Gopal Shetty : महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे, २० नोव्हेंबरला निवडणूक पार पडणार आहे तर २३ नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने याद्या जाहीर झाल्या आहेत. तसंच त्यानिमित्ताने नाराजी आणि बंडखोरीचे सूरही समोर येेत आहेत. भाजपाला मुंबईत मोठा धक्का बसला आहे. कारण गोपाळ शेट्टी ( Gopal Shetty ) यांनी बोरीवली काय धर्मशाळा नाही असं म्हणत अपक्ष अर्ज दाखल करणार असल्याचं जाहीर केलं. त्यानुसार त्यांनी अर्ज दाखल केला आहे.
काय म्हणाले गोपाळ शेट्टी?
“मी नाराज बोरीवलीकरांच्या सन्मानासाठी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे. मी माझ्या पक्षाशी एकनिष्ठ आहे. बोरीवली काही धर्मशाळा नाही कुणीही यावं आणि निवडणूक लढवावी.” असं गोपाळ शेट्टी म्हणाले आहेत. भाजपाला जागावाटपात १४० हून अधिक जागा मिळाल्या आहेत. मात्र भाजपात बंडखोरीचं टेन्शन आहे. सर्वात मोठी बंडखोरी ही गोपाळ शेट्टींची ( Gopal Shetty ) मानली जाते आहे.
हे पण वाचा- BJP 3rd Candidate List: भाजपाची २५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; ३ विद्यमान आमदारांचं तिकीट कापलं!
नेमकं काय घडलं?
भाजपाने बोरीवली मतदारसंघात संजय उपाध्याय यांची उमेदवारी घोषित केली. त्यानंतर गोपाळ शेट्टी ( Gopal Shetty ) नाराज झाले आहेत. वारंवार छळ करणं हे काही योग्य नाही असं म्हणत गोपाळ शेट्टींनी जाहीर नाराजी व्यक्त केली. मी भाजपाचे विचार सोडलेले नाहीत, यापुढेही सोडणार नाही. अन्य पक्षात जाऊन काम करणार नाही. पण बोरीवली ही काही धर्मशाळा नाही. भारतीय संविधानात एक नगरसेवक, एक विधानसभा आणि एक लोकसभेचा मतदारसंघ असतो. कायद्यात कुणीही कुठून लढू शकत नाही असं लिहिलेलं नाही. मात्र स्थानिक लोकांसाठी स्थानिक मुद्द्यांवर जेव्हा निवडणूक लढवली जाते तेव्हा तिथे विचार करावा लागतो. असं गोपाळ शेट्टी ( Gopal Shetty ) म्हणाले
पक्षाने आधी विनोद तावडेंना आणलं मग सुनील राणेंना…
पक्षाने आधी विनोद तावडेंना आणलं गेलं, त्यानंतर सुनील राणेंना. मी खासदार होतो. मला बदलून पियूष गोयल यांना लोकसभेची उमेदवारी दिली गेली. तरीही मी गोयल यांच्या पाठिशी उभा राहिलो. आता विधानसभेला पुन्हा तसंच झालं. संजय उपाध्याय हे चांगले कार्यकर्ते आहेत त्यांनी पक्षासाठी चांगलं काम केलं आहे. मात्र बोरीवली मतदारसंघात असे वारंवार खेळ करणं योग्य नाही अशी भूमिका गोपाळ शेट्टींनी ( Gopal Shetty ) घेतली आहे.
लोकसभा निवडणुकीत गोपाळ शेट्टींचं ( Gopal Shetty ) तिकिट कापण्यात आलं होतं. त्यानंतर आता विधानसभेला त्यांना संधी मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र तसं घडलं नाही. त्यामुळे गोपाळ शेट्टी नाराज झाले आहेत आणि त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.