Maharashtra Assembly Election 2024 Result: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठीचं मतदान अवघ्या १५ दिवसांवर आलं आहे. महाराष्ट्रात प्रमुख लढत ही महाविकास आघाडी व महायुती या दोन आघाड्यांमध्ये पाहायला मिळणार आहे. एकीकडे सत्ताधारी महायुतीकडून शेवटच्या काळात वेगवेगळ्या योजना जाहीर केल्यामुळे त्याचा फायदा त्यांना मिळण्याची शक्यता असताना दुसरीकडे विरोधकांसाठी लोकसभा निवडणूक निकाल सकारात्मक ठरण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील निवडणूक चुरशीची ठरणार असल्याचं दिसत आहे. त्यातच आता अर्जमाघारीनंतर महायुती व मविआ या दोन्ही आघाड्यांमधलं नेमकं जागावाटप समोर आलं आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीपेक्षा यंदा महाराष्ट्रातलं राजकीय चित्र वेगळं असून शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन मोठ्या पक्षांमध्ये पक्षफुटी झाल्यामुळे चार पक्ष अस्तित्वात आले आहेत. त्यातले दोन पक्ष सत्ताधारी तर दोन पक्ष विरोधी गटात असल्यामुळे या निवडणुकीत व्यापक अर्थाने शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष सत्ताधारी व विरोधी अशा दोन्ही बाजूला पाहायला मिळत आहेत.
पक्षफुटीमुळे सत्तासमीकरणं बदलली असून त्याअनुषंगाने प्रत्येक पक्षातील इच्छुकांची संख्यादेखील वाढली आहे. त्याचाच परिणाम म्हणून यंदा महायुती व महाविकास आघाडीतील जवळपास सर्वच पक्षांमध्ये बंडखोरी झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळेच यंदा सर्व पक्षांसमोर जागावाटपाचा तिढा सोडवण्याचं मोठं आव्हान होतं. अगदी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस अर्थात ४ नोव्हेंबर उजाडेपर्यंत जागावाटपाचा नेमका आकडा समोर आला नव्हता. आता मात्र उमेदवारांनी अर्ज माघारी घेतल्यानंतर दोन्ही आघाड्यांमधील जागावाटपाचा नेमका आकडा समोर आला आहे.
बंडखोरीमुळे बहुरंगी लढती; महायुती, मविआची डोकेदुखी कायम
महाविकास आघाडीचं काय ठरलंय?
एका जागेसाठी एकाहून जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांनी ४ नोव्हेंबर रोजी अर्ज मागे घेतले. त्यानंतर महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा आकडा समोर आला आहे. त्यानुसार, काँग्रेसचे उमेदवार १०१ विधानसभा मतदारसंघांतून निवडणूक लढवणार आहेत. त्यापाठोपाठ शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाला ९२ जागा देण्यात आल्या आहेत. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या उमेदवारांनी ८७ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. याशिवाय शेतकरी कामगार पक्षानं ३ ठिकाणी उमेदवार उभे केले असून माकप व समाजवादी पक्षाला प्रत्येकी २ जागा देण्यात आल्या आहेत.
महायुतीचं काय ठरलंय?
उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आल्यानंतर समोर आलेल्या आकडेवारीनुसार भारतीय जनता पक्षाचे उमेदवार १४८ मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवत आहेत. शिवसेना (एकनाथ शिंदे) गटाचे उमेदवार ८५ ठिकाणी उभे आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून ५४ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. त्याशिवाय आष्टी, मोर्शी, शिवाजीनगर, मानखुद्र, पुरंदरमध्ये मैत्रीपूर्ण लढती होतील असं चित्र दिसत आहे. दरम्यान, शिवसेना (एकनाथ शिंदे) व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्याकडचे मिळून १७ उमेदवार हे भारतीय जनता पक्षातून त्या त्या पक्षांत गेल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे भाजपाची एकूण उमेदवार संख्या अधिक इतर पक्षांमधून उभे राहिलेले उमेदवार अशी भाजपाची एकूण उमेदवारसंख्या असल्याचं मानलं जात आहे.
© IE Online Media Services (P) Ltd