Maha Vikas Aghadi Seat Sharing Live Updates : विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विधानसभेसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे, तर २३ नोव्हेंबर रोजी निकाल लागणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच पक्षांचे नेते जोरदार कामाला लागले आहेत. महायुती, महाविकास आघाडीतील पक्षांसह इतर सर्वच पक्षांच्या उमेदवारांच्या याद्या जाहीर झाल्या आहेत. यातच आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीत चार मोठ्या नेत्यांचा पक्ष प्रवेश झाला आहे. पक्ष प्रवेश होताच अजित पवारांकडून त्यांना उमेदवारीही जाहीर करण्यात आली आहे. आज अजित पवारांकडून सात उमेदवारांची घोषणा करण्यात आली. तसेच इतरही अनेक राजकीय घडामोडी आज पाहायला मिळतील. या सर्व घडामोडींवर आपलं लक्ष असेल. राज्यातील राजकीय व सामाजिक घडामोडींचा वेध आपण या लाइव्ह न्यूज ब्लॉगद्वारे जाणून घेणार आहोत.

Live Updates

Maharashtra Breaking News Live Today, 25 October 2024 : अजित पवारांच्या राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर, कोणाला मिळाली संधी?

13:04 (IST) 25 Oct 2024
काँग्रेस पक्षाची दुसरी यादी कधी येणार? नाना पटोलेंनी सांगितली तारीख

विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीसह इतर काही पक्षांनी आपल्या उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या आहेत. आता काँग्रेस पक्षाची दुसरी यादी कधी येणार? याबाबत नाना पटोले यांनी माहिती दिली आहे. आज संध्याकाळपर्यंत काँग्रेस पक्षाची दुसरी यादी याहीर होणार असल्याची माहिती नाना पटोले यांनी दिली.

13:00 (IST) 25 Oct 2024
तू मेलीस तर बरे होईल… पतीच्या टोमण्यांना वैतागूण महिला पोलीसाची आत्महत्या  

पनवेल ः नवी मुंबई पोलीस दलात कार्यरत असणा-या एका महिला पोलीसाने पतीच्या वेळोवेळीच्या वागणूक आणि टोमण्यांना वैतागूण आत्महत्येचा मार्ग निवडला.

सविस्तर वाचा...

12:41 (IST) 25 Oct 2024
तोतया डॉक्टरविरुद्ध गुन्हा, वैद्यकीय पदवी नसताना व्यवसाय

पुणे : वैद्यकीय पदवी नसताना वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या तोतया डाॅक्टरविरुद्ध विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

सविस्तर वाचा...

12:26 (IST) 25 Oct 2024
‘बेस्ट’अधिकाऱ्यांना फौजदारी समन्स ; दिव्यांग चालकांना पर्यायी काम नाकारल्याबद्दल औद्योगिक न्यायालयाकडून समन्स

मुंबई : ‘बेस्ट’उपक्रमातील दिव्यांग चालकांना पर्यायी काम नाकारणाऱ्या बेस्टचे महाव्यवस्थापक आणि संबंधित अधिकाऱ्यांना औद्योगिक न्यायालयाने समन्स जारी केले आहे.

सविस्तर वाचा...

11:46 (IST) 25 Oct 2024
शरद पवारांना फोडाफोडीचे नोबेल पारितोषिकच दिले जावे, खासदार उदयनराजेंचा टोला

कराड : खासदार शरद पवारांना राजकारणातील फोडाफोडीचे नोबेल पारितोषिकच दिले जावे असा टोला लगावताना, शरद पवारांचा पूर्वी बालेकिल्ला असलेल्या सातारा जिल्ह्यातील विधानसभेच्या सर्व आठही जागांवर महायुतीचेच उमेदवार मताधिक्याने विजयी होतील असा ठाम दावा खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

वाचा सविस्तर...

11:46 (IST) 25 Oct 2024
नवले पूल परिसरात देहविक्रय करणाऱ्या महिलांवर गुन्हा, नागरिकांच्या तक्रारीनंतर कारवाई

पुणे : मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर नवले पूल परिसरात देहविक्रय करणाऱ्या आठ महिलांविरुद्ध अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. महिलांकडून अश्लील हावभाव करण्यात येत असून, या भागातील रहिवाशांना त्रास होत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे करण्यात आल्या होत्या.

