Ambegaon Assembly Elections 2024 Result : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांनी मतदारसंघात पुन्हा एकदा आपलं वर्चस्व निर्माण करण्यासाठी कंबर कसली होती. अनेक नेत्यांनी मतदारसंघात दौरे करत कामांचा आढावा राजकीय नेते मंडळी घेत होते. राज्यातील अनेक मतदारसंघात २०२४ ची विधानसभा निवडणूक अनेक नेत्यांसाठी प्रतिष्ठेची मानली जात होती. आता राज्याच्या राजकारणात चर्चेत असलेल्या पुण्यातील आंबेगाव विधानसभा मतदारसंघात (Ambegaon Assembly Elections 2024) विधानसभेच्या निवडणुकीसाठी महायुतीत (Mahayuti) रस्सीखेच पाहायला मिळाली.
आंबेगाव मतदारसंघामधून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) हे विद्यमान आमदार आहेत. मात्र, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षातील फुटीनंतर राज्याच्या राजकारणाची समीकरणे बदलली. याचा परिणाम स्थानिक राजकारणातही पाहायला मिळतो. राजकीय समीकरणात झालेल्या बदलानंतर विधानसभा निवडणुकीत आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच पाहायला मिलाली. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत आंबेगाव विधानसभा मतदारसंघात कुणाचा झेंडा फडकणार? महायुती बाजी मारणार की महाविकास आघाडी? तसेच दिलीप वळसे पाटील पुन्हा एकदा आपलं वर्चस्व राखणार का? असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत होते. मात्र, अखेर या निवडणुकीत दिलीप वळसे पाटलांनी बालेकिल्ला राखला आहे, तर महाविकास आघाडीच्या देवदत्त निकमांचा पराभव झाला आहे.
हेही वाचा : Byculla Vidhan Sabha : विधानसभेला भायखळा मतदारसंघात कोण बाजी मारणार? महाविकास आघाडी की महायुती?
आंबेगाव विधानसभा मतदारसंघात मुख्य लढत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी झाली. गेली ३० ते ३५ वर्ष आंबेगाव तालुक्याचे नेतृत्व दिलीप वळसे पाटील करत आहेत. आता पुन्हा एकदा अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून त्यांनी ही निवडणूक लढवली. दरम्यान, वळसे पाटील यांची कन्या पूर्वा दिलीप वळसे पाटील विधानसभेची निवडणूक लढवणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात होत्या. मात्र, काही दिवसांपूर्वी दिलीप वळसे पाटील यांनी स्वत: जनसन्मान यात्रेत या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला होता. ‘माझी मुलगी निवडणूक लढवणार नाही’, असं त्यांनीच सांगितलं होतं. तसेच मी स्वतः विधानसभेची निवडणूक नाईलाजास्तव लढवत असल्याचं विधानही त्यांनी केलं होतं. मात्र, यावरूनच आंबेगाव विधानसभेची जागा शिवसेनेला सोडावी, अशी मागणी शिवसेनेकडून (शिंदे गट) करण्यात आली होती. त्यामुळे आंबेगावमध्ये महायुतीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला होता. मात्र, अखेर दिलीप वळसे पाटील यांनीच निवडणूक लढवली आणि जिंकली देखील.
दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे देवदत्त निकम यांना आंबेगावसाठी उमेदवारी मिळाली होती. त्यामुळे आंबेगाव विधानसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार? याकडे अनेकाचं लक्ष लागलं होतं. मात्र, असं असलं तरी आंबेगावमध्ये अटीतटीची लढत होईल, असा अंदाज राजकीय जाणकारांनी वर्तवला होता. आंबेगाव मतदारसंघात महायुती सरकारच्या काळात केलेल्या विकास कामांच्या जोरावर दिलीप वळसे पाटील यांनी निवडणुकीत प्रचार केला. दिलीप वळसे पाटील यांनी आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचे सलग सात वेळा प्रतिनिधित्व केलं आहे. त्यामुळे या मतदारसंघात दिलीप वळसे पाटील यांची ताकद मोठी मानली जात होती. आता या २०२४ च्या विधानसभेच्या निवडणुकीत दिलीप वळसे पाटील यांनी पुन्हा एकदा विजय मिळवला आहे.
