आर्वी
वर्धा : आर्वी, कारंजा व आष्टी या तीन तालुक्यांचा व दुधाळ पट्टा म्हणून ओळख असलेल्या आर्वी या काँग्रेसच्या बालेकिल्यात खासदार अमर काळे यांच्या पत्नी मयुरा काळे विरुद्ध देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी सुमित वानखेडे असा सामना सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. विधानसभा निवडणुकीत आर्वीची जागा काँग्रेसला सुटणार, असा अंदाज असताना ती राष्ट्रवादीकडे गेली, येथून राष्ट्रवादीने खासदारांच्या पत्नी मयुरा काळे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या लढतीला पवार विरुद्ध फडणवीस अशी किनार आहे. परिणामी दोन्ही उमेदवारांसाठी ती अस्तित्वाची लढाई समजली जाते.
काँग्रेसचा हा गड राखणारे काळे कुटुंब लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आग्रहास्तव राष्ट्रवादीत (शरद पवार) गेले आणि या निवडणुकीत भाजपशी दोन हात करीत अमर काळे विजयी झाले. विधानसभेत ही जागा राष्ट्रवादीकडे गेली आणि येथून मयुरा काळे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे या मतदारसंघातून काँग्रेसचा ‘पंजा’ गायब झाला आहे. खासदार काळे यांनी पत्नीसाठी उमेदवारी आणल्याने आघाडीत नाराजीचा सूर आहे.
महायुतीत विद्यामान आमदार दादाराव केचे यांना डावलून फडणवीस यांचे विश्वासू सहकारी सुमित वानखेडेंना उमेदवारी दिली. त्यामुळे केचे यांनी बंड केले. त्यांच्या बंडखोरी नाट्याचीही राज्यभर चर्चा झाली. त्यांना गृहमंत्री अमित शहा यांच्या दारी नेत समजूत काढण्यात भाजपला यश आले. यातून वानखेडे यांच्यासाठी ‘सर्व काही’ असे पक्षाचे धोरण असल्याचे दिसून आले. लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात खासदार अमर काळे यांना सुमारे २० हजार मतांची आघाडी मिळाली होती. यामुळे काळे यांना पत्नीला विजयाचा विश्वास वाटतो.
निर्णायक मुद्दे
● कोणताही कारखाना, सूतगिरणी किंवा अन्य उद्याोग नसल्याने बेरोजगारीचे प्रमाण अधिक आहे. यामुळे सुशक्षित युवा मतदार त्रस्त आहेत. प्रामुख्याने सिंचन सुविधा अपेक्षित आहेत.
● मतदारसंघात कुणबी, तेली, भोयर पवार, आदिवासी समाज प्रामुख्याने आहेत. दोन्ही प्रमुख उमेदवारही कुणबी समाजाचे आहेत. आदिवासी, गवळी समाज निर्णयक भूमिका पार पाडतो, तसेच लक्षणीय संख्येत असलेल्या मुस्लीमांचा कल निर्णायक ठरतो.
● पालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीत भाजपचे वर्चस्व आहे. मतदारसंघातील तीनही तालुक्यात आघाडी विरुद्ध युती असाच संघर्ष आहे. पण सत्तेच्या प्रभावातून परिसराचा कायापालट करता येऊ शकतो, हे वानखेडे यांनी दाखवून दिल्याने ते युवा, शेतकरी व छोट्या समाज घटकास आकर्षित करणारे ठरले आहे.