Maharashtra Today’s Election News Updates: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं असून अनेक पक्षांनी त्यांचे उमेदवार जाहीर केले आहेत. या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज भरून प्रचाराला सुरुवात केली आहे. महाराष्ट्र विधानसभेसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे, तर २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर केला जाईल. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच पक्षांचे नेते, कार्यकर्ते प्रचाराला लागले आहेत. महायुती, महाविकास आघाडीतील पक्षांसह इतर सर्वच पक्षांच्या उमेदवारांच्या याद्या जाहीर करणय्यास सुरुवात केली आहे. तसेच उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराजीनाट्य, पक्ष बदलण्याचे प्रकार घडत आहेत. वेगवेगळ्या पक्षांचे मेळावे होत आहेत. प्रचारसभा, रॅली आणि विविध कार्यक्रम घेतले जात आहे. या सर्व राजकीय घडामोडींचा वेध आपण या लाईव्ह न्यूज ब्लॉगद्वारे घेणार आहोत.

Live Updates

राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या राजकीय बातम्या

18:32 (IST) 26 Oct 2024
सोलापूर दक्षिणच्या जागेवरून महाविकास आघाडीत वाद पेटला, ठाकरेंचे नेते बंडखोरी करण्यावर ठाम

काँग्रेसने दक्षिण वरील दावा नसोडल्यास शिवसेना (ठाकरे) अक्कलकोट आणि सोलापूर शहर मध्य मध्ये बंडखोरी करणाऱ्यावर ठाम आहे. सोलापूर दक्षिणच्या जागेवर काँग्रेसकडून माजी आमदार दिलीप माने यांनी दावा केला होता. त्यानंतर सोलापुरातील शिवसेना उबाठा गट आक्रमक झाला आहे. सोलापूर दक्षिणचा शिवसेना उबाठाचा एबी फॉर्म अमर पाटील यांना मिळाल्याने जागा शिवसेनेचीच असल्याचं जिल्हा कार्यकरणीने स्पष्ट केलं आहे. येत्या २९ ऑक्टोबर रोजी शिवसेनेकडून महाविकास आघाडीचे उमेदवार अमर पाटील हे शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरणार.

17:18 (IST) 26 Oct 2024
योजना बंद करणे हे मविआचे नेहमीचे काम आहे - रवींद्र चव्हाण

रवींद्र चव्हाण म्हणाले, ठाणे शहर मतदारसंघातून संजय केळकर हॅटट्रिक मारणार आहेत. ठाणे शहरात महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगले वातावरण आहे. आम्हाला पूर्ण खात्री आहे पुन्हा आमचंच सरकार येणार आहे. संपुर्ण महाराष्ट्रात महायुतीकरता चांगलं वातावरण आहे. मविआच्या काळात अनेक योजना बंद केल्या होत्या. आमच्या सरकारने सर्व योजना पुन्हा सुरु केल्या आहेत.

17:06 (IST) 26 Oct 2024
क्रांतिकारी शेतकरी संघटना महाविकास आघाडी सोबत जाणार नाही - रविकांत तुपकर

महाविकास आघाडीने चर्चा करुन खेळवले आणि नंतर दगाफटका केला. त्यामुले महाविकास आघाडी सोबत क्रांतिकारी शेतकरी संघटना जाणार नाही, असं रविकांत तुपकरांन जाहीर केलं आहे. ते म्हणाले, महाविकास आघाडीने शेतकऱ्यांचा अपमान केला आहे, कदाचित त्यांना शेतकऱ्यांच्या मतांची गरज नसावी. महाराष्ट्रात क्रांतिकारी शेतकरी संघटना ताकदीने उभी राहील. या राज्यात काही ठिकाणी शेतकरी पुत्र अपक्ष लढणार आहेत, आम्ही त्यांचा प्रचार करणार आहोत. यासंदर्भात रविकांत तुपकर यांनी आज महत्त्वाची बैठकी बोलवली होती. २९ ऑक्टोबर रोजी निवडणूक लढवायची की नाही याबाबतचा निर्णय घेऊ असंही ते म्हणाले.

14:48 (IST) 26 Oct 2024
मंत्री उदय सामंत यांनी घेतली मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट

राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. जालन्याच्या अंतरवाली सराटीत मंत्री उदय सामंत आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात काही वेळ चर्चा झाली. "आज मी माझ्या काही सहकाऱ्यांचे एबी फॉर्म घेऊन पक्षामार्फत येथे आलो होतो", असं या भेटीनंतर मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. एक मित्र म्हणून मनोज जरांगेंना भेटावं, गप्पा माराव्या या उद्देशाने मी अंतरवाली सराटीत आलो होतो. रात्री भेटलो तरी ब्रेकिंग होते, आता उन्हात भेटलो तरी ब्रेकिंग होते करायचं काय?आजची भेट राजकीय नव्हती. दोन मित्रांनी केलेली चर्चा म्हणूनच याकडे बघावे, असंही सामंत यावेळी म्हणाले.

14:46 (IST) 26 Oct 2024
महायुती माहीममध्ये अमित ठाकरेंना पाठिंबा देणार? आशिष शेलार म्हणाले...

