Shrinivas Pawar : बारामती विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने अजित पवारांविरोधात युगेंद्र पवार यांनी उमेदवारी दिली आहे. त्यानंतर आज दोघांनीही उमदेवारी अर्ज दाखल केले. त्यामुळे बारामतीत पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार अशी लढत होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. अशात आज उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी झालेल्या सभेत बोलताना अजित पवार भावूक झाल्याचं बघायला मिळालं. माझी आई सांगत होती की माझ्या अजितदादा विरोधात अर्ज भरू नका, पण तरीही घरातून उमेदवारी अर्ज दाखल झाला, असं ते म्हणाले. अजित पवारांच्या या विधानावर आता युगेंद्र पवार यांचे वडील श्रीनिवास पवार यांनी प्रतिक्रिया दिली.

काय म्हणाले श्रीनिवास पवार?

श्रीनिवास पवार यांनी आज एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांना अजित पवारांच्या विधानाबाबत विचारण्यात आलं. यासंदर्भात बोलताना, मी अजित पवारांचे भाषण ऐकलेलं नाही. ते असं बोलले, हे मला माध्यमांद्वारे समजलं. मात्र, आमच्या आईने असं काहीही म्हटलेलं नाही. अजित पवारांबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. आईला जसे अजित पवार आहेत, तसेच युगेंद्र पवार सुद्धा नातू आहे. त्यामुळे आईला दोघेही सारखे आहेत. ती कधीही राजकारणावर बोलत नाही. त्यामुळे आईने असं काही म्हटलं असेल, असं वाटत नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

हेही वाचा – Ajit Pawar : “मी बारामतीतून निवडणूक लढणार नव्हतो, पण…”, अजित पवार स्पष्टच बोलले; म्हणाले, “मी नौटंकी…”

अजित पवार आता म्हणतात, की मी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार यांना उमदेवारी देऊन चूक केली. मात्र, तेव्हा मी त्यांना पोटतिडकीने सांगत होते, की असं करू नको, पण त्यावेळी ‘माझं ठरलं आहे’, असं अजित पवार म्हणाले होते. ज्यावेळी मी त्यांना हे सांगत होतो. तेव्हा आमची आईसुद्धा तिथेच होती. खरं तर मला राजकारणात रस नाही. मी मुंबईत व्यवसाय करतो. मात्र, ज्यावेळी शरद पवारांना एकटं पाडण्यात आलं, त्यावेळी मला वाटलं की आपण शरद पवार यांना मदत केली पाहिजे, असेही ते म्हणाले.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्यावेळी अजित पवारांनी रोहित पवार आणि सुप्रिया सुळे यांची नक्कल केली होती. त्याबाबत विचारलं असता, अजित पवार लोकसभेच्या वेळी नकला करत होते. त्यांनी रोहित पवारांची नक्कल केली. सुप्रिया सुळेंचीही नक्कल केली होती. तेव्हा ते चुकीचं वागत होते. त्यानंतर आज तिन-चार महिने झाले असतील, आता अजित पवारांवर वेळी आली आहे. ते अनेकांना फोन करत भेटायला बोलत आहेत. राजकारण शब्द जपून वापरले पाहिजे. मात्र, अजित पवार शब्द वापरताना चुकतात, असं त्यांनी सांगितलं.

हेही वाचा – Shrinivas Pawar : “माझी आई सांगत होती दादाविरोधात उमेदवार…”, अजित पवारांचा दावा थोरल्या भावाने फेटाळला; युगेंद्र पवारांबद्दल मोठं वक्तव्य

अजित पवार नेमकं काय म्हणाले होते?

आई आता सगळ्यांना सांगत होती, की माझ्या अजितदादाच्या विरोधात अर्ज भरू नका. पण तरीही पण तरीही घरातून उमेदवारी अर्ज दाखल झाला. हे जे काही चाललं आहे, ते बरोबर नाही. माझ्याविरोधात अर्ज भरताना मोठ्या व्यक्तींनी याबाबत सांगायला पाहिजे होतं. पण युगेंद्र पवारांना उमेदवारी अर्ज कोणी भरायला सांगितला असं विचारलं तर समोरून उत्तर आलं पवार साहेबांनी सांगितलं. म्हणजे आता शरद पवार यांनी तात्यासाहेबांचं घर फोडलं का? असं अजित पवार म्हणाले होते.