Maharashtra Assembly Election 2024 Face for CM Post : महाराष्ट्र विधानसभेसाठी बुधवारी (२० नोव्हेंबर) मतदान पार पडलं. आता शनिवारी (२३ नोव्हेंबर) या निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाईल. महाराष्ट्रासह देशभरातील लोकांचं या निकालाकडे लक्ष लागलं आहे. तत्पूर्वी निवडणूक निकालाचे एक्झिट पोलदेखील समोर आले आहेत. या पोल्सनुसार महायुतीचं पारडं जड दिसत आहे. मात्र, २०१९ च्या निवडणुकीत जवळपास सर्वच एक्झिट पोल चुकीचे ठरले होते. त्यामुळे यंदा काय निकाल लागतो याबाबत लोकांची उत्सुकता वाढली आहे. दरम्यान, महायुतीमधील सर्वच नेत्यांनी दावा केला आहे की राज्यात आम्हालाच बहुमत मिळेल आणि आम्ही लवकरच राज्यात सरकार स्थापन करू. मात्र, राज्यात महायुतीचं सरकार आल्यास मुख्यमंत्री कोण होणार हा प्रश्न उपस्थित केला जात आहे? त्यावर महायुतीमधील नेत्यांनी वेगवेगळ्या नेत्यांची नावं घेतली आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या निकालाआधीच महायुतीत मुख्यमंत्रिपदावरून रस्सीखेच चालू आहे का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी त्यांना विचारण्यात आलं की महायुतीची सत्ता आल्यास मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेईल? भाजपा कार्यकर्त्यांची इच्छा आहे की देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असावेत. यावर बावनकुळे म्हणाले, “भाजपा कार्यकर्त्यंना १०० टक्के वाटतं की आमचा नेताच मुख्यमंत्री व्हायला हवा. देवेंद्र फडणवीस मुख्यमत्री व्हावेत असं सर्वांनाच वाटतं. त्याचप्रमाणे शिवसेनेला (शिंदे) वाटतं की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हायला हवेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) कार्यकर्त्यांना वाटतं की अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत. अखेर मुख्यमंत्रीपदाबाबत केंद्रीय नेतृत्व व राज्यातील हे तीन प्रमुख नेते (एकनाथ शिदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार) बसून चर्चा करतील आणि निर्णय घेतील”.

हे ही वाचा >> “आमच्याशिवाय सत्तास्थापन होऊ शकत नाही”, एक्झिट पोल पाहून शिंदे-फडणवीसांच्या मित्राने शड्डू ठोकला

बावनकुळेंच्या वक्तव्यावर शिवसेनेची (शिंदे) प्रतिक्रिया

दरम्यान, बावनकुळे यांच्या वक्तव्यावर आता शिवसेनेकडून (शिंदे) प्रतिक्रिया आली आहे. शिवसेनेचे आमदार व प्रवक्ते संजय शिरसाट म्हणाले, “भाजपाचा नेता मुख्यमंत्री व्हावा असं बावनकुळे यांना वाटणं स्वाभाविक आहे. त्याचप्रमाणे आम्हालाही वाटतं की आमचा नेता मुख्यमंत्री व्हायला हवा. परंतु, आम्ही महायुती म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुकीला सामोरे गेलो. आम्ही एकनाथ शिंदे यांचा चेहरा घेऊन निवडणूक लढलो. राज्यातील जनतेने एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्याला पसंती दर्शवली आहे. त्यामुळे आम्हाला वाटतं की मुख्यमंत्रीपदावर एकनाथ शिंदे यांचा हक्क आहे. निकालानंतर तेच राज्याचे मुख्यमंत्री होतील अशी आम्हाला खात्री आहे. आम्हाला मनापासून वाटतं तेच मुख्यमंत्री व्हावेत आणि तेच होतील याची आम्हाला खात्री आहे”.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra assembly election 2024 results mahayuti cm face devendra fadnavis eknath shinde shivsena vs bjp asc