Maharashtra Assembly Election 2024 7995 Candidates files Nomination : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मंगळवारी (२९ ऑक्टोबर) शेवटचा दिवस होता. महाविकास आघाडी व महायुतीकडून मंगळवारी दुपारपर्यंत आपले उमेदवार जाहीर करणं चालूच होतं. अखेरपर्यंत महायुतीने व महाविकास आघाडीने त्यांचा जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला जाहीर केला नाही. दरम्यान, महायुतीने २८५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. तर महाविकास आघाडीने २८१ जणांना उमेदवारी दिली आहे. यासह मनसे, वंचित बहुज आघाडी, समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टीसह इतर अनेक पक्षांनी राज्यात त्यांचे उमेदवार उभे केले आहेत.

मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार एकूण ७,९९५ जणांनी १०,९०५ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. निवडणूक अधिकारी आज (३० ऑक्टोबर) या अर्जांची पडताळणी करतील. तर, निवडणूक आयोगाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार ४ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील.

हे ही वाचा >> Geeta Jain: “भाजपाकडून भ्रष्टाचार उमेदवाराला तिकीट, मी गुवाहाटाली जाऊनही…”, गीता जैन यांची टीका

महायुतीचा जागावाटपाचा गोंधळ

महायुतीच्या जागावाटपात भारतीय जनता पार्टीने १५२ जागा मिळवल्या आहेत. त्यापैकी १४८ जागांवर त्यांनी स्वतःचे उमेदवार जाहीर केले आहेत. तर, त्यांनी चार जागा त्यांच्या मित्रपक्षांसाठी सोडल्या आहेत. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला ८० जागा मिळाल्या असून त्यांनी दोन जागा मित्रपक्षांना दिल्या आहेत. अजित पवारांना वाटाघाटीत केवळ ५३ जागा मिळाल्या असून त्यांनी या सर्व जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत. महायुतीने एकूण २८३ जागांवर २८८ उमेदवार दिले आहेत. पाच मतदारसंघात महायुतीचे प्रत्येकी दोन उमेदवार आहेत. तर पाच मतदारसंघांमध्ये महायुतीने उमेदवार दिले आहेत की नाही हे कळू शकलेलं नाही. मालेगाव मध्य मतदारसंघात महायुतीने उमेदवार दिलेला नाही.

हे ही वाचा >> ‘मविआ’ सरकारच्या काळातच टाटा एअरबस, अन्य प्रकल्प राज्याबाहेर, देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना प्रत्युत्तर

महाविकास आघाडीचा १० जागांवर घोळ

दुसऱ्या बाजूला, महाविकास आघाडीच्या जागावाटपातही सावळागोंधळ पाहायला मिळाला. अखेरच्या दिवसापर्यंत त्यांच्या जागावाटपावरील चर्चा चालूच होत्या. मविआच्या जागावाटपात काँग्रेस मोठा भाऊ ठरला आहे. कारण त्यांनी राज्यात तब्बल १०४ उमेदवार जाहीर केले आहेत. त्यापाठोपाठ उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने ९० जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने ८७ उमेदवार दिले आहेत. मविआने राज्यातील एकूण २७७ जागांवर २८२ उमेदवार दिले आहेत. पाच मतदारसंघांमध्ये मविआचेच प्रत्येकी दोन उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. इतर १० मतदारसंघांमध्ये त्यांनी उमेदवार दिले आहेत की नाही, किंवा या जागांवर त्यांच्या मित्रपक्षांचा उमेदवार आहे का? हे कळू शकलेलं नाही.