2024 Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk Live Updates, 22 November 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी (२० नोव्हेंबर) मतदान पार पडले. या निवडणुकीत महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान पार पडले. राज्यात सरासरी ६५ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झालं. पाठोपाठ अनेक संस्था व वृत्तवाहिन्यांनी त्यांचे निवडणुकीच्या निकालाबाबतचे एक्झिट पोल्स जाहीर केले. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीपेक्षा विधानसभा निवडणुकीत जवळपास चार टक्के मतदान वाढलं आहे. गेल्या ३० वर्षांतील हे सर्वाधिक मतदान आहे. त्यामुळे वाढलेलं मतदान नेमकं कोणाच्या पारड्यात पडलंय? हा प्रश्न उपस्थित होत आहे. बुधवारी जाहीर झालेल्या एकूण १० एक्झिट पोल्सपैकी सहा पोल्सनी महायुतीला बहुमत मिळेल असा अंदाज वर्तवला आहे. तर काही पोल्सनी राज्यात त्रिशंकू परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली आहे. तीन एक्झिट पोल्सनी जनतेचा महाविकास आघाडीच्या बाजूने कल असल्याचं सूचवलं आहे. मतदान, एक्झिट पोल्स व उद्या जाहीर होणारा निकाल यावर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. राजकीय मोर्चेबांधणी, चर्चा, बैठका चालू झाल्या आहेत. या सर्व राजकीय घडामोडींवर आमचं लक्ष असेल. यासंबंधीच्या बातम्यांचा आढावा आपण या लाईव्ह न्यूज ब्लॉगद्वारे घेणार आहोत.
2024 Maharashtra Assembly Election Live Updates, 22 November 2024 : राजकीय घडामोडींचा आढावा एकाच क्लिकवर.
पंतप्रधान मोदी, राहूल गांधींची सभा झालेल्या या मतदारसंघात झाले ८१ टक्के विक्रमी मतदान
नागपूर : विदर्भातील तब्बल ४१ मतदार संघात २०१९ च्या तुलनेत मतदानाचा टक्का वाढला आहे. त्यामुळे विदर्भातील मतदानाचा वाढलेला टक्का नेमका कोणाला फायदेशीर ठरेल अशी चर्चा सुरू झाली आहे.
- मुंबई भाजपचे सचिव सचिन शिंदेंच्या हाती मशाल
- उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत सचिन शिंदेंचा ठाकरे गटात प्रवेश
या पक्षप्रवेशावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, आज सचिन शिंदे शिवसेनेत प्रवेश करतायत, त्यांचं मी स्वागत करतो.ते त्यांच्या जीवाभावांच्या कार्यकर्त्यांसह प्रवेश करतायत. त्यांनी एक व्यथा मांडली. त्यांच्यावर अन्याय झाला नाही पण न्यायही मिळाला नाही. मी तुम्हाला (शिंदे) शब्द देतो की तुम्हाला पश्चाताप होणार नाही. मी तुम्हाला जनतेपर्यंत पोहचण्याची संधी देईन. सर्वांना उद्याच्या निकालाची उत्सुकता आहे. पण, कालचा बॅाम्ब आधी फुटला असता तर मोठा स्फोट झाला असता. १९ तारखेला वसई - विरारला नोटांचा बॅाम्ब फुटला तो मोठा आहे. कालचा जो काही बॅाम्ब फुटला त्याने संपूर्ण देश हादरला, या घोटाळे बाजांचं काय करणार हा प्रश्न केंद्र सरकार ला विचारला पाहिजे.
नाशिक पश्चिममध्ये मतदान यंत्र, व्हीव्हीपॅट यांच्यात बदल ठाकरे गटाचा आरोप
नाशिक : नाशिक पश्चिम विधानसभा मतदार संघात उमेदवारांना अंधारात ठेवून सात केंद्रात मतदान यंत्र आणि व्हीव्ही पॅट परस्पर बदलण्यात आल्याचा आरोप शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) उमेदवार तथा जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी केला आहे.
राज्यभरात निवडणुकीशी संबंधित १५९ गुन्हे, ‘ईव्हीएम’ मोडतोड, आचारसंहितेचा भंग
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी राज्यभरात कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. निवडणुकीदरम्यान १५९ गुन्हे दाखल करण्यात आले.
ठाणे जिल्ह्यात मतटक्का वाढला, गेल्या निवडणुकीच्या तुलनेत ४ टक्क्यांनी मतदान वाढले
ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी मतदान प्रक्रीया पार पडली असून यामध्ये जिल्ह्यात ५६.०५ टक्के इतके मतदान झाल्याचे समोर आले आहे. गेल्या निवडणुकीत ५२ टक्के इतके मतदान झाले होते. यामुळे या निवडणुकीत ४ टक्क्यांनी मतदान वाढल्याचे दिसून येत आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात महाविकास आघाडीला किती जागा मिळतील? विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा
विधानसभेच्या निकालाआधीच काही राजकीय नेते सत्तास्थापनेबाबत दावे करत आहेत. याबाबत आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नाना पटोले यांच्याबाबत केलेल्या विधानावर प्रत्युत्तर दिलं आहे. “नाना पटोले यांनी ते मुख्यमंत्री होणार असं कुठेही म्हटलेलं नाही”, असं म्हणत महाविकास आघाडी १६५ ते १७० जागा जिंकेल, असा दावा केला आहे
"शिंदे-फडणवीसांकडून अपक्षांना ५० ते १०० कोटींची ऑफर", ठाकरेंच्या शिवसेनेचा मोठा दावा
एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस उशाला पैशांची बंडलं घेऊन झोपतात. त्यांनी अपक्षांना ५० ते १०० कोटी रुपयांची ऑफर द्यायला सुरुवात केली आहे. याचा अर्थ ही निवडणूक आम्ही जिंकतोय.