाध्यक्षांनी तिकीटवाटपात अन्याय केल्याचे पत्र लिहून त्यांनी राजीनामा दिला. श्रीवास्तव म्हणाले, “मी पक्षाला माझे आयुष्य समर्पित केले. १८ खटले अंगावर घेतले, तुरुंगात गेलो आणि मला कुणाच्या तरी चुकीच्या निर्णयामुळे आज पक्षाबाहेर जावे लागत आहे, याचे मनापासून दुःख वाटत आहे.”

हे वाचा >> ज्योतिरादित्य सिंदिया यांना स्वत:ला सिद्ध करण्याची संधी; ३४ मतदारसंघांत ‘राजकीय वजन’ सिद्ध करावे लागणार!

काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत नाराजीचे सूर

काँग्रेससमोरही ४० मतदारसंघांतील कार्यकर्ते उभे ठाकले आहेत. त्यापैकी पाच मतदारसंघांतील पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. सोमवारी शुजालपूर व होशंगाबाद विधानसभा मतदारसंघांतील कार्यकर्त्यांनी माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या भोपाळमधील घराबाहेर निषेध आंदोलन केले. शुजालपूरमधील शाजापूर येथील अनेक काँग्रेस कार्यकर्ते भोपाळमध्ये आले आणि त्यांनी माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या घराबाहेर आंदोलन करीत योगेंद्र सिंह ऊर्फ बंटी बना यांना शुजालपूरमधून तिकीट देण्याची मागणी केली. काँग्रेस पक्षाने या ठिकाणी रामवीर सिंह सिकरवार यांना अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केले आहे. मागच्या तीन दिवसांत सिकरवार यांच्या उमेदवारीवरून आंदोलन होण्याची ही दुसरी वेळ आहे.

दरम्यान, होशंगाबाद येथून काँग्रेसचे नेते चंद्र गोपाल मलैया यांना तिकीट मिळावे, यासाठी त्यांच्या समर्थकांनी आंदोलन केले. भाजपामधून काँग्रेसमध्ये आलेले आणि दोन वेळा आमदार राहिलेले गिरिजाशंकर शर्मा यांना काँग्रेसने तिकीट दिले आहे.

गरोठ मतदारसंघासाठी माजी आमदार सुभाष सोजतिया यांना तिकीट दिल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांकडून आक्रमक आंदोलन होत आहे. निषेध व्यक्त करण्यासाठी कार्यकर्त्यांनी माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह आणि सोजतिया यांच्या प्रतिमांना जोडे मारो आंदोलन केले. सुजातिया यांचा या मतदारसंघातून सलग दोन वेळा पराभव झाला आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Madhya pradesh polls 2023 bj and congress buffeted by resignations protests as denial of tickets sets off storm kvg
Show comments