सोलापूर : दिवाळी सरताच विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी वाढली आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्या संघर्षामध्ये दोन्ही बाजूंकडील अनेक बलाढ्य नेते सोलापूर जिल्ह्यात येत आहेत. येत्या १२ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे दोघे एकाच दिवशी सोलापुरात प्रचार सभांसाठी येत आहेत. त्या वेळी या दोन्ही नेत्यांची राजकीय जुगलबंदी पाहावयास मिळणार आहे.
उद्धव ठाकरे हे सोलापूर जिल्ह्यात सोलापूर दक्षिण, सांगोला आणि बार्शी या तीन मतदारसंघांमध्ये आपल्या पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी येत आहेत. १० नोव्हेंबर रोजी त्यांची पहिली सभा सांगोल्यात होणार आहे. त्यानंतर सायंकाळी सोलापूर दक्षिण मतदारसंघात दुसरी सभा होणार आहे. १२ नोव्हेंबर रोजी ते पुन्हा सोलापूर जिल्ह्यात बार्शी येथे प्रचार सभेसाठी येणार आहेत. विशेषतः सांगोला येथे ‘काय झाडी, काय डोंगार, काय हॉटिल’ या खास मानदेशी भाषाशैलीतून साधलेल्या संवादामुळे गाजलेले सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्यावर उद्धव ठाकरे हे कशाप्रकारे टीकेची तोफ डागतात, याची सार्वत्रिक उत्सुकता आहे.
हे ही वाचा… Maharashtra Assembly Election 2024 Live : उद्धव ठाकरेंचा इशारा “संघर्षाची ठिणगी पडू द्यायची नसेल तर…”
याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या प्रचारसभांकडे सर्वांचे लक्ष वेधले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील उद्धव ठाकरे यांच्या बार्शी दौऱ्याच्या दिवशीच येत आहेत. १२ नोव्हेंबर रोजी दुपारी त्यांची जाहीर सभा होम मैदानावर होणार असून, त्याची जय्यत तयारी केली जात आहे. उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी हे एकाच दिवशी सोलापुरात आल्यानंतर त्यांच्याकडून एकमेकांच्या विरोधात टीकेचा मारा कशा पद्धतीने होणार, याची सार्वत्रिक उत्सुकता कायम आहे.