Maharashtra Vidhan Sabha Election Results Live (महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल):
विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडल्यानंतर मुंबईकरांना आता निकालाची उत्सुकता लागली आहे. मुंबई शहर आणि उपनगरातील एकूण ३६ मतदान केंद्रांची मतमोजणी ३६ वेगवेगळ्या ठिकाणी केली जाईल.
प्रत्येक मतमोजणी केंद्रावर पुरेसे मनुष्यबळ तैनात केले जात असून, केंद्राबाहेर राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना निकाल जाणून घेता यावा म्हणून विशेष व्यवस्था केली जात आहे. २३ नोव्हेंबरला सकाळी ८ वाजता मतमोजणीची प्रक्रिया सुरू होईल.
सर्वप्रथम टपाली मतदानाची मतमोजणी होईल आणि त्यानंतर ईव्हीएममधील मतदानाची गणना केली जाईल.
सध्या राज्यातील 4,136 उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद झालं आहे. आता सर्वांचे लक्ष 23 नोव्हेंबरला होणाऱ्या निकालाकडे लागले आहे. राज्यात कोणाचं सरकार स्थापन होणार? याबद्दल सर्वसामान्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी २८८ मतदारसंघात मतदान पार पडले आहे. त्यानंतर राजकीय पक्षांसह सर्वच मतदारांना एग्झिट पोल्सचा कल कुणाच्या बाजूने आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता लागते. निकाल २३ नोव्हेंबर रोजी लागणार असल्याने मधल्या दोन दिवसांत एग्झिट पोल्सची बरीच चर्चा रंगण्याची शक्यता आहे. काही महिन्यांपूर्वीच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीनंतर एग्झिट पोल्सचा अंदाज सपशेल अपयशी ठरला होता. त्यामुळे महाराष्ट्राचा एग्झिट पोल्स किती खरा ठरणार? याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.
Maharashtra Vidhan Sabha Results 2024: चाणक्य स्ट्रॅटेजीसच्या सर्व्हेनुसार, महायुतीला १५२ ते १६० जागा मिळण्याची शक्यता आहे. बहुमतासाठी १४५ जागा लागणार आहेत आणि महायुती त्या आकड्याच्या जवळ पोहोचू शकेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. भाजपला सलग तिसऱ्यांदा राज्यात विधानसभेत सर्वात मोठा पक्ष होण्याची शक्यता आहे. तसेच, चाणक्य स्ट्रॅटेजीसच्या सर्व्हेनुसार भाजपला ९० जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महायुतीत भाजपनं सर्वाधिक १४८, शिवसेनेनं ८१ आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं ५९ जागा लढवल्या आहेत. तर मविआमध्ये काँग्रेसनं १०१, शिवसेना (उबाठा) ने ९५, आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं ८६ जागा जिंकल्या. राज्यात बसपनं २३७, तर एमआयएमनं १७ उमेदवार लढवले होते.
महाराष्ट्र विधानसभेमध्ये एकूण २८८ मतदारसंघ आहेत. राज्याच्या राजकारणात महाविकास आघाडी (MVA) आणि महायुती (Mahayuti) अशा दोन प्रमुख आघाड्या आहेत. महाविकास आघाडीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार) (NCP-SCP) आणि शिवसेना (उद्धव गट) यांचा समावेश आहे, तर महायुतीमध्ये भारतीय जनता पक्ष (BJP), शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार) आणि इतर घटक पक्षांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, काही प्रादेशिक पक्ष देखील निवडणुकीत सहभागी होत आहेत जसे की महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS), समाजवादी पक्ष (SP), आम आदमी पक्ष (AAP), ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) आणि इतर काही छोटे पक्ष.
मतदारसंघनिहाय निवडणूक निकाल:
महाराष्ट्रातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघांची जिल्हानिहाय यादी, त्यांचे ऐतिहासिक निकाल, तसेच सध्याचे उमेदवारांची नावे, पक्षांची माहिती आणि त्यांची संपत्ती याबाबत
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका सुरू झाल्या आहेत. निवडणूक आयोगाने राज्याच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार, महाराष्ट्रात निवडणुकीसाठी २२ ऑक्टोबर रोजी अधिसूचना जारी करण्यात आली. २९ ऑक्टोबर ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती. ३० ऑक्टोबर रोजी अर्जांची छाननी झाली, तर ४ नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येणार होते. आज २० नोव्हेंबर रोजी मतदान आणि २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे, त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाईल. राज्यात बहुमतासाठी १४५ जागांची आवश्यकता आहे, त्यामुळे हा आकडा महायुती गाठणार की महाविकास आघाडी याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
राज्यात ९ कोटी ६३ लाख ६९ हजार ४१० मतदार आहेत. त्याशिवाय १ लाख १६ हजार ३५५ सर्व्हिस वोटर आहेत. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, राज्यात ४.९७ कोटी पुरुष मतदार आहेत, तर ४.६६ कोटी महिला मतदार आहेत. यंदा पहिल्यांदाच २०.९३ लाख नवीन मतदार मतदान करतील, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.