वंचित बहुजनआघाडी, मनसे, हितेंद्र ठाकूर, बच्चू कडू असे विविध पक्ष किंवा नेते सत्ता स्थापण्यात ‘किंग मेकर’च्या भूमिका राहण्याच्या प्रयत्नात होते. पण या साऱ्यांचाच हिरमोड झाला आहे. कारण या साऱ्यांना भोपळाही फोडता आला नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विधानसभा निवडणुकीत आजपर्यंत डावे, समाजवादी, रिपाइं गट नेमाने तिसरा पर्याय उभा करत. २००९ च्या निवडणुकीत ‘रिडालोस’ नावाची तिसरी आघाडी लक्षवेधी ठरली होती. या वेळी डावे- समाजवादी पक्ष महाविकास आघाडीत आहेत. ती संधी साधत ‘परिवर्तन महाशक्ती’ नावाची तिसऱ्या आघाडी स्थापन झाली. पण, या आघाडीला एकही जागा मिळाली नाही. तथाकथीत तिसऱ्या आघाडीला राज्यातील जनतेने पूर्णपणे नाकारल्याचे दिसते.

समाजवादी, माकप, भाकप, शेकाप आणि सत्यशोधक कम्युनिस्ट हे तिसऱ्या आघाडीचे सदस्य पक्ष यावेळी महाविकास आघाडीचा भाग आहेत. या पक्षांना ‘मविआ’ने सहा जागा दिल्या होत्या. प्रत्यक्षात यांनी ३३ मतदारसंघांत निवडणूक लढवली. आघाडीच्या जागा वाटपातील बेबनावातून बंडखोरी निर्माण झाली. आघाडीचे बडे पक्ष हे राज्यातील डावे व पुरोगामी राजकारण संपवत असल्याचा या पक्षांनी आरोप केला होता. अखेर, समाजवादी पक्षाला २, शेकाप १ आणि माकप १ अशा चार जागा कशाबशा जिंकण्यात या पक्षांना यश आले आहे.

हेही वाचा >>>यंदा विरोधी पक्षनेतेपद रिक्त? संख्याबळ नसतानाही पूर्वी जनता पक्ष, शेकापला संधी

राजू शेट्टी, संभाजी राजे आणि बच्चू कडू यांनी ‘परिवर्तन महाशक्ती’ आघाडी स्थापन केली होती. आपण तिसरी आघाडी असल्याचे त्यांचे म्हणणे होते. या आघाडीने ‘शेतकरी- दिव्यांग-मराठा’ असे समीकरण बनवले होते. त्यामध्ये रिपाइं (खोब्रागडे), जय विदर्भ पार्टी, महाराष्ट्र राज्य समिती, भारतीय जवान किसान पार्टी असे पक्ष व संघटना होत्या. या आघाडीने १०६ जागा लढवल्या. मात्र एकही जागा जिंकता आली नाही. उलटपक्षी बच्चू कडू आणि राजकुमार पटेल हे आघाडीचे दोन्ही विद्यामान आमदार पराभूत झाले.

२०१९ च्या लोकसभा आणि विधानसभेला मोठी पाडापाडी केलेल्या अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या कामगिरीकडे यावेळी सर्वांचे लक्ष होते. वंचितने २०० उमेदवार दिले होते. बौद्ध- मुस्लीम -ओबीसी असे वंचितचे समीकरण होते. अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या उप वर्गीकरणाचा मुद्दा यावेळी चर्चेत होता. वंचितने यावेळी ९४ उमेदवार बौद्ध दिले होते. हिंदु दलितांशिवाय बौद्धांनीसुद्धा या निवडणुकीत वंचितकडे पाठ फिरवल्याचे दिसले. लोकसभेला ३.६ टक्के मते घेतलेल्या वंचितचे उमेदवार या निवडणुकीत चौथ्या, पाचव्या क्रमांकावर फेकले गेले आहेत.

अभ्यासू कार्यकर्त्यांचे संघटन असा लौकिक कमावलेल्या बहुजन समाज पक्षाने या वेळी २३७ उमेदवार दिले होते. बसपचा एकही उमेदवार जिंकला नाही. धनगर आरक्षणाची मागणी लावून धरणारे नेते महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाने ९३ उमेदवार रिंगणात उतरवले होते. पैकी गंगाखेडमधून रत्नाकर गुट्टे विजयी झाले आहेत. एमआयएमने १७ उमेदवार दिले होते. ‘मालेगाव मध्य’ ही एक जागा या पक्षाला अतिनिसटत्या मताधिक्याने मिळण्याची शक्यता आहे. वसई-नालासोपारा परिसरातील भाई हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीने सहा जागांवर उमेदवार दिले होते. तीन विद्यामान आमदार असलेल्या या आघाडीला या वेळी एकही जागा राखता आली नाही.

हेही वाचा >>>ठाणे, कोकण: कोकण ‘किनाऱ्या’वर लाट

सुरेश माने आणि प्रकाश शेंडगे यांनी आरक्षणवादी आघाडी उभी केली होती. शंभरच्या आसपास या आघाडीने जागा लढवल्या होत्या. दलित-ओबीसीच्या या आघाडीला मतदारांनी पूर्णपणे नाकारले आहे. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने १२५ जागा लढवल्या. महायुती विजयी होणार आणि मनसे सत्तेत सहभागी होणार असा दावा राज ठाकरे यांचा होता. राज यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांना माहीमहून पदार्पणाच्या निवडणुकीत पराभव स्वीकाराला लागला, अमित यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. मनसेचे एकमेव विद्यामान आमदार राजू पाटील यांचाही पराभव झाला. एकंदरीत, ‘सत्तासहभागा’च्या बाता करणाऱ्या पण प्रत्यक्षात मते कापण्याचेच काम करणाऱ्या अनेक पक्षांना यंदा मतदारांनी त्यांची जागा दाखवून दिली.

ashok.adsul@expressindia.com