मुक्ताईनगर
जळगाव : मुक्ताईनगर मतदारसंघात शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) उमेदवार तथा आमदार चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादी (शरद पवार) काँग्रेसच्या उमेदवार रोहिणी खडसे यांच्यात दुसऱ्यांदा थेट लढत होत आहे. लेकीसाठी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी कंबर कसली असून, लेकीपेक्षा त्यांचीच प्रतिष्ठा या निवडणुकीत पणास लागली आहे.
मुक्ताईनगर तालुका हा २०१९ च्या निवडणुकीचा अपवाद वगळता पूर्वापार भाजपचा गड राहिला आहे. या निवडणुकीत ही जागा महायुतीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सोडण्यात आल्याने १९९० नंतर पहिल्यांदाच मुक्ताईनगरात भाजपचा उमेदवार नाही. २०१९ च्या निवडणुकीत रोहिणी खडसे यांना भाजपने विधानसभेची उमेदवारी दिली होती. वडील एकनाथ खडसेंचे भक्कम पाठबळ असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी त्यांचा पराभव केला. या वेळी रोहिणी खडसे या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवत आहेत. भाजपमध्ये प्रवेशाचा विषय आता निकाली निघाला असल्याचा दावा करत खडसे लेकीसाठी प्रचारात सक्रिय झाले आहेत. एकीकडे पुन्हा खडसे वडील-मुलगी आणि दुसरीकडे चंद्रकांत पाटील, असे चित्र मुक्ताईनगरात पाच वर्षांनंतर पुन्हा पाहण्यास मिळत आहे.
२०१९ च्या निवडणुकीत भाजप-सेनेची युती असतानाही आपण खडसे कुटुंबाच्या विरोधात अपक्ष निवडणूक लढू, असा निर्धार शिवसेनेचे तत्कालीन जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी केला होता. त्यानुसार त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली होती. भाजप-सेनेकडून त्यांची त्या वेळी मनधरणी करण्यात आली, पण ते निवडणूक लढण्यावर ठाम राहिले होते. त्या वेळी राष्ट्रवादीचा पाठिंबा आणि शिवसेना कार्यकर्त्यांची छुपी साथ मिळाल्याने चंद्रकांत पाटील यांनी रोहिणी खडसे यांचा पराभव केला होता.
हेही वाचा >>> लक्षवेधी लढत : रवी राणा यांच्याविरोधात सारे एकवटले
निर्णायक मुद्दे
● लोकसभेच्या निवडणुकीत भावजय रक्षा खडसे महायुतीच्या उमेदवार असताना रोहिणी खडसे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांचा प्रचार केला होता. प्रत्यक्षात मुक्ताईनगरात पाटील यांना अपेक्षित मताधिक्य मिळू शकले नव्हते. भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे यांना ४७ हजारचे मताधिक्य मिळाले. रोहिणी खडसे यांच्यासमोर मतांमधील ही तूट भरून काढण्याचे आणि आपला प्रभाव सिद्ध करण्याचे आव्हान आहे.
● विधानसभेत रोहिणी खडसे उमेदवार असल्या तरी रक्षा खडसे यांना महायुतीचे उमेदवार आमदार चंद्रकांत पाटील यांचा प्रचार करणे क्रमप्राप्त ठरले आहे. भावजय रक्षा खडसे यांच्या गैरहजेरीत रोहिणी खडसे यांना वडिलांची साथ मिळत आहे. मात्र भाजपचे जुने समर्थक बरोबर नसल्याने रोहिणी खडसे यांची भिस्त आता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवरच आहे.
लोकसभेतील राजकीय चित्र
● महायुती १,०२,०६१
● महाविकास आघाडी५५,१३२