“अमित ठाकरे यांना समर्थन देण्याची भूमिका घेतली पाहिजे, असं मला वाटतं. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी मी बोलणार आहे. ते यासंदर्भात निर्णय घेतील. यात महायुतीमध्ये कोणताही मतभेद नसला तरी यामुळे एक वेगळ्या पद्धतीचे महाराष्ट्राच्या संस्कृतीला एका अर्थाने जपता येईल असं नातं आपण दाखवलं पाहिजे. सदा सरवणकर यांच्या उमेदवारीला आमचा विरोध नाही. ते महायुतीचे उमेदवार आहेत, महायुती म्हणून निर्णय करावा हे माझं म्हणणं आहे”, असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

13:39 (IST) 26 Oct 2024
पिंपरी-चिंचवडमध्ये महाविकास आघाडीत पेच कायम

पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तिन्ही विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार ठरले असताना महाविकास आघाडीत कोणता मतदारसंघ कोणत्या पक्षाकडे राहणार, हे चित्र अद्यापही स्पष्ट झाले नाही. एकही उमेदवार ठरला नसून जागांवरून राष्ट्रवादी (शरद पवार), शिवसेना (ठाकरे) या पक्षांमध्ये चिंचवड आणि भोसरीवरून रस्सीखेच सुरू आहे. महाविकास आघाडीतील पेच कायम असल्याने इच्छुकांमध्ये धाकधूक वाढली आहे. मुंबई, पुण्याच्या वाऱ्या सुरू आहेत. तिन्हींपैकी एका मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होऊन पाच दिवस झाले. परंतु, अद्याप महाविकास आघाडीचे उमेदवार ठरले नाहीत. दुसरीकडे महायुतीने उमेदवार जाहीर करून आघाडी घेतली आहे. महायुतीमधील राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाने पिंपरीतून आमदार अण्णा बनसोडे, भाजपने चिंचवडमधून शंकर जगताप आणि भोसरीतून विद्यमान आमदार महेश लांडगे यांची उमेदवारी जाहीर केली. त्यांचा प्रचार सुरू आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांची उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. त्यात पिंपरी -चिंचवडमधील एकाही जागेचा समावेश नाही. काँग्रेसला शहरातील एकही मतदारसंघ मिळण्याची शक्यता नाही. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाने तिन्ही मतदारसंघावर दावा केला आहे. तर, शिवसेना (ठाकरे) पक्षाचा पिंपरी आणि भोसरीवर दावा आहे.

सविस्तर वृत्त वाचा....

13:38 (IST) 26 Oct 2024
सुजय विखेंच्या सभेत भाजपा नेत्याची जयश्री थोरातांवर अश्लाघ्य टीका, शालिनी विखे संतापून म्हणाल्या...

माध्यमांशी बोलत असताना शालिनी विखे पाटील म्हणाल्या, “सुजय विखे पाटील दक्षिण अहमदनगरमध्ये मागच्या पाच वर्षांपासून काम करत आहेत. कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव सुजय विखेंनी संगमनेरमध्ये सभा घेतल्या होत्या. या सभांना अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळत असल्यामुळेच विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली. यामुळे याविरोधात काहीतरी करावे लागेल, असा डाव त्यांनी आखला. विरोधकांच्या मनात कालच्या सभेनिमित्त विकृती निर्माण झाली, त्यातून त्यांनी कालचा गोंधळ घातला.”

13:05 (IST) 26 Oct 2024
काँग्रेसची २३ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

आज (२६ ऑक्टोबर) काँग्रेसची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या दुसऱ्या यादीमध्ये २३ उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.

https://twitter.com/INCIndia/status/1850052902863372568

11:54 (IST) 26 Oct 2024
काही मतदारसंघात मविआच्या उमेदवारांमध्येच मैत्रीपूर्ण लढती? संजय राऊत म्हणाले...

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख जवळ येत असून महाविकास आघाडीने अद्याप आपले सर्व उमेदवार जाहीर केलेले नाहीत. तसेच अनेक जागांवर तिन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच चालू आहे. दरम्यान, अनेक जागांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने काही उमेदवारांना एबी फॉर्म दिले आहेत. त्यापैकी काही जागांसाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षांनीही त्यांच्या इच्छुक उमेदवारांना एबी फॉर्म दिले आहेत. त्यामुळे, मविआचा नेमका उमेदवार कोण आणि मविआच्या अंतिम जागावाटपाबाबतचं चित्र कधी स्पष्ट होणार असा प्रश्न सर्वांना पडला आहे. तसेच अनेक मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीच्याच उमेदवारांमध्ये मैत्रीपूर्ण लढतींची शक्यता निर्माण झाली आहे. यावर शिवसेनेचे (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राऊत म्हणाले, "४ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. त्यामुळे ४ नोव्हेंबरला चित्र स्पष्ट होईल. त्याआधीच बऱ्याच गोष्टी पूर्ण होतील, आमच्याकडून त्या पूर्ण केल्या जातील. तसेच मैत्रीपूर्ण लढतींची लागण लागेल असं मला वाटत नाही".

Story img Loader