Ghansawangi Assembly Election 2024 : घनसावंगी विधानसभा मतदासंघ : राजेश टोपे वर्चस्व कायम राखण्यात यशस्वी ठरणार?

या मतदारसंघाचा राजकीय इतिहास काय आहे? २००९, २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीची आकडेवारी काय सांगते? आणि या मतदारसंघातील सध्याचं चित्र काय आहे? याविषयी जाणून घेऊया.

Ghansawangi Assembly Constituenc
घनसावंगी विधानसभा निवडणूक २०२४ ( फोटो -लोकसत्ता ग्राफीक्स टीम )

घनसावंगी विधानसभा मतदारसंघ राजकीय दृष्ट्या अतिशय महत्त्वाचा असा मतदारसंघ आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरद पवार ) नेते राजेश टोपे यांच्या कुटुंबियांचे वचर्स्व राहिलं आहे. मात्र, आधी शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर आता या मतदारसंघातील राजकीय समीकरणं पूर्णपणे बदलली आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत राजेश टोपे त्यांचे वर्चस्व कायम राखणार की भाजपाच्या नेतृत्वातील महायुती या मतदारसंघात विजय साजरा करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, या मतदारसंघाचा राजकीय इतिहास काय आहे? २००९, २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीची आकडेवारी काय सांगते? आणि या मतदारसंघातील सध्याचं चित्र काय आहे? याविषयी जाणून घेऊया.

घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचा राजकीय इतिहास?

घनसावंगी विधानसभा मतदारसंघ हा जालना जिल्ह्यात असून २००८ च्या मतदारसंघ फेररचनेनंतर अस्तित्वात आला आहे. त्यापूर्वी हा भाग अंबड विधानसभा मतदार संघात होता. २००८ मध्ये घनसावंगी तालुका आणि अंबड आणि जालना तालुक्यातील काही गावांचा मिळून घनसावंगी हा नवा विधानसभा मतदारसंघ तयार करण्यात आला. विशेष म्हणजे हा मतदारसंघ जालना जिल्ह्यात असला तरी तो परभणी लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येतो. घनसावंगी या भाग १९९९ पासून राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. तेव्हापासून या भागावर राजेश टोपे यांच्या कुटुंबियांचे वर्चस्व आहे. राजेश टोपे हे या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत. साखर कारखान्यांमुळे राजेश टोपे यांचा या मतदारसंघावर प्रभाव आहे.

हेही वाचा – ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघ : विजय वडेट्टीवारांना पक्षांतर्गत संघर्षाचा फटका बसणार?

२००९, २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीची आकडेवारी काय सांगते?

२००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राजेश टोपे यांच्या विरोधात तत्कालीन भाजपा शिवसेना युतीने विद्यमान राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी उमेदवारी दिली होती. अतिशय चुरशीच्या झालेल्या या लढाईत राजेश टोपे यांचा २३ हजार ३०७ मतांनी विजय झाला होता. तेव्हापासून आजपर्यंत राजेश टोपे हे या मतदारसंघाचे आमदार आहेत. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत राजेश टोपे यांच्या विरोधात शिवसेनेकडून डॉ. हिकमत उढाण यांना, तर भाजपाने माजी आमदार विलास खरात यांना उमेदवारी दिली होती. मात्र, या निवडणुकीतही राजेश टोपे यांचा विजय झाला. तर २०१९ च्या निवडणुकीत राजेश टोपे आणि शिवसेनेच्या डॉ. हिकमत उढाण यांच्यात मुख्य लढत बघायला मिळाली. या निवडणुकीत राजेश टोपे यांचा विजय झाला. त्यांना एकूण १ लाख ७३ हजार ३७४ मते, तर डॉ. हिकमत उढाण यांना एकूण १ लाख ४ हजार १९४ मते मिळाली होती.

हेही वाचा – बल्लारपूर विधानसभा मतदारसंघ : सुधीर मुनगंटीवारांसमोरील आव्हानं ते काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष, कशी आहे मतदारसंघाची सद्यस्थिती?

या मतदारसंघाची सद्यस्थिती काय?

या मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार )चे वर्चस्व असलं तरी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर या मतदारसंघातील राजकीय समीकरणं पूर्णपणे बदली आहेत. महाविकास आघाडीच्या जागावाटपात हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे ( शरद पवार ) जाईल आणि राजेश टोपे हे उमेदवार असतील, हे जवळपास निश्चित आहे. मात्र, महायुतीत या जागेवरून वाद होण्याची शक्यता आहे. या मतदासंघावर शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि भाजपाने दावा केला आहे. त्यामुळे हा मतदारसंघ कुणाच्या वाट्याला येतो यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहे. याशिवाय वंचित बहुजन आघाडीदेखील या मतदारसंघातून निवडणूक लढण्याची शक्यता आहे. तसेच मनोज जरांगे फॅक्टरही महत्त्वाचा ठरणार आहे. लोकसभा निवडणुकीत याचा फटका भाजपाला बसला होता. त्यामुळे भाजपा या निडवणुकीत विशेष रणनीती आखण्याच्या प्रयत्नात आहे. एकंदरितच राजेश टोपे या मतदासंघातील त्यांचे वर्चस्व कायम राखणार की महायुतीला या मदारसंघात विजय मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Maharashtra assembly election 2024 ghansawangi vidhan sabha constituency history rajesh tope spb

First published on: 16-10-2024 at 17:35 IST
Show comments