Maharashtra Assembly Election: निवडणूक आयोगाने महाराष्ट्र आणि झारखंडमधील विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. २० नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात महाराष्ट्रात मतदान पार पडेल तर २३ नोव्हेंबर रोजी निकाल लागेल. २६ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभेची मुदत संपत असल्यामुळे त्याआधीच नवीन विधानसभा गठीत करण्याचा प्रयत्न आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर आता सर्वच पक्षांचे आणि प्रबळ उमेदवारांचे लक्ष जागावाटपाकडे लागले आहे. आतापर्यंत पडद्याआड होणारी चर्चा सार्वजनिक कधी होते? याचीही उत्सुकता राजकीय पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आहे. हरियाणामध्ये भाजपाने जोरदार विजय मिळविल्यानंतर राज्यातील जागावाटपात भाजपाचा वरचष्मा राहील, असे बोलले जात आहे. त्यामुळे भाजपा मोठ्या भावाच्या भूमिकेत राहील, असे समजते.
भाजपाकडे सध्या १०५ आमदार आहेत. महायुतीच्या जागावाटपात त्यांच्याकडे १५५ ते १६० जागा येण्याची शक्यता आहे. तर शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्याकडे असलेल्या सद्यस्थितीतील आमदारांची संख्या पाहता शिवसेना ८५ आणि राष्ट्रवादी ४५-५० जागा लढण्याची शक्यता आहे, अशी बातमी हिंदुस्तान टाइम्सने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादीची कामगिरी फारशी चांगली झाली नव्हती. राष्ट्रवादी काँग्रेसने चार जागा लढल्या त्यापैकी त्यांना फक्त एका ठिकाणी विजय मिळविता आला. तर शिवसेनेने १५ जागा लढल्या, त्यांना केवळ सात जागांवर विजय मिळविता आला. तसेच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाचे काही विद्यमान नेते आणि आमदार शरद पवार गटाच्या वाटेवर असल्यामुळेही अजित पवारांच्या पक्षाला जागावाटपात कमी जागा मिळणार असल्याचे बोलले जाते.
२०१९ च्या निवडणुकीत पक्षीय बलाबल काय होते?
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने १६४ ठिकाणी निवडणूक लढविली होती. त्यापैकी १०५ जागांवर त्यांचा विजय झाला. यावेळी १६० च्या आसपास जागा लढविण्याचा भाजपाचा विचार आहे.
२०१९ च्या निवडणुकीनंतरचं पक्षीय बलाबल
भारतीय जनता पार्टी – १०५
शिवसेना – ५६
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – ५४
काँग्रेस – ४४
एआयएमआयएम – २
मनसे – १
पक्षफुटीनंतरचं पक्षीय बलाबल
महायुती
भाजपा – १०५
शिवसेना (शिंदे) – ४०
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार) – ४१
महाविकास आघाडी
काँग्रेस – ४४
शिवसेना (ठाकरे) – १४
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार) – १४