List of Women Candidates in Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्राच्या ६७ वर्षांच्या इतिहासात आतापर्यंत एकूण ४६१ महिला आमदार झाल्या आहेत. तर यंदा २०२४ च्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत २५० हून अधिक महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. एकूण ४ हजार १३६ उमेदवार निवडणूक लढवणार असून त्यापैकी फक्त सहा ते सात टक्के महिला उमेदवार निवडणुकीच्या रिगंणात आहेत.
पुरुषांच्या तुलनेत महिला मतदार किती?
२०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात १००० पुरुषांमागे ९२९ महिला मतदार आहेत. तर, २०१९ मध्ये हा रेशो ९२५ पर्यंत घसरला. तसंच, २०२४ मध्ये १००० पुरुष मतदारांमागे ९३६ महिला मतदार आहेत. सध्याच्या घडीला महाराष्ट्रात ४ कोटी ६९ लाख ९६ हजार २७९ महिला मतदार आहेत. तर, ५ कोटी २२ लाख ७३९ पुरुष मतदार आहेत.
एकूण लाडकी बहीण योजनेसारख्या असंख्य योजना राज्यातील सरकारने आणलेल्या असताना, महिला केंद्रीत निवडणुका होत असल्या तरीही राज्यातून महिला उमेदवारांना संधी देण्यास पक्षांकडून आजही हात आखडता घेतला जात आहे. तसंच, अपक्ष महिला उमेदवारही निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास इच्छूक नसल्याचं समोर येत आहे.
महायुती सरकारमध्ये महिलांना मंत्रिमंडळात फारसे प्रतिनिधित्व दिले गेले नाही. शिंदे यांच्या सरकारमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे या एकमेव महिला मंत्री होत्या. त्यामुळे भारतीय निवडणूक आयोगाकडून उपलब्ध आकडेवारीनुसार, सध्याच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत एकूण ४ हजार १३६ उमेदवार उभे आहेत. यापैकी जवळपास २५० महिला उमेदवार असून महायुती आणि महाविकास आघाडीने प्रत्येकी ३० महिला उमेदवारांना संधी दिली आहे. भाजपाने १८, शिवसेना (एकनाथ शिंदे) आठ आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने चार महिलांना तिकिटे दिली आहेत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने ११ महिला उमेदवारांना, तर शिवसेनेने (उद्धव ठाकरे) १० आणि काँग्रेसने ९ महिला उमेदवारांना तिकिटे दिली आहेत.
एकूण उमेदवार – ४ हजार १३६
एकूण महिला उमेदवार – २५०+
महायुती आणि महाविकास आघाडीचे महिला उमेदवार – प्रत्येकी ३०
महायुती – ३० महिला उमेदवार
- भाजपा -१ ८
- शिवसेना (एकनाथ शिंदे) – ८
- राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) – ४
महाविकास आघाडी – ३० महिला उमेदवार
- राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) – ११
- शिवसेना (उद्धव ठाकरे) – १०
- काँग्रेस -९
महत्त्वाच्या महिला उमेदवार
महिला | पक्ष | मतदारसंघ |
यामिनी जाधव | शिवसेना (एकनाथ शिंदे) | भायखळा |
मनीषा वायकर | शिवसेना (एकनाथ शिंदे) | जोगेश्वरी पूर्व |
सुवर्णा कारंजे | शिवसेना (एकनाथ शिंदे) | विक्रोळी |
शायना एनसी | शिवसेना (एकनाथ शिंदे) | मुंबादेवी |
मनीषा चौधरी | भाजपा | बोरिवली |
विद्या ठाकूर | भाजपा | गोरेगाव |
भारती लव्हेकर | भाजपा | वर्सोवा |
ऋतुजा लटके | शिवसेना (उद्धव ठाकरे) | अंधेरी पूर्व |
प्रवीणा मोरजकर | शिवसेना (उद्धव ठाकरे) | कुर्ला |
२०१९ मध्ये काय होती स्थिती?
२०१९ मध्ये भाजपाने १२ महिला उमेदवार उभे केले होते. तर, शिवसेनेने ९, काँग्रेसने १५ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ९ महिला उमेदवारांना संधी दिली होती. म्हणजेच मुख्य प्रवाहातील पक्षांनी ४५ महिला उमेदवार उभे केले होते. त्यापैकी फक्त २४ महिला उमेदवार जिंकल्या. २८८ सदस्यांच्या विधानसभेत फक्त २४ महिला आमदार म्हणजेच फक्त ८ टक्के महिला आमदार होत्या. सप्टेंबर २०२३ मध्ये राज्यात ३३ टक्के महिला आरक्षणाचा ठराव पास करण्यात आला. पुढची जनगणना झाल्यानंतर हा ३३ टक्के आरक्षणाचे बिल अंमलात येणार आहे. तेव्हा सभागृहात २८८ पैकी ९६ महिला आमदार असणं अपेक्षित असेल.