Uddhav Thackray Gave AB Form To Tejaswi Ghosalkar : शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे दिवंगत नेते अभिषेक घोसाळकर यांची फेसबूक लाईव्ह करून हत्या करण्यात आली होती. त्यांच्या पत्नीला आता उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी दिली आहे. तेजस्वी घोसाळकर यांना दहिसर येथून उमेदवारी देण्यात आली असून उद्धव ठाकरेंनी त्यांना एबी फॉर्मही दिला आहे.

८ फेब्रुवारी रोजी शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची फेसबूक लाईव्ह करून हत्या करण्यात आली होती. या हत्येत मॉरिस नोरान्हा उर्फ मॉरिसभाईने यांचं नाव समोर आलं होतं. जनतेत मिसळणारं जोडपं म्हणून घोसाळकर पती-पत्नीची ओळख होती. तर, अभिषेक घोसाळकर यांचे वडील विनोद घोसाळकर हे उद्धव ठाकरे यांचे कट्टर समर्थक आणि या मतदारसंघाचे माजी आमदार राहिले आहेत. त्यामुळे दहीसर विधानसभा मतदारसंघातून तेजस्वी घोसाळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

उद्धव ठाकरे यांनी आजच हरून खान, भैरुलाल चौधरी जैन आणि संजय भालेराव या तिघांची नावे जाहीर केली होती. परंतु, तेजस्वी घोसाळकर यांचं नाव जाहीर केलं नव्हतं. उद्धव ठाकरे यांनी घोसाळकर यांच्या कुटुंबीयांकडे एबी फॉर्म दिला होता. या मतदारसंघातून विनोद घोसाळकर आणि तेजस्वी घोसाळकर या मतदारसंघातून इच्छूक होत्या. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी या मतदारसंघाचा निर्णय घोसाळकर कुटुंबीयांवर सोपावला. अखेर, तेजस्वी घोसाळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

भाजपाच्या मनीषा चौधरी यांच्याविरोधात होणार निवडणूक

भाजपाने या मतदारसंघातून मनीषा चौधरी यांना उमेदवारी दिली आहे. यामुळे या मतदारसंघातील चूरस वाढली आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी आज वर्सोवातून हरुन खान, मलबार हिल येथून भैरुलाल चौधरी जैन आणि घाटकोपर पश्चिम मतदारसंघातून संजय भालेराव यांना एबी फॉर्म दिले.