Maharashtra Assembly Election 2024 Shivsena vs Shivsena : महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा सुटल्याचं मविआच्या प्रमुख नेत्यांनी बुधवारी (२३ ऑक्टोबर) पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलं. त्याचदरम्यान, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने विधानसभा निवडणुकीतील त्यांच्या पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. पहिल्या यादीद्वारे त्यांनी ६५ उमेदवार जाहीर केले आहेत. अनेक नव्या आणि जुन्या चेहऱ्यांना यामिनित्ताने त्यांनी संधी दिली आहे. तसेच काँग्रेसच्या काही मतदारसंघांमध्ये उद्धव ठाकरेंच्या पक्षाने उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दुसऱ्या बाजूला, उद्धव ठाकरेंच्या एक दिवस आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या शिवसेनेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. एकनाथ शिंदे यांनी ४५ जागांवरील त्यांचे उमेदवार जाहीर केले होते.
जून २०२२ मध्ये शिवसेना पक्ष फुटून दोन नवे पक्ष तयार झाले. या दोन पक्षांचा राज्याच्या राजकारणात मोठा संघर्ष चालू आहे. अशातच कोणकोणत्या मतदासंघांमध्ये शिवसेना (ठाकरे) विरुद्ध शिवसेना (शिंदे) असा सामना रंगणार? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. आतापर्यंत दोन्ही पक्षांनी जाहीर केलेल्या उमेदवारांच्या याद्यांनुसार सध्या तरी राज्यातील २६ मतदारसंघांमध्ये हे दोन पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. यामध्ये खुद्द मुख्यमंत्र्यांचा कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघ, जोगेश्वरी पूर्व, माहिम, महाड, राधानगरीसारख्या मतदारसंघांचा समावेश आहे.
हे ही वाचा >> Uddhav Thackeray First List : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर; ६५ उमेदवारांची नावे एका क्लिकवर!
दोन्ही पक्षांच्या उमेदवारांची यादी
क्र. | मतदारसंघ | शिवसेना (ठाकरे) उमेदवार | शिवसेना (शिंदे) उमेदवार |
१. | कोपरी-पाचपाखाडी | केदार दिघे | एकनाथ शिंदे |
२. | ओवळा माजिवडा | नरेश मणेरा | प्रताप सरनाईक |
३. | मागाठणे | अनंत (बाळा) नर | मनिषा वायकर |
४. | कुर्ला | प्रविणा मोरजकर | मंगेश कुडाळकर |
५. | माहिम | महेश सावंत | सदा सरवणकर |
६. | महाड | स्नेहल जगताप | भरत गोगावले |
७ | राधानगरी | के. पी. पाटील | प्रकाश आबिटकर |
८. | राजापूर | राजन साळवी | किरण सामंत |
९ | सावंतवाडी | राजन तेली | दीपक केसरकर |
१०. | कुडाळ | वैभव नाईक | निलेश राणे |
११. | रत्नागिरी | सुरेंद्रनाथ (बाळ) माने | उदय सामंत |
१२. | दापोली | संजय कदम | योगेश कदम |
१३. | पाटण | हर्षद कदम | शंभूराज देसाई |
१४. | सांगोला | दीपक आबा साळुंखे | शहाजी बापू पाटील |
१५. | परांडा | राहुल ज्ञानेश्वर पाटील | तानाजी सावंत |
१६. | कर्जत | नितीन सावंत | महेंद्र थोरवे |
१७. | मलेगाव बाह्य | अद्वय हिरे | दादा भुसे |
१८. | नांदगाव | गणेश धात्रक | सुहास कांदे |
१९. | वैजापूर | दिनेश परदेशी | रणेश बोरणारे |
२०. | संभाजीनगर पश्चिम | राजू शिंदे | संजय शिरसाठ |
२१. | संभाजीनगर मध्ये | किशनचंद तनवाणी | प्रदीप जयस्वाल |
२२. | सिल्लोड | सुरेश बनकर | अब्दुल सत्तार |
२३. | कळमनुरी | डॉ. संतोष टाळफे | संतोष बांगर |
२४. | रामटेक | विशाल बरबटे | आशिष जयस्वाल |
२५. | मेहकर | सिद्धार्थ खरात | संजय पायमुलकर |
२६. | पाचोरा | वैशाली सूर्यवंशी | किशोर धनसिंग पाटील |
हे ही वाचा >> जागावाटपाचा घोळ मिटेना! महायुती, महाविकास आघाडीत नुसत्याच चर्चेच्या फेऱ्या; अंतिम निर्णयाकडे लक्ष
निलेश राणे धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवणार!
दरम्यान, महायुतीच्या जागावाटपात कुडाळची जागा शिवसेनेच्या शिंदे गटाला मिळाल्यानंतर भाजपा नेते निलेश राणे यांनी शिवसेनेत (शिंदे) प्रवेश केला आहे. तब्बल दोन दशकांनंतर राणे कुटुंबातील सदस्य शिवसेनेत परतला असून निलेश राणे हे धनुष्यबाण या चिन्हावर आगामी विधानसभा निवडणूक लढवतील.