Maharashtra Assembly Election 2024 Seat Sharing Formula : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आजचा शेवटचा दिवस होता. महाविकास आघाडी व महायुतीने आज दुपारपर्यंत आपले उमेदवार जाहीर करणं चालूच ठेवलं होतं. अखेरपर्यंत महायुतीने त्यांचा जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला जाहीर केला नाही, अशीच स्थिती महाविकास आघाडीची देखील आहे. मविआ नेत्यांनी ८५ – ८५ – ८५ असा फॉर्म्युला सांगितला होता खरा, मात्र काँग्रेसने १०० हून अधिक उमेदवार जाहीर केले. तर, शरद पवारांच्या राष्ट्रवादीने देखील ८५ हून अधिक उमेदवार जाहीर केले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने देखील ८५ पेक्षा जास्त जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामुळे मविआचा नेमका जागावाटपाचा फॉर्म्युला काय होता हे काही समजू शकलेलं नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दोन्ही बाजूच्या जागावाटपाच्या फॉर्म्युलात गोंधळ पाहायला मिळत आहे. अनेक मतदारसंघांमध्ये मविआचे दोन उमेदवार एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. तर, चार मतदारसंघात महायुतीच्या दोन पक्षांचे उमेदवार दोस्तीत कुस्ती करताना दिसणार आहेत. मात्र, निवडणूक आयोगाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार ४ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. त्यामुळे, काही उमेदवार माघार घेऊ शकतात आणि हे चित्र बदलू शकतं.

हे ही वाचा >> शिवसेना शिंदे गटाचा अजित पवार गटाला धक्का, हेलिकॉप्टरमधून एबी अर्ज आणून देवळाली, दिंडोरीत बंडखोरी

महायुतीचा जागावाटपाचा गोंधळ

महायुतीत भारतीय जनता पार्टीला १५२ जागा मिळाल्या आहेत. त्यापैकी १४८ जागांवर त्यांनी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. तर, चार जागांवर त्यांच्या मित्रपक्षांचे उमेदवार आहेत. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला ८० जागा मिळाल्या असून त्यांनी दोन जागा मित्रपक्षांना सोडल्या आहेत. अजित पवारांनी ५३ उमेदवार जाहीर केले आहेत.. महायुतीने एकूण २८३ जागांवर २८५ उमेदवार जाहीर केले आहेत. दोन मतदारसंघात महायुतीचे प्रत्येकी दोन उमेदवार आहेत. तर पाच मतदारसंघांमध्ये महायुतीने उमेदवार दिले आहेत की नाही हे कळू शकलेलं नाही. मालेगाव मध्य मतदारसंघात महायुतीने उमेदवार दिलेला नाही.

महायुतीचा अंतिम फॉर्म्युला

पक्षउमेदवारांची संख्या
भारतीय जनता पार्टी + मित्रपक्ष१४८ + ४ = १५२
शिंदेंची शिवसेना + मित्रपक्ष७८ + २ = ८०
अजित पवारांची राष्ट्रवादी५३
एकूण२८३ जागांवर २८५ उमेदवार

हे ही वाचा >> Uddhav Thackeray : ऐन निवडणुकीत उद्धव ठाकरेंकडून तीन जिल्हाप्रमुखांची हकालपट्टी; कारवाईचं कारण काय?

मविआचा १० जागांवर घोळ

दुसऱ्या बाजूला, महाविकास आघाडीच्या जागावाटपातही सावळागोंधळ पाहायला मिळाला. मविआच्या जागावाटपात काँग्रेस मोठा भाऊ ठरला आहे. कारण त्यांनी राज्यात तब्बल १०४ उमेदवार दिले आहेत. त्यापाठोपाठ उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने ९० जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने ८७ उमेदवार दिले आहेत. मविआने राज्यातील एकूण २७७ जागांवर २८१ उमेदवार दिले आहेत. चार मतदारसंघांमध्ये मविआचेच दोन उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. इतर १० मतदारसंघांमध्ये त्यांनी उमेदवार दिले आहेत की नाही, किंवा या जागांवर त्यांच्या मित्रपक्षांचा उमेदवार आहे का? हे कळू शकलेलं नाही.

मविआचा अंतिम फॉर्म्युला

पक्षउमेदवारांची संख्या
काँग्रेस१०४
ठाकरेंची शिवसेना९०
शरद पवारांची राष्ट्रवादी ८७
एकूण२७७ जागांवर २८१ उमेदवार
मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra assembly election 2024 mahayuti mahavikas aghadi final seat sharing formula asc