कर्नाटकातील विधानसभा निवडणुकांचा निकाल जवळपास स्पष्ट झाला आहे. सध्याच्या कलांवरून काँग्रेसला कर्नाटकात स्पष्ट बहुमत मिळाले आहे. भाजपाची सत्ता उलथवून टाकण्यात काँग्रेसला यश आल्याची प्रतिक्रिया काँग्रेस नेत्यांकडून दिली जात आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी हनुमान चालिसातील एक कडवं ट्वीट करून भाजपावर टीका केली आहे.
“कर्नाटक निवडणुकीचे निकाल यायला सुरवात झालीय.काँग्रेस स्पष्ट बहुमताने सरकार बनवत असल्याचं स्पष्ट होत आहे. या निवडणुकीत भाजपने बजरंग बली अर्थात हनुमानाला निवडणुकीचा मुद्दा बनवला होता. परंतु खुद्द प्रभू हनुमानाला देखील ही गोष्ट आवडलेली दिसत नाहीये”, असं ट्वीट जितेंद्र आव्हाडांनी केलं. यावेळी त्यांनी हनुमान चालिसाचे एक कडवेही ट्वीट केले आहे.
“महाबीर बिक्रम बजरंगी।
कुमति निवार सुमति के संगी..!”
अर्थात-
“महावीर बजरंग बली हे पराक्रमी आहेत. ते दुर्जनांचं निराकरण करतात तर सज्जनांच्या सोबत उभे राहतात. थोडक्यात आज खुद्द बजरंग बलीने देखील ते नेमके कोणासोबत आहेत हे कर्नाटक निवडणुकीच्या निमित्ताने अवघ्या देशाला दाखवून दिले आहे”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
दरम्यान, काँग्रेसला बहुमत मिळत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. निवडणूक आयोगाकडून अद्यापही अधिकृत आकडेवारी आलेली नाही. मात्र समोर आलेल्या कलांवरून कर्नाटकात सत्ता स्थापन करण्यास काँग्रेसचा मार्ग मोकळा झाला आहे. देशभर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा केला जातोय. तसंच, कर्नाटकातील काँग्रेसचा विजय हा २०२४ च्या विरोधकांच्या विजयाची नांदी आहे, अशा प्रतिक्रियाही आता देशभरातील विरोधी पक्षातील नेत्यांकडून येऊ लागल्या आहेत.