ECI on NCPSP symbol: राष्ट्रवादीच्या तुतारी चिन्हाबाबत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; पिपाणी यावेळीही डोकेदुखी वाढविणार?

ECI on NCPSP symbol: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर निवडणूक चिन्हावरून वाद पेटला होता. लोकसभा निवडणूक तुतारी वाजविणारा माणूस आणि पिपाणी या चिन्हात घोळ झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाला फटका बसला होता.

ECI on NCPSP symbol
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या चिन्हाबाबत निवडणूक आयुक्त राजीव कुमार काय म्हणाले?

ECI on NCPSP symbol: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली आहे. महाराष्ट्रात २० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून २३ नोव्हेंबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. दिल्लीतील विज्ञान भवन येथे केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेतली. यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना निवडणुकीसंदर्भात प्रश्न विचारण्यात आले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पिपाणी आणि तुतारी या दोन चिन्हांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाला फटका बसला होता. यावेळी हा गोंधळ टाळण्यासाठी निवडणूक आयोगाने काय खबरदारी घेतली? असा प्रश्न विचारण्यात आला.

आयुक्त राजीव कुमार यावर म्हणाले, या प्रकरणात आमच्याकडे दोन विनंत्या आल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने विनंती केल्याप्रमाणे त्यांना पक्ष म्हणून मान्यता मिळाल्यानंतर चिन्ह दिले गेले पाहीजे. तसेच त्यांचे चिन्ह मतदान यंत्रावर छोटे दाखविले जात आहे आणि पिपाणी चिन्हाला हटवावे, अशीही विनंती त्यांनी केली होती. आम्ही त्यांची पहिली विनंती मान्य केली होती. त्यांना पक्ष म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे.

हे वाचा >> Maharashtra Assembly Election 2024 : राज्यात विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, ९ कोटी मतदार ठरवणार महाराष्ट्राचं भवितव्य!

पिपाणी चिन्ह हटविणार नाही

तसेच तुतारी वाजविणाऱ्या माणसाला मतदान यंत्रावर कशापद्धतीने दाखवले गेले पाहीजे, हे तुम्हीच आम्हाला सांगा, अशी सूचना केल्याचे राजीव कुमार यांनी सांगितले. त्याप्रमाणे राष्ट्रवादी कडून आम्हाला ज्यापद्धतीचे चिन्ह दिले गेले आहे, ते आम्ही मान्य केले आहे. यावेळी त्यांचे चिन्ह आकाराने मोठे दाखवले जाईल. तसेच पिपाणी चिन्ह आणि तुतारी वाजविणारा माणूस यांचा एकमेकांशी काहीच संबंध नाही, त्यामुळे पिपाणी चिन्ह हटवले जाणार नाही, असेही राजीव कुमार यांनी जाहीर केले.

हे ही वाचा >> Lok Sabha bypolls: वायनाड आणि नांदेडमध्ये पोटनिवडणूक जाहीर; प्रियांका गांधी लोकसभेत एंट्री घेणार, काँग्रेस नांदेडचा गड राखणार?

निवडणूक प्रक्रियेचं संपूर्ण वेळापत्रक

१) राजपत्र अधिसूचना जारी करण्याची तारीख (Date of Issue of Gazette Notification) – २२ ऑक्टोबर २०२४

२) उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख – २९ ऑक्टोबर २०२४

३)उमेदवारी अर्ज पडताळणी – ३० ऑक्टोबर २०२४

४) उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख – ४ नोव्हेंबर २०२४

५) मतदानाची तारीख – २० नोव्हेंबर २०२४

६) मतमोजणीची तारीख – २३ नोव्हेंबर २०२४

७) निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची तारीख – २५ नोव्हेंबर २०२४

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Maharashtra assembly election 2024 schedule eci announcement on ncp sharad pawar group trumpet symbol kvg

First published on: 15-10-2024 at 17:09 IST

संबंधित बातम्या