Who Will Be the CM if MVA Won Maharashtra Election 2024 : केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम केव्हाही जाहीर केला जाऊ शकतो. काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी मुंबईत येऊन येथील निवडणुकांबाबत बैठका घेतल्या आहेत. त्यांनी सर्वपक्षीय नेत्यांशी संवाद साधला असून बैठकीत तारखांबाबत मिळालेल्या सूचनांचा विचार केला जाईल, अशी सकारात्मक प्रतिक्रिया त्यांनी दिलीय. दरम्यान, राज्यात निवडणुकांचे वारे वाहू लागलेले असतानाही महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदाबाबत काहीच निश्चित झाले नाही. मुख्यमंत्री पदाचा चेहरा देऊन निवडणूक लढवायची की न देता लढवायची यावरूनच संभ्रम निर्माण झालाय.
लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीने पंतप्रधान पदाचा चेहरा दिला नव्हता. निवडणूक निकालानंतर पंतप्रधान पदाचा चेहरा ठरवला जाईल, अशी भूमिका घेण्यात आली होती. आता पुन्हा अशीच भूमिका घेण्याचे आवाहन शरद पवारांनी दिले आहे. मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याशिवाय विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यास शरद पवारांनी सांगितले आहे.
हेही वाचा >> पत्रकाराच्या ‘या’ प्रश्नावर शरद पवारांनी चमकून विचारलं, “मी?”; मुख्यमंत्रीपदाच्या चर्चांवर केलं सूचक भाष्य!
काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी याबाबत सुतोवाच केले होते. मुख्यमंत्री पदाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आग्रही आहे का असा सवाल त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर शरद पवार म्हणाले होते की, “आमच्या पक्षात आम्ही याची चर्चा केली. एक म्हण आहे. मी हे जातीय बोलतोय असं समजू नका. बाजारात तुरी, भट भटणीला मारी. कशाचा काही पत्ता नाही, आजच त्याची चर्चा. अजून निवडणुका व्हायच्या आहेत. सरकार बनवायचं तर त्यासाठी बहुमत पाहिजे. बहुमत मिळालं तर नेता निवडतील. नेता निवडला तर मुख्यमंत्री होईल”, असं शरद पवार म्हणाले. मात्र, यावेळी शरद पवारांनी मुख्यमंत्रीपदासाठी पक्ष इच्छुक नाही, असंही स्पष्टपणे न सांगितल्यामुळे यावरून तर्क-वितर्कांना सुरुवात झाली आहे.
शिवसेना मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्यास आग्रही
“काँग्रेसने मुख्यमंत्री पदाबाबत दावा केला आहे. उद्धव ठाकरेंनी त्यांना जाहीर सांगितलं होतं की चेहरा असेल तर समोर आणा मी पाठिंबा देतो. मुख्यमंत्री पदाबाबत लोकांच्या मनात संभ्रम नको. लोकांचा संभ्रम दूर केला पाहिजे ही काँग्रेस आणि शिवसेनेची भूमिका आहे. आणि यात काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही. खांद्यावर कोणाचं मुंडकं आहे हे दिसलं पाहिजे, लोकांमध्ये नुसतं धड घेऊन कसं जाणार?” असं संजय राऊत म्हणाले आहेत.
मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा की करू नये यावरून महाविकास आघाडीतील मित्र पक्षांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्यास काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने तयारी दर्शवली असली तरीही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने त्यावर अलिखित आक्षेप घेतलाय. त्यामुळे महाविकास आघाडीतील हे मतभेद दूर होऊन निवडणुका कशा लढवल्या जातील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.