Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीचा निकाल आज (२३ नोव्हेंबर) येत आहे. त्यामध्ये महाविकास आघाडी बाजी मारणार की महायुती पुन्हा एकदा सत्ता प्रस्थापित करणार? याकडे राज्याचे नव्हे, तर या देशाचे लक्ष लागून राहिले आहे. तर आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार भाजपाची सर्वात मोठा पक्ष होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा प्रदेश कार्यालयाबाहेर निकालाआधीच मोठ्या प्रमाणात जल्लोषाची तयारी करण्यात आली आहे. तसेच एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेरही फटाके फोडून जल्लोष केला आहे. जसजसे निवडणुकीचे निकाल जाहीर होतील, तसतसा कार्यकर्त्यांचा उत्साह वाढत जाणार आहे.
राज्यातील जनता नेमकी कोणत्या पक्षाला कौल देते? महाराष्ट्रात कोणता पक्ष मोठा पक्ष ठरणार? कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार? राज्यात कोणाची सत्ता येणार? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आता थोड्याच वेळात मिळणार आहेत. सकाळी झालेल्या फेऱ्यांमध्ये महायुतीनं जोरदार मुसंडी मारली असून, बहुमतापेक्षाही अधिकचा जागा गाठला आहे. भाजपानं २०१९ पेक्षाही अधिक जागांवर आघाडी घेतली आहे; तर मविआ पिछाडीवर आहे. महायुतीत भाजपाबरोबर राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि शिवसेनेचा समावेश आहे. महायुतीत घटक पक्ष असलेल्या भाजपानं यापूर्वीच बहुमतानं सरकार येईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
निकालाआधीच महायुतीचा जल्लोष
दरम्यान, महायुतीनं आघाडी घेतल्यानंतर आता भाजपाचे कार्यकर्ते आणि शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) कार्यकर्ते जल्लोष करत आहेत. याचा व्हिडीओही सध्या समोर आला असून, व्हिडीओमध्ये मिठाईचे मोठ्या प्रमाणात बॉक्स कार्यकर्त्यांनी आणलेले आहेत; तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेरही फटाके फोडून जल्लोष केला आहे. एकंदरीत भाजप कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांचा जल्लोष उत्साह पाहायला मिळत आहे.
पाहा व्हिडीओ
तर दुसरीकडे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि बारामती विधानसभेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अजित पवार यांच्या समर्थकांनीही बारामतीमध्ये फटाके फोडत आनंदोत्सव साजरा केला आहे. बारामतीचा एकच दादा अजितदादा अजितदादा, एकच वादा अजितदादा, अजितदादा तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, अशी घोषणाबाजी करत आनंद साजरा केला जात आहे. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी हातात राष्ट्रवादीचे झेंडे घेऊन जोरदार जल्लोष केला. त्यामुळे बारामतीत निकालाआधीच अजित पवारांच्या विजयाचा गुलाल उधळला जात आहे.