काँग्रेसची ६२ जागांची पहिली यादी आज; ९६ उमेदवारांवर शिक्कामोर्तब; शिवसेनेबरोबरचा वाद मिटवण्याची जबाबदारी थोरातांवर

काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली

maharashtra assembly elections congress first list of 62 candidates
(संग्रहित छायाचित्र) लोकसत्ता टीम

नवी दिल्ली : राज्यातील महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा तंटा कायम असताना सोमवारी दिल्लीत काँग्रेसने सुमारे ९६ उमेदवारांवर शिक्कामोर्तब केले. त्यातील ६२ उमेदवारांची काँग्रेसची पहिली यादी मंगळवारी जाहीर होणार आहे. या जागांपैकी ५८ जागांबाबत कोणताही वाद नसून तिन्ही घटक पक्षांचे एकमत आहे.

जागावाटपाबाबत काँग्रेस व ठाकरे गटातील वाद मिटवण्याची जबाबदारी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर सोपवण्यात आली आहे. थोरात मंगळवारी उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्याशी चर्चा करणार आहेत. या बैठकीत जागावाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता आहे. त्यानंतर महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. त्यानंतर तिन्ही पक्षांची पहिली यादी घोषित होणार आहे.

हेही वाचा >>>चावडी : भाजप प्रदेश कार्यालयातून प्रसिद्धीमाध्यमे तडीपार?

काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली. महाविकास आघाडीतील काँग्रेस व शिवसेनेच्या ठाकरे गटातील जागांचा वाद टोकाला गेल्यामुळे रविवारी ही बैठक रद्द करण्यात आली होती. मात्र प्रदेश काँग्रेसच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांना खरगेंनी दिल्लीत थांबण्याची सूचना केली. सोमवारी हिमाचल भवनमध्ये प्रदेश प्रभारी रमेश चेन्निथला यांच्या उपस्थितीत छाननी समितीचा दुसरी बैठकही झाली. गेल्या आठवड्यामध्ये पहिली बैठक घेण्यात आली होती. या बैठकीमध्ये काँग्रेसच्या सर्व उमेदवारांची नावे निश्चित केल्याचे समजते. काँग्रेसने उमेदवार निश्चित केले असले तरी महाविकास आघाडीतील तीन पक्ष नेमका किती जागा लढवणार आहेत अजून स्पष्ट झालेले नाही. विदर्भातील १२ जागांचा वाद सोमवारीही कायम होता. मात्र काँग्रेसने मवाळ भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले. वादात असलेल्या जागांबाबत मंगळवारी मुंबईतील महाविकास आघाडीच्या बैठकीत तोडगा काढला जाण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Maharashtra assembly elections congress first list of 62 candidates to release today print politics news zws

First published on: 22-10-2024 at 06:58 IST
Show comments