दिलीप वळसे पाटलांना शरद पवारांनी दिला इशारा
आंबेगाव मतदारसंघात दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात प्रचार करताना शरद पवार यांनी जाहीर इशारा दिला. शरद पवार म्हणाले की, “ज्यांना मी मदत केली, शक्ती दिली, ज्यांना अधिकार दिला, ज्यांचा मी सन्मान केला त्यांच्याकडून मला काहीही नको. मात्र, आज त्यांच्यावर मतदारसंघातील लोक नाराज आहेत. त्यांनी (दिलीप वळसे पाटील) आम्हा लोकांचा शब्द पाळला नाही हे लोकांना आवडलेलं नाही. आमची साथ सोडली आणि आता तिकडे मंत्रिमंडळात बसले. आता ते लोकांना सांगतात, ते लोकांना खोटं बोलतात. ते लोकांना काय सांगतात? आमचे आणि शरद पवारांचे संबंध अजूनही चांगले आहेत. मात्र, अशी कोणतीही गोष्ट नाही”, असं शरद पवार म्हणाले.
“आता ते (दिलीप वळसे पाटील) सांगतात की निवडणुका आल्या आहेत. शरद पवार मतदारसंघात येतील. मात्र, माझ्याबाबत काहीही बोलणार नाहीत. आता त्यांच्याबाबत काय बोलायचं? त्यांनी बोलायला काय ठेवलंय? त्यांनी बोलायला काहीही ठेवलेलं नाही. त्यांनी फक्त एकच गोष्ट केली, ती म्हणजे त्यांनी गद्दारी केली. जो गद्दारी करतो त्या गद्दाराला शिक्षा द्यायची असते. या विधानसभेच्या निवडणुकीत माझा तुम्हाला एकच शब्द आहे. या निवडणुकीत दिलीप वळसे पाटलांना १०० टक्के पराभूत करा”, असं शरद पवार यांनी म्हटलं होतं. मात्र, लोकांनी शरद पवारांच्या या अहवानाला साथ दिली नाही. उलट मोठ्या मताधिक्यांनी दिलीप वळसे पाटील निवडून आले आहेत.
२०१९ च्या निवडणुकीत कशी लढत झाली होती?
दरम्यान, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत दिलीप वळसे पाटील यांनी १,२६,१२० मते मिळवून विजय मिळवला होता, तर शिवसेना (Shivsena) पक्षाचे बाणखेले राजाराम भिवसेन यांना दुसऱ्या क्रमांकाची ५९,२१२ मते मिळाली होती. या निवडणुकीत दिलीप वळसे पाटील यांनी शिवसेनेच्या बाणखेले राजाराम भिवसेन यांचा ६६७७५ मतांनी पराभव करून विजय मिळवला होता.
२०१९ ची मतदारांची संख्या
पुणे जिल्ह्यात आंबेगाव हा (विधानसभा क्र.१९६) विधानसभा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात २०१९ च्या आकडेवारीनुसार, पुरुष मतदारांची संख्या १,४१,१९७ तर महिला मतदारांची संख्या १,२८,९३६ एवढी आहे. तसेच एकूण मतदारांची संख्या २,७०,१३३ एवढी आहे.
२०२४ च्या निवडणुकीत आंबेगावमध्ये किती टक्के मतदान झालं?
आंबेगाव मतदारसंघात अंदाजे सुमारे ७२.४२ टक्के टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे. दरम्यान दुपारी तीन वाजेपर्यंत ४९.५५ टक्के मतदारांनी मतदान केलं होतं. दरम्यान, दुपारनंतर मतदानाचा वेग वाढला होता. त्यामुळे ७२ टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे.