Maharashtra Vidhan Sabha Election 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आजपासून (२४ ऑक्टोबर) अनेक पक्ष आपापल्या उमेदवारांचे अर्ज भरत आहेत. त्यामुळे राज्यात खऱ्या अर्थाने आता निवडणुकीचे रंग भरत चालले आहेत. मुंबईत यंदा आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. ठाकरे परिवारातील हे दोन सदस्य विधानसभेत पोहोचणार का? याची चर्चा रंगली आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आदित्य ठाकरेंच्या विरोधात वरळी विधानसभेत उमेदवार दिला नव्हता. यंदा मनसेने वरळीतून पक्षाचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांना मैदानात उतरवले आहे. तर राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित राज ठाकरे हे स्वतः माहिम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवित आहेत. याच मतदारसंघात शिवसेना भवन असून शिवसेनेचा हा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे शिवसेना (उद्धव ठाकरे) अमित ठाकरेंच्या विरोधात उमेदवार देणार का? अशी चर्चा असतानाच आत संजय राऊत यांनी सूचक विधान केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संजय राऊत यांनी आज माध्यमांना संबोधित करत असताना महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबतची भूमिका मांडली. २०२९ साली मनसेने वरळीत उमेदवार दिला नाही, पण या उपकाराची परतफेड करा, असे आम्ही म्हणणार नाही, अशी भूमिका मनसेने घेतली आहे. या भूमिकेबद्दल संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, यंदाची निवडणूक एखाद्या महायुद्धाप्रमाणे लढली जाईल. फक्त महाराष्ट्रातील जनता यावेळी एवढेच पाहिल की, महाराष्ट्र द्रोह्यांना कोण प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना महाराष्ट्रात पाय ठेवू देऊ नका, असे जे कालपर्यंत बोलत होते. ते अप्रत्यक्षपणे मोदी-शाहांना महाराष्ट्र गिळंकृत करत यावा, म्हणून मदत तर करत नाहीत ना? हे या राज्याची जनता काळजीपूर्वक पाहणार आहे.

शिवेसना हा असा पक्ष आहे. ज्याने कधीही महाराष्ट्र द्रोह्यांशी हातमिळवणी केली नाही. महाराष्ट्रासाठी छातीवर वार झेलून शिवसेना लढत राहिली. यापुढे लढत राहिल. या लढाईत आमच्याबरोबर जे येतील, ते महाराष्ट्राचे. जे आमच्याबरोबर येणार नाहीत, ते महाराष्ट्राच्या शत्रूंना निर्णायक क्षणी मदत करत होते, याची नोंद महाराष्ट्राच्या इतिहासात होईल.

हे वाचा >> Mahim Assembly constituency : माहीममध्ये यंदा तिरंगी लढत? सदा सरवणकरांचा मार्ग खडतर? वाचा ग्राऊंड रिपोर्ट

अमित ठाकरे आमच्या घरातील सदस्य

२०१९ च्या निवडणुकीप्रमाणे अमित ठाकरेंच्या विरोधात शिवसेना (उद्धव ठाकरे) उमेदवार देणार का? असाही प्रश्न यावेळी विचारला गेला. त्यावर संजय राऊत म्हणाले, “अमित ठाकरे आमच्याच घरातला मुलगा आहे. निवडणूक लढविण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. लोकशाहीत विचारधारा वेगळ्या असल्या तरी प्रत्येकजण निवडणूक लढवू शकतो.” शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाने माहिम विधानसभेत महेश सावंत यांना उमेदवारी देणार असल्याचे जाहीर केले आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra assembly elections 2024 sanjay raut reaction on amit raj thackeray mahim assembly constituency softnews kvg