राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर महायुतीत परतले असून ते महायुतीचे परभणी लोकसभेचे उमेदवार आहेत. जानकर हे सध्या परभणी मतदारसंघात स्वतःचा प्रचार करत आहेत, त्याचबरोबर ते इतर मतदारसंघांमधील महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेतायत. जानकरांचं प्रामुख्याने बारामती लोकसभा मतदारसंघावर लक्ष आहे. या मतदारसंघात सुनेत्रा पवार (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटाच्या उमेदवार) यांच्या प्रचारात जानकर सर्वात पुढे आहेत. दरम्यान, जानकर यांनी बारमतीकरांना आवाहन केलं आहे की, त्यांनी सुनेत्रा पवारांना भरपूर मतं देऊन खासदार करावं. मीदेखील परभणीतून खासदार होऊन संसदेत जाणार आहे. मी भावी मंत्री म्हणून सांगतोय. आम्ही लोकसभेत गेल्यावर दिल्लीतून बारामतीसाठी मोठ्या प्रमाणात विकासनिधी आणू.
दरम्यान, बारामतीतल्या प्रचारसभेत अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकल्याचं पाहायला मिळालं. अजित पवारांना भाबडा माणूस म्हणताना जानकर चुकले. मात्र आपली चूक लक्षात येताच महादेव जानकरांनी ती सुधारली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर खूप प्रेम केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्यावर प्रेम केलं. मला उमेदवारी मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तर अवघ्या १५ दिवसांत माझ्या प्रचाराला मतदारसंघात आले. मित्रांनो, बारामतीकरांनो माझी तुम्हाला विनंती आहे की ही जागा आपल्याला मिळाली पाहिजे. या जागेवर आपला उमेदवार जिंकला पाहिजे. बांधवांनो सुनेत्रा वहिनी बारामतीतून जिंकल्या पाहिजेत. अजित पवार हा तर खूप मनमोकळा माणूस आहे. अजित पवार हा भामटा माणूस… भाबडा माणूस आहे.
महादेव जानकर म्हणाले, देशात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार येणार असल्यामुळे मी बारामतीकरांना विनंती करतो की त्यांनी सुनेत्रा वहिनींना (उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी) भरघोस मतं देऊन साथ द्यावी. मग आम्ही दिल्लीतून बारामतीच्या विकासाला लागणारा विकासनिधी आणण्याचा प्रयत्न करू.
हे ही वाचा >> “माझ्या पक्षाचं चिन्ह न्यायालयातून…”, राज ठाकरेंचा शिंदे गटाला टोला; शिवसेनेच्या ऑफरबाबत म्हणाले…
दरम्यान, सभेनंतर आयोजित पत्रकार परिषदेत महादेव जानकर यांनी धनगर समाजाच्या सवलतींवर भाष्य केलं. जानकर म्हणाले, देवेंद्र फडणवीसांचं सरकार असताना आम्ही आदीवासींच्या २२ सवलती धनगर समाजाला लागू केल्या होत्या. उद्या मी खासदार होणार आहे. तेव्हा त्या २२ सवलती लागू करण्यासाठी पंतप्रधान मोदींना विनंती करणार आहे. महाराष्ट्रात कायदा बनवला तसा तिथेही बनवणार आहे. विरोधक आदिवासींच्या सवलतींबाबत बोलतायत मात्र त्यांचं सरकार होतं तेव्हा त्यांनी काहीच केलं नाही. आता त्यांना धनगरांबाबत पान्हा फुटल्याचं दाखवतायत. मी उद्या परभणीचा खासदार आणि केंद्रात मंत्रीसुद्धा होणार आहे. तेव्हा आदीवासींना दिल्या जाणाऱ्या २२ सवलती धनगरांना लागू करण्यासाठी प्रयत्न करेन.