वाचा सविस्तर...

11:45 (IST) 25 Oct 2024
डॉ. सुनील देशमुखांचे काँग्रेस उमेदवारीचे वर्तुळ पूर्ण! पंधरा वर्षांनंतर मिळाली संधी

अमरावती : अपेक्षेनुसार अमरावती विधानसभा मतदारसंघातून माजी राज्‍यमंत्री डॉ. सुनील देशमुख यांना काँग्रेसची उमेदवारी जाहीर झाली आणि तब्‍बल पंधरा वर्षांच्‍या प्रतीक्षेनंतर काँग्रेसच्‍या उमेदवारीचे त्‍यांचे वर्तुळ पूर्ण झाले. त्‍यांचा राजकीय प्रवास नाट्यपूर्ण आहे. २००९ मध्‍ये उमेदवारी नाकारण्‍यात आल्‍यानंतर त्‍यांनी केलेले बंड देशभर गाजले होते.

वाचा सविस्तर...

11:39 (IST) 25 Oct 2024
काँग्रेसकडून बहीण बेदखल, भावाला आमदारकीची डबल हॅटट्रिक करण्याची संधी…

वर्धा : काँग्रेसकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली. त्यात वर्धा जिल्ह्यात एकमेव उमेदवार जाहीर झाले. माजी मंत्री व देवळीचे आमदार रणजित कांबळे हे आता लढत देण्यास परत सज्ज झाले आहे. १९९९ पासून ते आमदार आहेत. आमदारकीची २५ वर्ष त्यांनी पूर्ण केलीत. सलग पाच वेळा निवडून आलेल्या कांबळे यांनी आता सहाव्यांदा संधी घेतली. विदर्भातील ते काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार ठरतात.

वाचा सविस्तर...

11:10 (IST) 25 Oct 2024
'महाविकास आघाडीतील जाहीर झालेल्या उमेदवारांच्या नावात बदल होऊ शकतो'; संजय राऊतांचं मोठं विधान

"महाविकास आघाडीतील जाहीर झालेल्या उमेदवारांच्या एखाद्या दुसऱ्या जागेबाबत पुन्हा चर्चा होऊ शकते. एखाद्याच्या नावात एडीटींग (बदल) होऊ शकते. कॉग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार), आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये आमच्या एखाद्या दुसऱ्या जागेबाबत पुन्हा एकदा चर्चा होऊ शकते. रामटेकच्या जागेवर शिवसेनेचा विद्यमान आमदार आहे. त्यामुळे काय करायचं ते आम्ही निर्णय घेणार आहोत", असं मोठं विधान संजय राऊत यांनी केलं.

10:50 (IST) 25 Oct 2024
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थोड्याच वेळात भरणार उमेदवारी अर्ज

विधानसभेसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे, तर २३ नोव्हेंबर रोजी निकाल लागणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज थोड्या वेळात उमेदवारी अर्ज भरणार आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याच्याआधी देवेंद्र फडणवीस यांचं त्यांच्या कुटुंबियांकडून औक्षण करण्यात आलं आहे.

10:02 (IST) 25 Oct 2024
अजित पवारांच्या राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर, कोणाला मिळाली संधी?

विधानसभा निवडणुकीसाठी आज अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये सात उमेदवारांचा समावेश आहे. यामध्ये वांद्रे पूर्वमधून झिशान सिद्दिकी, इस्लामपूरमधून निशिकांत पाटील,तासगावमधून ​​​​​​संजयकाका पाटील, लोहा कंधारमधून प्रताप चिखलीकर, वडगाव शेरीमधून सुनील टिंगरे, शिरुर हवेलीमधून ज्ञानेश्वर कटके, अनुशक्तीनगरमधून सना मलिक यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

https://platform.twitter.com/widgets.js

maharashtra assembly election 2024

(फोटो-अजित पवार सोशल मीडिया)

अजित पवारांच्या राष्ट्रवादीत चार मोठ्या नेत्यांचा प्रवेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये आज चार मोठ्या नेत्यांनी पक्षप्रवेश केला. यामध्ये सांगलीचे माजी खासदार संजय काका पाटील, आमदार झिशान सिद्दिकी, सांगलीचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील आणि माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा समावेश आहे.